आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेफी इज बॅक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताला लॉन टेनिसचा चस्का कुणी लावला? आज चाळिशी-पन्नाशीत असलेल्या आणि नुकतंच मिसरुड फुटलेल्या तेव्हाच्या पिढीला विम्बल्डनची ओळख कुणी करून दिली? टेनिसला निदान भारतात ग्लॅमर कुणी मिळवून दिलं? दुसरं-तिसरं कुणीही नाही, केवळ स्टेफी ग्राफने! तेव्हा सोळा-सतरा वर्षांची, कोवळीक संपून शरीराने बहरू लागलेली स्टेफी फिल्मी ड्रिमगर्लपेक्षा शतांशानेही कमी नव्हती. किंबहुना, तिची छाप पाडणारी उंची, स्त्रीत्वाला उभार देणारा बांधा, शांत-संयमी नि रूपवान चेहरा, धारदार नाक, टेनिस कोर्टवरचा मेस्मरायझिंग वावर, पदलालित्य आणि विलक्षण चपळाई... वयात आलेल्या अनेकांसाठी एक्स्टसीच्या पातळीवरचा आनंद देणारी असायची…

तोवर आमच्यापैकी कुणी, लॉन टेनिस या खेळाबद्दल फारसं ऐकलं नव्हतं. परिसरातला एखादाच डॉक्टर किंवा वकील रविवारी सकाळी-सकाळी अंगात व्हाइट टीशर्ट-शॉर्ट, मनगटांना रिस्टबँड, खांद्याला टेनिसची रॅकेट अशा एलिट अवतारात एखाद्या ऑफिसर्स क्लबमध्ये जाताना दिसायचा. या पलीकडे हा खेळ कसा खेळायचा? किती जणांनी खेळायचा? या खेळाचे नियम काय? कशाचा, कशाला पत्ता नसायचा. भारतात जन्मलेल्याला क्रिकेट शिकवावे लागत नाही आणि टेनिस कळत नाही, अशी एकूण परिस्थिती असायची. एरवी, ते कळायलाही काही मार्ग नसता, पण १९८२च्या अप्पूवाल्या दिल्ली एशियाड पाठोपाठ हळूहळू घराघरात क्राऊन आणि बुशचे टीव्ही आले, तसं आमचं जगाबद्दलचं ज्ञान विस्तारू लागलं. चित्रहार, साप्ताहिकी, स्पोर्ट‌्स-विक आणि रविवारचे सिनेमे एका घरी गर्दी करून बघण्याचे नित्य बेत ठरू लागले.

खरं तर क्रिकेटच्या वेडामुळे रविवारी चारनंतर सुरू होणार्‍या स्पोर्ट‌्सविकने अनेकांना टीव्हीसमोर बसणं भाग पाडलं होतं. पण त्यात क्रिकेट सोडून बाकीच्याच भानगडी जास्त दिसत होत्या. म्हणजे, कधी त्यात आम्हाला टेबल टेनिसची ओळख झाली, कधी बॅडमिंटन स्पर्धेचे हायलाइट दिसू लागले, कधी चिखलामातीत सुरू असलेल्या क्राॅसकंट्री स्पर्धा बघायला मिळू लागल्या. त्यातच एक दिवस हे लॉन टेनिसचं भूत आमच्या पिढीच्या मानगुटीवर बसलं. ऊन-पावसात न्हाऊन निघणारं हिरवंगार टेनिस कोर्ट, स्टँडमध्ये शिस्तीत बसलेले गोरे प्रेक्षक आणि त्यांची तितकीच शिस्तबद्ध दाद, चतुर आणि चपळ बॉलबॉइज आणि गर्ल्स, हेडमास्तरांसारखे भासणारे नेटच्या मधोमध उंच खुर्चीवर बसणारे रेफ्री, मॅकेन्रोचा अपवाद वगळता कमालीचे डिसेंट खेळाडू, सरतेशेवटी विजेत्यांना गौरवणारी इंग्लंडची ठेंगणीठुसकी पण दिमाखदार राणी आणि उंचपुरा देखणा राजपुत्र… असं सगळं आम्ही तोवर पाहिलंच नव्हतं. नाही म्हणायला, विजय आणि आनंद अमृतराज, रामनाथन आणि रमेश कृष्णन ही नावं कानावरून गेली होती, पण टु बी व्हेरी फ्रँक, त्यांच्याबद्दल कुणाला ना आकर्षण होतं, ना कुतूहल.

पण, विम्बल्डनचा पडदा उघडला आणि जॉन मॅकेन्रो, जिमी कॉनर्स, स्टिफन एडबर्ग, बोरिस बेकर हे राजबिंडे दिसणारे खेळाडू आणि क्रिस एव्हर्ट लॉइड, मार्टिना नवरातिलोव्हा, गॅब्रिएला साबातिनी आणि अर्थातच स्टेफी ग्राफ या लावण्यखणी महिला खेळाडूंचं जादुई जग आम्हाला खुलं झालं. क्रिस एव्हर्ट काय, गॅब्रिएला काय, या खेळाडू सौंदर्यवान होत्याच, पण स्टेफीमध्ये त्याहून अधिक काही होतं. तिच्यामुळेच आम्हाला लव-फिफ्टिन आणि लव-थर्टीचा अर्थ कळला. ड्यूस म्हणजे काय, अ‍ॅडव्हाण्टेज म्हणजे काय, हे कळलं. पुरुषांचे सामने पाच सेटमध्ये आणि महिलांचे सामने तीन सेटमध्ये का, हे समजलं. त्यात आपल्याला क्रिकेटबरोबर आणखी एक विदेशी तोही राजेशाही खेळ कळला याचा आनंद होताच; पण स्टेफीसारखी सौंदर्यवती आपल्या आयुष्यात आली, याचा आनंद त्याहून दुप्पट होता.

त्यामुळे स्टेफी आली की, अनेकांच्या हृदयाची धडधड वाढायची. तिच्या हालचालीत एक लय, एक नजाकत असायची. तिचा बॅकहँड, तिचा फोरहँड, तिची अेस सर्वीस "माइंडब्लोइंग' या सदरात मोडायचं. कुणाची नजर तिच्या सोनेरी केसांच्या पोनीटेलवर असायची, तर कुणाची तिच्या मनगटावरच्या नाजूक घड्याळाकडे. कुणाला तिचा हेडबँड आवडायचा, तर कुणाला तिने त्या दिवशी घातलेला टी-शर्ट. धुळ्याला भाऊ पावसकरच्या घरी आम्ही सगळे मित्र-मित्र स्टेफीची मॅच पाहण्यासाठी गर्दी करायचो. प्रत्येकाला मॅच पाहण्याचं खरं कारण ठाऊक असायचं. नजरेनेच आम्ही एकमेकांच्या मनात दडलेले हेतू अचूक ओळखायचो. अर्थात, त्या काळी फोटो जर्नालिस्ट आणि प्रेक्षकांना आजच्यासारखा महिला टेनिसपटूंची चड्डी बघण्याचा सोस नसायचा. टेनिसपटू वाकली की, कॅमेरा कधी टाइट-क्लोजअपमध्ये जातो, याची प्रतीक्षा नसायची. तशी खरं तर कुणाला गरजही वाटायची नाही. कारण, केवळ स्टेफीचं कोर्टवर असणंच बघणार्‍याला झिंग आणायचं. ती बॉल बॉइजशी वागते-बोलते कशी, दोन सेटमधल्या ब्रेकमध्ये नेमकं करते काय, याकडेच सगळ्यांचं बारीक लक्ष असायचं. बहुधा, तीन सेटमध्ये गेम चालायचा. पण वर्चस्व स्टेफीचंच असायचं. जिंकल्यानंतरही ती बेभान उधळायची नाही. बहुतेक वेळा तिचे प्रशिक्षक वडील पीटर ग्राफ व्हीआयपी स्टँडमध्ये हजर असायचे. मॅच जिंकल्यानंतर त्यांच्याकडे धावत जाऊन त्यांना हलकीशी मिठी मारणे, सेंटर कोर्टच्या चारही अंगांना बसलेल्या प्रेक्षकांना हात उंचावून अभिवादन करणे, आणि सरतेशेवटी राणीच्या हस्ते स्वीकारलेली विजेतेपदाची भलीमोठी वर्तुळाकार नक्षीदार तबकडी उंचावणे हे सगळं बघणार्‍याला खलास करून टाकायचं. शिस्तबद्ध टाळ्यांच्या कडकडाटात जेव्हा ती कोर्ट सोडायची, तेव्हा एक वर्ष वाट पाहायला लागणार, या विचाराने मन खट्टू व्हायचे… कारण, अमेरिकन आणि फ्रेंच ओपनमध्ये जरी ती दिसली, तरीही तिचं सम्राज्ञीपण विम्बल्डनमध्येच अधिक उजळून निघतं, यावर आमचं एकमत असायचं.

मार्टिना नवरातिलोव्हाने १६७ टायटल्स जिंकले, क्रिस एव्हर्टने १५७ टायटल्स जिंकले, आम्हाला फरक पडायचा नाही. १०७ टायटल्स जिंकणारी स्टेफी आमच्यासाठी सर्व काही असायची. १९८८, १९८९, १९९३, १९९५, १९९६ अशा तब्बल पाच वेळा तिने तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या, याचंच आम्हाला मोठं अप्रूप असायचं. स्टेफीला हॉलीवूडच्या सिनेमात हिरोइनचा रोल ऑफर झालाय, ‘प्लेबॉय’वाल्यांनी ऑफर दिलीय, अशा काहीबाही अफवा कुणी घेऊन आला की, आमचे चेहरे उजळायचे. कुणाच्या तरी घरात गेल्यानंतर स्टेफीचं पोस्टर पाहिलं, की आम्ही भरून पावायचो. तसं तिचा देशबंधू बोरीस बेकर त्याच्या रांगडेपणाकडे झुकणार्‍या अँटिक करामतींनी आमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करायचा, पण आमचं मन स्टेफीला सोडचिठ्ठी द्यायला राजी व्हायचं नाही.

ज्या स्टेफीने विम्बल्डनला खर्‍या अर्थाने ग्लॅमर मिळवून दिलं, टेनिस हा खेळ घराघरांत पोहोचवला, मुख्य म्हणजे टेनिस कोर्टवर आपला आब आणि अभिमान जपला, तीच वय वर्ष ४६ झालेली स्टेफी आज केरळ टुरिझम आणि आयुर्वेदाची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर झालीय. आमच्या आठवणींचं एक वर्तुळ पूर्ण झालंय. जुना काळ परतून येत नसला तरीही त्या काळात टेनिस विश्वात सम्राज्ञीपद भूषवलेली स्टेफी पुन्हा एकदा आमच्या मनोविश्वात स्थान मिळवती झालीय…
बातम्या आणखी आहेत...