आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shekhar Deshmukh Article About Film Industry, Divya Marathi

प्रेक्षक अ‍ॅडल्ट होतो तेव्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्तपणा रक्तात असला तरीही संस्कृती-परंपरेच्या दृश्य-अदृश्य ओझ्यापायी संस्कृती संवर्धकाची भूमिका पार पाडणे, हेच आपलं आद्यकर्तव्य असल्याचं हिंदी चित्रपटसृष्टी मानत आली होती. अर्थात, राज कपूरसारखे निर्माता-दिग्दर्शक सत्यम शिवम सुंदरम, राम तेरी गंगा मैली आदी चित्रपटांद्वारे कलात्मकतेचं वेष्टन घालून चाणाक्षपणे लैंगिकतेचं दर्शन घडवतच होते. परंतु नव्वदच्या दशकापर्यंत अपवाद वगळता प्रत्येक नवी नटी ‘मी अंगप्रदर्शन करणार नाही’, अशी जाहीर घोषणा करतच इंडस्ट्रीत दाखल होत असे. नव्हे, तिच्या त्या घोषणेची वर्तमानपत्र-सिनेमासिकांतून ठळक बातमी होत असे. चवीने वाचलीदेखील जात असे.

परंतु त्यानंतरच्या दशकाचा काळ माहिती-तंत्रज्ञानाच्या आगमनाचा होता. मुख्यत: इंटरनेट आणि मोबाइल फोनच्या प्रसाराचा होता. या साधनांमुळे हळूहळू ज्याला ‘अ‍ॅडल्ट कंटेंट’ म्हणतो, त्याचं ‘पर्सनलायझेशन’ होऊ लागलं होतं. परिणामी प्रौढांसाठीचा मजकूर-चित्र-चलचित्र आदींचं चलन-वलन विनाअडथळा होण्यास सुरुवात झाली होती. लैंगिकतेकडे निर्देश करणारा मजकूर-चित्र-चलत््चित्रांचा स्वीकार करण्याची मानसिकता वैयक्तिक पातळीवर समाजात रुजू लागली होती. सामूहिक पातळीवरही त्याचं प्रतिबिंब पडू लागलं होतं. विसाव्या शतकातले माध्यम तत्त्वज्ञ मार्शल मॅक्लुआन यांनी ‘मीडियम इज द मेसेज’ हा मांडलेला सिद्धांत इथे प्रत्यक्षात लागू होताना दिसत होता. मॅक्लुआन यांच्या म्हणण्यानुसार, समाज हा माध्यमाद्वारे प्रसृत होणार्‍या आशयामुळे नव्हे, तर माध्यमांच्या नवनव्या साधनांमुळे घडत आणि बदलत असतो. ‘अ‍ॅडल्ट कंटेंट’ असलेले चित्र-चित्रपट आपल्याकडे तेव्हाही उपलब्ध होते, पण त्याचा प्रसार करणारी साधनं (व्हीसीआर, व्हिडिओ पार्लर आदी) मर्यादित प्रमाणात होती. पण जसजशी साधनं वाढली, प्रत्येकाच्या हातात आली, तशी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर लैंगिकतेबाबत समाजाची मानसिकता बदलत गेली. असो.

समाजाचा हा बदलता ढंग बघून बॉलीवूडही थोडं धाडसी होऊ लागलं होतं. मी शरीरप्रदर्शन करणार नाही, असं बोलणं जिथे नित्याचं मानलं जात होतं, त्याच बॉलीवूडमधल्या नट्या ‘स्क्रिप्टची गरज असेल तर व्हाय नॉट?’ असा पवित्रा घेऊ लागल्या होत्या. त्यात अर्थातच सावधपणा होता; पण समाजाने स्वीकार केल्यास, संस्कृती-परंपरेला फाटा देण्याची या नट्यांची तयारीही दिसत होती. माहिती-तंत्रज्ञानाच्या बळावर अस्तित्वात आलेल्या संपर्क साधनांनी गरजेपुरतं स्वातंत्र्य इंडस्ट्रीला मिळवून दिलं होतं. हिंमत बळावल्यानेच दोन फुलांच्या प्रतीकात्मक मिलनाऐवजी चित्रपटांत चुंबनदृश्यं दिसू लागली होती. उत्तान, उन्मादक आयटम साँग्जची संख्या वाढू लागली होती. अवघी संवादभाषाच नव्हे तर चित्रभाषाही अ‍ॅडल्ट कॅटेगरीत मोडू लागली होती.

या घटकेला, हिंदी चित्रपटसृष्टी अशा टप्प्यावर येऊन पोहोचली आहे, की अंगप्रदर्शन हा चर्चेचा वा वादाचा मुद्दाच राहिलेला नाही. चुकूनमाकून आता कुणी नटी मी अंगप्रदर्शन करणार नाही, असा कडक पवित्रा घेऊन बॉलीवूडमध्ये प्रवेश करती झालीच, तर तिला वेगळा व्यवसाय निवडण्याचाच बहुतकरून सल्ला दिला जाईल. आता गाण्यांतून, संवादांतून, पेहरावांतून, दृश्यांतून सोवळंओवळं न पाळता गरज असो वा नसो; सेक्स, सेक्शुआलिटी आणि सेन्शुअसनेस मनसोक्त झळकू लागला आहे. घरात, थिएटरमध्ये एकेकट्यानं वा बहुतेक वेळा कुटुंबासमवेत अशा प्रकारच्या अ‍ॅडल्ट कंटेंटचा खुलेआम स्वीकार केला जातोय. स्वत:चं धड नाव न उच्चारता येणारी लहान लहान मुलं गणेशोत्सव असो वा होळी-रंगपंचमी; शीला की जवानी, मुन्नी बदनाम हुई यांसारख्या सेन्शुअस प्रकारातल्या गाण्यांवर बिनधास्त नाचताहेत. चित्रपटांतल्या द्वयर्थी संवादांवर मनसोक्त खिदळताहेत. नव्वदच्या दशकापर्यंत ज्या विषयासाठी प्रयत्नपूर्वक डोळे-कान आणि दारं बंद केली गेली होती, तो ‘सेक्स’ हा निषिद्ध मानला गेलेला विषय आता कधी गमतीत, कधी गांभीर्यपूर्वक खासगी वा सार्वजनिक चर्चांचा विषय बनला आहे. सूचकता जाऊन त्यात थेटपणा आला आहे. पण बॉलीवूडमधले केवळ पुरुष नटच नव्हे, स्त्री नट्यासुद्धा न लाजता, न संकोचता पडद्यावर तसंच प्रत्यक्ष जगण्यातही या विषयाला भिडताना दिसताहेत. सनी लिओन नावाच्या इंडो-कॅनेडियन पोर्न स्टारला जुर्म-3, रागिणी एमएमएस-2 आदी चित्रपटांमुळे बॉलीवूड आणि एकूणच प्रेक्षकांमध्ये मिळत असलेली मान्यता सेक्स या निषिद्ध मानल्या गेलेल्या विषयाकडे बघण्याच्या समाजाच्या बदलत्या दृष्टिकोनाचेच द्योतक आहे. आता टीव्हीवर सकाळपासून रात्रीपर्यंत बराचसा ‘अ‍ॅडल्ट’ प्रकारात मोडणारा कंटेंट दिसत असतो. कळत-नकळत लहान मुलांच्या नजरेत येतही असतो. यू/ए असं सर्टिफिकेट असलेल्या बहुसंख्य सिनेमांत चुंबनदृश्यांचा समावेश असतो, लैंगिकतेचा कधी सूचक तर कधी थेट उल्लेख होत असतो, तरीही पूर्वीइतके आता आकांडतांडव होताना दिसत नाही.

‘कॉफी विथ करण’ हा स्टार टीव्हीवरचा बर्‍यापैकी चर्चेत असलेला कार्यक्रम आहे. औपचारिकतेला फाटा देत केलेल्या मैत्रीपूर्ण गप्पा, असं साधारण या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. मुलाखतकार करण जोहरचा हजरजबाबीपणा, संवाद साधण्यातली सहजता, ही या कार्यक्रमाची खासियत. बहुधा हाच एकमेव कार्यक्रम आहे, ज्यात वलयांकित नट-नट्या आडपडदा न ठेवता खर्‍या अर्थाने मोकळं होताहेत. यात विषयाला बंधन नाही. संस्कृती-परंपरांनी आखून दिलेल्या सीमारेषा नाहीत. अशाच एका एपिसोडमध्ये आजच्या पिढीच्या ज्यांना अलीकडच्या भाषेत ‘क्रॉसओव्हर आर्टिस्ट’ म्हणता येईल, अशा फ्रिदा पिंटो (स्लमडॉग मिलनेअर) आणि नर्गिस फाक्री (रॉकस्टार) या दोन नट्या पाहुण्या म्हणून आल्या होत्या. बोलणं नेहमीप्रमाणेच मोकळंढाकळं होतं. बोलण्याच्या ओघात करणने फ्रिदाला प्रश्न केला, जर तुला लग्नासाठी मुलगा हवा, अशी जाहिरात द्यायची असेल तर त्या जाहिरातीच्या ओळी कशा असतील? फ्रिदाने क्षणभर विचार केला. निर्धाराने म्हणाली, वाँटेड ए गाय, हू नॉट लुकिंग फॉर गर्ल हू इज फेअर, लाइटआइड अँड व्हर्जिन... लैंगिकता, रूढी-परंपरा याच्याशी निगडित असलेल्या तिला अपेक्षित असलेल्या-नसलेल्या अशा कितीतरी गोष्टी तिने यातून स्पष्ट केल्या. त्यात उथळपणा नव्हता. सवंगतेची आस जाणवत नव्हती. त्यामुळे तिचं म्हणणं ऐकणार्‍यांना त्यात अवघडलेपण जाणवलं नाही. याच कार्यक्रमात नर्गिसने तिचे मित्र, तिचा प्रियकर, तिच्यावर लेस्बियन असल्याचा संशय या गोष्टींचंही आडपडदा न ठेवता निरसन केलं. मला स्ट्रिप्टिज डान्स बघणं आवडतं, हे मोकळेपणानं कबूलही केलं आणि तशा प्रकारचा नाच करायला तुला आवडेल का? या एरवी आगाऊ वाटणार्‍या प्रश्नावर ‘माझ्यात तेवढा आत्मविश्वास नाही’, असं प्रांजळ उत्तरही दिलं.

फ्रिदा आणि नर्गिसचं हे बोलणं ‘अ‍ॅडल्ट कंटेंट’मध्ये मोडतं; सबब हा कार्यक्रम प्राइम टाइममध्ये दाखवणं योग्य नाही, अशी टूम कुणी तरी काढलीच. तसा तो पहिल्यांदा रात्री 11 नंतर दाखवला गेला; पण काही दिवसांनी रिपीट टेलिकास्ट मात्र ऐन संध्याकाळी साडेसात-आठच्या सुमारास झालाच. त्यावर फारशा प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. तशा त्या उमटण्याचीही शक्यता नाही. एक तर त्यात सवंग, बीभत्स आणि लाज वाटावं असं काहीही नसावं; आणि दुसरं म्हणजे, ‘ओन्ली फॉर अ‍ॅडल्ट’ प्रकाराचं आताच्या पिढीला पूर्वीच्या पिढीइतकं वावडं नसावं.
गंमत म्हणजे, चित्रपट-साहित्य-नाट्य आदी कलाप्रकारांत लैंगिकतेबाबत मोकळेपणा येऊन आता बराच काळ लोटलाय; पण अजून तरी भारतीय संस्कृती-परंपरेचा -हास झालेला नाही. लैंगिकतेबद्दल, लैंगिक व्यवहारांबद्दल प्रांजळपणा आणि मोकळेपणा जपल्यामुळे संस्कृती-परंपरा (अर्थातच समाजातल्या एका वर्गाने संस्कृतीच्या नावाखाली घेतलेलं सोंग आणि चलाखीने वठवलेलं ढोंग मागे सारून) अधिकाधिक समृद्ध होत तर जात नसाव्या?

तसंच असावं बहुधा. कारण, भारतीय संस्कृती-परंपरा समृद्ध नसती, तर सृजनतत्त्वांचा अत्युच्च आविष्कार ठरलेली खजुराहोची मैथुनशिल्पं आकारासच आली नसती...