आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नईयो छुपदे दिलांदे पियारे हो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किन्नौर मधला आमचा शेवटचा दिवस हां हां म्हणता उगवला. २१ दिवसांच्या ट्रिपमधले १८ दिवस उघड्या बाटलीतल्या अत्तरासारखे नकळत उडून गेले होते, पण त्या अनुभवांचा सुगंध मात्र आमच्या मनात दरवळत होता. आता घरी परत जायचे वेध लागले होते. दोन दिवसांनी चंडीगढहून परतीची फ्लाइट होती. काल्पाला पृथ्वीच्या हॉटेलमधून चेकआउट करताना माझ्याच नाही तर तिथल्या सगळ्या स्टाफच्या डोळ्यातदेखील पाणी उभं राहिलं होतं. आम्हाला गाडीपर्यंत सोडायला पृथ्वीच नव्हे, तर त्याची बायको सावित्रीभाभी, त्याचा स्टाफ सगळेच आले होते. गाडीत बसताना मला वाटत होतं की, कुठल्याही क्षणी मला रडू फुटेल. पवनही गंभीर झाला होता. नाही म्हटलं तरी गेले १८ दिवस आम्ही सतत बरोबर होतो, मुलं सारखी ‘पवन मामा, पवन मामा’ करून त्याला भंडावून सोडत होती. गाडीत बसता क्षणी माझ्या डोळ्यातून दोन अश्रू निखळलेच. अनन्याने समजूतदारपणे माझा हात हातात घेतला, म्हणाली, ‘रडू नकोस मम्मा. हिमालय कुठे जात नाहीये. आपण पुढच्या वर्षी परत येऊ.’ आदित आणि अर्जुनही जवळ येऊन मला बिलगले.

गेल्या अठरा दिवसांत किती बदलली होती माझी मुलं! आता चेकआउट करतानादेखील न सांगता त्यांनी त्यांचं सामान स्वतः भरलं होतं. जिना उतरताना सामान खाली आणायला त्यांनी स्वतःहून मदत केली होती. या प्रवासात त्यांनी कुठेही, कसलाही हट्ट केला नव्हता. जिथे गरज होती तिथे स्वतःचे कपडे स्वतः हाताने धुतले होते. कधी फॉरेस्ट रेस्ट हाउस तर कधी एकदम साधं होम स्टे, कधी मंदिराची धर्मशाळा तर कधी बौद्ध मोनॅस्टरीचे हॉस्टेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी बिनतक्रार राहायची सवय करून घेतली होती. पिझ्झा, बर्गर वगैरे खायचे पदार्थ असतात, हेदेखील बिचारे विसरून गेले होते. बहुतेक वेळा आम्ही रस्त्यावरच्या छोट्या ढाब्यांमधून दाल-चावल आणि भाजीच खायचो, पण मुलांनी कधीही कंटाळा केला नव्हता की, अमुकच पाहिजे असा हट्ट केला नव्हता. त्यांनी न मागता कधी कधी मी त्यांना स्वतःहून चिप्सची पाकिटं घेऊन द्यायचे, तेवढ्यावर त्यांचा चेहरा आनंदाने फुलून यायचा. या सबंध प्रवासात मी एकदाही पाण्याची सीलबंद बाटली विकत घेतली नव्हती. सगळीकडे आवर्जून तिथलं लोकल पाणीच प्यायला वापरलं होतं. एक फोन आणि एक कॅमेरा सोडल्यास इतर कुठलंही इलेक्ट्रॉनिक उपकरणदेखील मी बरोबर घेतलं नव्हतं. आणि तरीही मुलं खूश होती! या प्रवासात त्यांनी किती जगावेगळ्या गोष्टी अनुभवल्या होत्या! आठ-आठ किलोमीटरचे ट्रेक केले होते. १४ हजार फुटांवरचं गांव बघितलं होतं. तिथल्या लोकांबरोबर अंगतपंगत केली होती. जुनी देवळं बघितली होती. संध्याकाळच्या वेळी बौद्ध गोम्पामध्ये धीरगंभीर आवाजात चाललेली सामूहिक प्रार्थना ऐकली होती. सराहानमध्ये भल्या पहाटे उठून थंडीत काकडत देवीची आरती बघितली होती आणि नंतर श्रीखंड शिखरावर पसरलेला सूर्योदयाचा लालिमा डोळे भरून पहिला होता.

शोजामध्ये म्हाताऱ्या चौकीदार आजोबांबरोबर स्वतः जंगलात जाऊन मशरूम शोधून आणले होते. एकही विजेचा दिवा नसताना दिसलेलं शोजाचं चांदण्यांनी खच्चून भरलेलं निरभ्र आभाळ डोळे भरून बघितलं होतं. तीर्थनला नदीकाठी गळ टाकून ट्राउट मासे पकडायचा प्रयत्न केला होता. छोट्या छोट्या गावांमधून सर्वस्वी अनोळखी माणसांच्या घरी जाऊन त्यांनी मनापासून केलेलं स्वागत अनुभवलं होतं. चित्रं काढली होती, डायरी लिहिली होती. हिमाचल प्रदेशचं निसर्गवैभव सर्वांगाने अनुभवलं होतं.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हे तीन आठवडे मी आणि मुलं सतत बरोबर होतो. मला घरकामाचा, लिखाणाचा काच नव्हता आणि मुलं अभ्यासाच्या, खेळाच्या कसल्याच वेळापत्रकाला बांधलेली नव्हती. आम्ही एकत्र खूप हसलो, बोललो, चाललो, खेळलो, एकत्र गाणी ऐकली. मुलांना माझ्याशी बोलायला भरपूर वेळ होता आणि मला मुलांचं बोलणं ऐकायला. आता पुण्यात गेल्यावर थोड्याच दिवसांत शाळा सुरू होणार होती आणि परत एकवार आम्ही सगळेच घड्याळाच्या काट्याला जुंपले जाणार होतो. पवनची गाडी किन्नौरहून चंडीगढच्या दिशेला निघाली. एरवी खूप चिवचिवाट करणारी मुलं आज गप्पगप्पच होती. मीही माझ्याच विचारात गढून गेले होते. आमचा मूड ओळखून पवनने मोहित चौहानचं माझं अत्यंत आवडतं पहाडी गाणं लावलं. या ट्रिपमध्ये हे गाणं आम्ही शंभरदा तरी ऐकलं असेल. आपल्या अत्यंत दर्दभऱ्या आवाजात मोहित चौहान गात होता, ‘कुथी जांदा चंद्रमा, कुथी जांदे तारे हो, हो अम्माजी कुथी जांदे दिलांदे पियारे हो?’ मुलगी आईला विचारते, ‘आई दिवसा चंद्र कुठे जातो, तारे कुठे जातात? आपल्याला आवडणारे लाडके लोक कुठे ग नाहीसे होतात?’

आई तिला उत्तर देते, ‘छुपी जांदा चंद्रमा, छुपी जांदे तारे हो, हो धिये भला नईयो छुपदे दिलांदे पियारे हो’- ‘बाळा, चंद्र लपून बसतो, तारे लपून बसतात, पण आपले लाडके लोक दिसत नसले तरी कायम आपल्या मनाच्या आसपास असतात.’ गाणं ऐकता ऐकता मी खिडकीबाहेर नजर टाकली. शुभ्र हिमाची चादर पांघरलेला उत्तुंग किन्नर कैलास मला खुणावत होता. पुण्यातून दिसत नसले तरी हिमाचल प्रदेश आणि तिथले माझे ‘दिलांदे पियारे’ लोक कायम माझ्या मनाच्या आसपास राहणारच होते. माझा बदललेला मूड ओळखूनच की काय, माझ्या बोटात आपली बोटे गुंफत अर्जुन म्हणाला, ‘मम्मा, पुढच्या सुट्टीत ना आपण परत हिमाचललाच यायचं.’ एक वर्तुळ पूर्ण झालं होतं!

शेफाली वैद्य, पुणे
shefv@hotmail.com
बातम्या आणखी आहेत...