आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shefali Vaidya's Article In Travel With Triplets, Madhurima, Divya Marathi

मशहूर मसरूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका हिमाचली मित्राने मसरूरच्या दगडात कोरलेल्या देवळाबद्दल सांगितलं होतं. पन्नासेक पायऱ्या चढून गेलो आणि एक अतिशय सुंदर पंचशिखरी मंदिर दिसलं.

अखंड पहाडच्या पहाड कोरून घडवलेलं ते मंदिर. त्याची एकूण बांधणी बघता एकदम माझ्या डोळ्यांसमोर कंबोडियामधलं महाकाय अंकोरवाट मंदिर उभं राहिलं.

पालमपूरमधला दुसरा दिवस उजाडला. आज बरंच काही बघायचं होतं, म्हणून सकाळी लवकरच नाष्टा करून निघालो. पाऊस थांबला होता आणि सगळीकडे कोवळं कोवळं ओलं ऊन पसरलं होतं. आज पल्ला जरा दूरचा होता. एका हिमाचली मित्राने मला मसरूरच्या दगडातून कोरून काढलेल्या देवळाबद्दल सांगितलं होतं. एकाच एकसंध प्रस्तरातून कोरून काढलेलं, कुठेही जोड नसता घडवलेलं मोनोलिथिक प्रकारचं हे हिमाचल प्रदेशमधलं एकमेव देऊळ. मुळात अशा प्रकारची मंदिरं अख्ख्या देशात इनीगिनी चारच आहेत. आपल्या महाराष्ट्रातलं वेरूळचं अद्वितीय कैलास लेणं, चेन्नईजवळच्या महाबलीपुरममधले एकाच प्रचंड प्रस्तरातून कोरून काढलेले पंचरथ आणि मध्य प्रदेशातल्या धामनार गुंफा ही अशा प्रकारच्या मोनोलिथिक मंदिरांची देशातली इतर ठिकाणं. यातल्या दोन ठिकाणी, म्हणजे वेरूळ आणि महाबलीपुरमला मी मुलांना घेऊन गेले होते. त्यामुळे अशा प्रकारची मंदिरं कशी असतात, हे त्यांना माहीत होतं.
पालमपूरपासून मसरूर जवळजवळ साठेक किलोमीटरवर होतं. वाटेत आम्हाला कांगडा शहर लागलं. एका डोंगरावर बांधलेला महाकाय असा कांगडा किल्ला दिसला. मुलांना किल्ला बघायचा होता; पण परतीच्या वाटेवर किल्ला बघायचा, असं ठरवून मसरूरकडे निघालो. रस्ता छान होता. दोन्ही बाजूंना चहाचे मळे आणि दूर दिसणारी धौलाधारची देखणी बर्फाच्छादित शिखरे. मधूनच लागणारी छोटीशी, आटोपशीर, देखणी गावे. कांगडा शहर मागे टाकलं आणि रस्त्यातली वाहनांची संख्या खूपच कमी झाली. पंधरा-वीस मिनिटांनी दुसरी गाडी दिसायची. मसरूर जवळच पीर बिंडी गाव लागलं. इथे पीराचं स्थान आहे. त्या पीराजवळ रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली एक म्हातारा मुसलमान गृहस्थ शांतपणे बसून गुडगुडी ओढत होता. त्याला पवनने विचारलं, ‘देवळं कुठे आहेत?’ ‘इथेच डाव्या बाजूला. तीन-चार किलोमीटरवर.’ तो गृहस्थ म्हणाला. ‘इथे फारसं कोणी येत नाही का टूरिस्ट वगैरे?’ एकूण परिसरातली शांतता बघून पवनने विचारलं. ‘नही जी, ज्यादा लोगों को मालूम नही है ना!’ म्हातारबुवा हसून म्हणाले.

आम्ही पुढे निघालो. दोन-तीन किलोमीटरवर एक छोटा गाडीतळ दिसला. तिथे दोन-तीन गाड्या आधीच उभ्या होत्या, पण सगळ्या लोकल आणि प्रायवेट गाड्या. एरवी हिमाचलमध्ये कुठेही गेलात तरी टूरिस्ट गाड्यांचा सुळसुळाट दिसतो, पण इथे मात्र फक्त आमची एकच गाडी तशी होती. गाडी जिथे उभी केली तिथून डाव्या हाताला पन्नासेक पायऱ्या चढून गेलो आणि एक अतिशय सुंदर पंचशिखरी मंदिर दिसलं. पूर्ण एक पहाडच्या पहाड कोरून ते मंदिर घडवलेलं होतं. त्या मंदिराची एकूण बांधणी बघता एकदम माझ्या डोळ्यांसमोर कंबोडियामधलं महाकाय अंकोरवाट मंदिर उभं राहिलं. दोन्हीच्या स्थापत्यशैलीत खूप साम्य होतं. पुढे मी या मंदिराची माहिती मुद्दाम मिळवून वाचली, त्यामध्येसुद्धा दोन्ही मंदिरांमधल्या साधर्म्याचे उल्लेख केलेले मला आढळले. पण हे असं का, हे मात्र कुणी सांगू शकलेलं नाहीये आजपर्यंत. मसरूरच्या या मंदिराला इथले रहिवासी ‘ठाकूरद्वार’ म्हणून ओळखतात. कारण इथे पूजेला सध्या राम-सीतेच्या मूर्ती आहेत, पण मुळात हे देऊळ शिवाचं असावं; कारण मंदिराच्या दर्शनी पट्टीवर, शिखरावर जे कोरीव काम आहे, ते शैव पद्धतीचं आहे.

एकाच महाकाय दगडातून नागर पद्धतीची पंचशिखरं कोरलेली आहेत. दगडातूनच मंदिरावर जायला जिना कोरलेला आहे. वर चढून बघितलं तर फार सुंदर देखावा दिसतो. एका बाजूला धौलाधार पर्वतरांगा आणि दुसऱ्या बाजूला खूप दूरवर पसरलेली भाताची पोपटी शेतं. मधूनच डोकावणारी लाकडी घरं आणि एका मागोमाग एक अशा निळसर धूसर होत गेलेल्या टेकड्यांच्या रांगा! मंदिरासमोर खोदलेली एक सुंदर पुष्करिणी आहे, त्या पाण्यात मंदिराचं प्रतिबिंब फार सुंदर दिसतं. पुष्करिणीत मोठमोठे मासे आहेत. त्यांना खायला म्हणून एक मुसलमानी टोपी घातलेला साठीचा माणूस पिठाचे गोळे विकत होता. मुलांनी गोळे विकत घेऊन पाण्यात टाकले, ते खायला माशांची एकच झुंबड उडाली.

दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या प्रांगणातून बाहेर पडलो. तो मघाशी पिठाचे गोळे विकणारा माणूस म्हणाला, ‘चलिये, चाय पीजिये।’ त्याची जवळच चहाची टपरी होती. तेवढी एक टपरी सोडली तर पर्यटकांसाठी जवळ काही सोयीसुविधा नव्हत्या. मंदिर सध्या एएसआयच्या अधिपत्याखाली आहे. पाच रुपये फी देऊन मंदिर बघता येतं. आम्ही चहा प्यायला टपरीत बसलो, ‘कैसा लगा मंदिर मेडमजी?’ चहा बनवता बनवता त्या माणसाने विचारलं. ‘बहुत पुराना मंदिर है ये, खुद पांडवों ने बनाया है इसे।’ एखादं सुरेख दिसणारं जुनं मंदिर दिसलं की ते पांडवांनी बनवलंय, ही आख्यायिका जोडीला असतेच; त्यामुळे मला आश्चर्य वाटलं नाही. ‘अच्छा, खुद पांडवों ने बनाया इसे?’ मी विचारलं. ‘इतना बडा काम तो सिर्फ भीम ही कर सकते थे ना?’ अब्दुलचाचा म्हणाले. मी उत्तरादाखल नुसती हसले. एएसआयच्या मते हे मंदिर सुमारे सातव्या शतकात बनवलं गेलं असलं पाहिजे. दुर्दैवाने इथल्या बऱ्याच मूर्ती इरोजनमुळे बोथट झालेल्या आहेत. १९०५मध्ये इथे फार मोठा भूकंप झाला होता, तेव्हाही मंदिराची बरीच पडझड झाली होती. त्यामुळे नक्की माहिती, शिलालेख वगैरे काही उपलब्ध होऊ शकलेलं नाहीये. पण मंदिर आहे अत्यंत सुंदर!
मंदिर बघून परत पालमपूरला निघालो. मुलांना विचारलं, ‘तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं?’ एका आवाजात मुलं म्हणाली, ‘तलावातले मासे!’
(shefv@hotmail.com)