आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र बेटांवर आम्ही सारे !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरात माणसं आहेत आणि घरातला टीव्ही बंद आहे. आताशा सहसा असं घडत नाही. घरात पाहुणे आले; बोलणं होत असलं, तरीही एका बाजूला टीव्ही सुरूच असतो. कालपरवापर्यंत कुणी घरात आलं की यजमान किमान मॅनर्स म्हणून टीव्ही बंद करायचे; पण आता पाहुणेसुद्धा तसा आग्रह धरत नाहीत. कुणी आलं काय नि गेलं काय, काळानुरूप आकार आणि रूप बदललेला टीव्ही अव्याहत सुरूच असतो. अगदी रेल्वे स्टेशनातल्या ओक्याबोक्या वेटिंग रूममधल्या सिलिंग फॅनसारखा...
जुन्या पिढीला म्हणजे, पुस्तकं-वर्तमानपत्रं यांच्या सोबतीनं वाढलेल्या पिढीतल्या एका वर्गाला अजूनही ‘टचस्क्रीन’वाल्या दुनियेशी जुळवून घेता येत नाही. सतत कानांवर आघात करणारे चित्रविचित्र आवाज नि प्रतिमा सहन होत नाहीत. इतरांना मात्र हेच आवाज, याच प्रतिमा हव्याहव्याशा वाटतात. तीच दृश्ये, त्याच प्रतिमा, पुन:पुन्हा बघताना या इतरांचे भान हरपून जाते. एरवी, कुटुंबातले आई-बाबा-आजी-आजोबा वेगवेगळ्या कारणास्तव टीव्हीसमोर बसत असले, तरीही अजूनही काही जण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत टीव्ही-मोबाइल सुरू असला की अस्वस्थ होतात. विशेषत: नव्या पिढीतली मुलं टीव्ही बंद केला किंवा हातातला स्मार्टफोन-आयपॅड प्रेमाने का होईना, काढून घेतला तरीही सैरभैर होतात. चिडतात. रुसतात. प्रसंगी व्हायोलंटही होतात. एकेकाळी तुम्ही नाही का सकाळी सहापासून रात्री झोपेपर्यंत रेडिओ लावून बसायचात, असा उलट सवाल करतात. पण, रेडिओ ऐकणं म्हणजे स्वत:ला एका जागी जखडून घेणं नव्हतं. स्वत:ची शुद्ध हरपणं नव्हतं. कानावर ध्वनिलहरींचे स्पर्श करणे वेगळे आणि डोळ्यांपुढे दृश्यचौकटींचे दर सेकंदाला तांडव होत राहणे निराळे. पण, हे त्यांच्या आकलनापलीकडचं असतं...
कुणी म्हणतं, आजच्या पिढीला टीव्ही, मोबाइल, टॅब्लेट, आयपॉड, आयपॅड आदी गॅजेट्सचा भीषण गराडा पडलेला आहे. पूर्ण नव्हे; पण काही अंशी खरं आहे ते. पण मुलांनी, विशेषत: नोकरदार आई-वडिलांच्या शारीरिक उपस्थितीत वा अनुपस्थितीत एकट्या-दुकट्याने दिवस ढकलणा-या शहरी मुलांनी, सतत टीव्ही-मोबाइलला चिकटून राहण्याचं ‘चमकदार-चटकदार दृश्यप्रतिमांचं अनावर आकर्षण’ हे एकच कारण असतं? एरवी ताण, दु:ख यांपासून दूर जाण्याचा सहज सोपा मार्ग म्हणून माणूस व्यसनाच्या आहारी जातो. इथे आयुष्याला सुरुवात केलेल्या मुला-मुलींना असे कोणते ताण, अशी कोणती दु:खं असतात; ज्यामुळे ही मुलं जागेपणातला 80-90 % वेळ टीव्ही-मोबाइलच्या साथीने घालवत असतात? दुस-या कुणाहीपेक्षा टीव्ही-मोबाइलसारखी गॅजेट्स त्यांना त्यांच्या खात्रीचे सोबती वाटत असतात? शहरी वातावरणात वाढलेल्या, शहरी जीवनशैलीचा प्रभाव असलेल्या मुलांना अंधार, शांतता आणि एकटेपणाचा तुलनेने अनुभव कमी असतो वा अनेकदा नसतोही.
ग्रामीण भागात जर सर्वसाधारणपणे दिवस रात्री नऊ नंतर संपत असेल, तर शहरांत वाढणा-या मुलांचा सर्वसाधारण दिवस अकरा-बाराशिवाय संपत नाही. त्यातही मुंबईसारख्या महानगरात वाढलेल्या बहुतांश मुलांना वीज जाणे वा येणे या घटना कित्येकदा ठाऊकही नसतात. कधीही न झोपणारी अशी ख्याती असलेल्या मुंबईतला एकही क्षण आवाजाविना जात नाही. एक प्रकारे महानगरातल्या मुलांचं जागलेपण सतत चित्रविचित्र आवाजांनी वेढलेलं असतं. पण, जेव्हा घरातली कर्ती माणसं नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर पडतात, तेव्हा सगळ्यात प्रथम घर आवाज हरवून बसतं. एरवी, उजेड मनाला दिलासा देतो; पण नि:शब्द वातावरणातला लख्ख उजेड गडद अंधाराइतकाच भीतिदायक होऊन जातो. यातून उचल खाते ती, एकटेपणाची भावना. स्वत:च्या घरात असूनही अंधा-या निबिड जंगलात फसल्याचा आभास देणारी. या सर्द अवस्थेत खिडकीचा पडदा हलला, तरी हृदयाचे ठोके वाढतात. किचन वा बाथरूममधल्या नळातून पाण्याचा थेंब टप्पकन जमिनीवर पडला, तरी दचकायला होतं. यातून एकटेपणाची भीती मन व्यापते. हा एकटेपणा घालवायचा कसा? स्वत:भोवती सुरक्षा कवच उभारायचं कसं? कुठल्या कामात, छंदात मन गुंतवलं, अभ्यासाचा प्रयत्न करून पाहिला तरीही वा-यावर हलणारा पडदा, टप-टप टपकणारा नळाचा थेंब हृदयाची धडधड वाढवतो. भीती कमी होण्याऐवजी उलट वाढतच जाते. मग काय केलं, तर आपण माणसाच्या गर्दीत असल्याचा फील येईल? आपल्या सोबत कुणी तरी आहे, असं वाटत राहील? एकट्या मुला-मुलींची भिरभिरती नजर टीव्हीच्या रिमोट कंट्रोलकडे जाते. विलक्षण अस्वस्थतेत टीव्ही ऑन केला जातो. नेहमीपेक्षा आवाज चढा ठेवला जातो. स्क्रीनवर दृश्य अवतरतं आणि एका क्षणात चिरपरिचित कोलाहल सुरू होतो.
टीव्हीवर दिसणारी माणसं, त्यांचे आवाज आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा दिलासा देत राहतात. आता नळातून पडणा-या थेंबामुळे निर्माण होणारा भीतिदायक आवाज टीव्हीने निर्माण केलेल्या कल्लोळात गुडूप होतो. टीव्हीसारखीच सोबत स्मार्टफोन देतो. टॅबही देतो आणि प्ले स्टेशन नावाचं खेळांचं आभासी जगही देतं...
संध्याकाळी एकेक करत घर भरत जातं; पण घरात परतलेला प्रत्येक जण केवळ शरीराने परत आलेला असतो. यातल्या कुणाचं मन फेसबुक-ट्विटर-व्हॉट्स अ‍ॅपमध्ये अडकलेलं असतं. कुणी ऑफिसचं काम घरापर्यंत आणून लॅपटॉप-आयपॅडमध्येच अडकलेला असतो. सबंध दिवस टीव्ही-मोबाइलच्या संगतीने ढकललेल्या मुला-मुलींना पुन्हा आपल्या गॅजेट्सच्या जगात परतणं भाग पडतं. म्हणजेच, एका पातळीवर ‘लाइफ स्टाइल’ने एकवटलेलं जग दुस-या पातळीवर स्वतंत्र बेटांमध्ये ट्रान्सफॉर्म झालेलं असतं...
deshmukhshekhar101@gmail.com