आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगावची स्वादभरारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे 63 वर्षांपूर्वी शेगाव रेल्वेस्थानकावर लहानग्या टपरीत तिरथराम ऊर्फ टी. आर. शर्मा यांनी कचोरी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्या वेळेस शेगाव रेल्वेस्थानकावर मोजक्याच रेल्वेगाड्या ये-जा करायच्या. पर्यायाने ग्राहकही संख्येने मोजकाच असायचा. परंतु एका आण्याला एक अशा दराने विक्री सुरू केल्यानंतर कचोरीची ख्याती बघता बघता भारतभर पोहोचली. आज या कचोरीने हजारो खाद्यप्रेमींना भुरळ घातली असून संतनगरीत श्रीमंत गजानन महाराजांचे दर्शन, आनंदसागरची पर्यटन यात्रा, यासोबतच शेगावची कचोरीसुद्धा सातासमुद्रापार प्रसिद्धीस आली आहे.


5 जून 1950 रोजी कचोरी सेंटर स्थापन करून तिरथराम शर्मा यांनी कुटुंबीयांना कायमस्वरूपी व्यवसायाचा मंत्र दिला. त्यांच्या पुढच्या पिढीने हा कचोरी निर्मिती आणि विक्रीचा वारसा यशस्वीपणे चालविला असून एकेकाळी एका आण्याला विकणारी ही कचोरी आज 5 रु. ते 7.50 एवढ्या किमतीला विकली जात आहे. शेगावला दरवर्षी हजारो भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात. येथे येणारा प्रत्येक जण कचोरीच्या लज्जतदारपणामुळे ती आपल्या गावालाही नेण्याचा मोह आवरू शकत नाही. आजवर जपलेली कचोरीची गुणवत्ता आणि यशाबाबत बोलताना तिरथराम शर्मा यांचे नातू बबलू शर्मा यांनी सांगितले की, दर्जेदार बेसन आणि मैद्याच्या वापराबरोबरच कचोरी बनवताना एका विशिष्ट प्रकारचा मसाला ते आजवर वापरत आले आहेत. परिणामी कचोरीचा दर्जा टिकून राहिला असून या कचोरीमुळे शेगावचे नाव जागोजागी निघत असल्याने तेच खरे समाधान असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे.


शेगावच्या कचोरीमुळे दररोज लक्षावधी रुपयांची उलाढाल होण्यास मदत झाली असून बेसन व मैदा विक्री तसेच मसाला विक्रीत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ नोंदली गेली आहे.या घटकेला भारतभरात प्रसिद्धीस आलेल्या या कचोरीची विक्री करून असंख्य कुटुंबीय आपला उदरनिर्वाह साधत आहेत. एक प्रकारे खाद्यप्रेमींच्या जिभेचे चोचले पुरवणारी टी. आर. शर्मा यांच्या हातची चव घेऊन आलेली कचोरी या घटकेला अनेकांचे पोट भरण्याचेही साधन ठरली आहे...


कचोरीची क्रेझ
पाकिस्तान, जपानपर्यंत...

संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशात शेगाव कचोरीची क्रेझ निर्माण झाली आहे. अमरावती, अकोला, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, वाशीम इत्यादी शहरांमध्ये आज ‘शेगाव कचोरी’ अशा नावाने स्टॉल लावून जोमाने विक्री केली जात आहे.
शेगाव कचोरी हा शेगावचा एक प्रतिष्ठित ब्रँड बनला आहे. विक्री केंद्र सुरू करण्याकामी दुबई येथील एका कंपनीशी शर्मा यांची बोलणी सुरू आहेत. ती यशस्वी झाल्यास शेगाव कचोरी दुबईत पोहोचणार आहे. यापूर्वी पाकिस्तान व जपानचा प्रवास तिने केला असून तेथील अनिवासी भारतीयांनी तिची लज्जत चाखलेली आहे.