आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष लक्ष पावलं...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोसम कोणताही असो, प्रहर कोणताही असो, महानगरी कोलाहलात सगळी माणसं एकसारखीच भासतात. एकाच साच्यात घडवलेली. एकाच उद्देशाने, एकाच दिशेला धपापत जाणारी. लांबून कुणीतरी कमांड दिल्यासारखी. पण पोटात असंख्य गुंते घेऊन जगणारं अक्राळविक्राळ शहर मागे पडलं की माणसा-माणसांतलं, त्यांच्यातल्या हालचालींचं वेगळेपण लक्ष वेधून घेतं. तुम्ही मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिकच्या दिशेने निघाला असलात तर दिवसाच्या कोणत्याही वेळी महामार्गाच्या कडेकडेने, अंतरा-अंतरावर कितीतरी तरुण-तरुणी, बर्‍याच मध्यमवयीन बाया, माणसं जथ्या-जथ्याने, १५-२० जणांच्या गटा-गटाने पदयात्रा करत शिर्डीला जाताना नजरेस पडतात. कमरेला पाऊच लावलेल्या बहुतेक सगळ्यांनीच आपापल्या मंडळांची ओळख सांगणारे रंगीबेरंगी टी-शर्ट घातलेले असतात. काहींनी डोक्याला भगव्या पट्ट्या बांधलेल्या असतात. काहींनी उन्हापासून बचाव व्हावा म्हणून क्रिकेट खेळताना वापरतात त्या फेल्ट हॅट घातलेल्या असतात, तर काही चक्क डोक्याला टॉवेल बांधून असतात. आता मोबाइलचं युग असल्यामुळे बहुतेकांच्या हातात हमखास मोबाइल असतात. काही कानात इअर-फोन लावून चालत असतात. चालणार्‍यांमध्ये कित्येक जण अनवाणी यात्रा करत असतात. त्यातलाच कुणीतरी एखादा खांद्यावर ध्वज घेऊन ऐटीत पुढे चालत असतो. मागे साईबाबांची पालखी वाहणारे त्याचे सहकारी नेटाने मार्गक्रमण करत असतात.

काहींची पावलं जड झालेली असतात. चेहर्‍यावर दमल्याचे भाव असतात, काही दुसर्‍याला चिअर-अप करत पुढे जात असतात. जथ्याच्या पुढे वा मागे पदयात्रींसाठी आवश्यक शिधा घेऊन धिम्या गतीने धावणारा टेम्पोही असतोच. काही गटांनी साउंड सिस्टिमचीही व्यवस्था केलेली असते. गटांचे थांबे ठरलेले असतात. पदयात्रेत सामील झालेल्यांची शुश्रूषा करणार्‍या सेवाभावी संस्था न चुकता आपलं योगदान देत असतात. पदयात्रेदरम्यानचे मुक्कामातले बरे-वाईट अनुभव, अनवाणी चालणार्‍यांच्या पायांना होणार्‍या जखमा हे सगळं हल्ली त्या-त्या क्षणी व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर ताबडतोब अपलोडही होत असतं.

साधारण नोव्हेंबर ते मार्च हा राज्यभरातून शिर्डीकडे निघणार्‍या पदयात्रांचा मोसम असतो. रोजगार-बेरोजगार, व्यावसायिक-नोकरदार, आयटी प्रोफेशनल्स अशा सगळ्या प्रकारच्या लोकांचा समावेश यात असतो. कुणाची शिर्डीच्या साईबाबांवर जिवापाड श्रद्धा असते, कुणाला साहस म्हणून हा प्रयोग करून बघायचा असतो. कुणाला स्वत:च्या शारीरिक-मानसिक क्षमतांची परीक्षा घ्यायची असते. पण स्वार्थाबरोबर परमार्थही साधला जावा, हीच बहुतेकांची इच्छा असते. दरवर्षी मुंबईहून अंदाजे शंभर-दीडशेच्या वर मंडळं अशा प्रकारच्या पदयात्रांचं आयोजन करतात. कमीत कमी सहा ते आठ आणि जास्तीत जास्त १० ते १२ असा पायी शिर्डीला पोहोचण्याचा कार्यक्रम असतो. पदयात्रेत सामील होणारे बहुतांश तरणेताठे असतात, वयाने मोठे असले तरीही अंगापिंडानं व्यवस्थित असतात. चालीत उत्साह आणि अनेक प्रसंगी आक्रमकपणाही असतो. राजकीय नेत्यांच्या जाहिरातीपलीकडे जनजागृतीच्या पातळीवर त्यांच्याकडून ठोस संदेश मिळत नसल्यामुळे बघणार्‍यांना प्रश्नही पडत असतात,
काही काम-धंदे आहेत की नाही यांना?
पायी चालत जाण्याइतका वेळ मिळतो तरी कसा?
पदयात्रेच्या माध्यमातून होणार्‍या संभाव्य जनजागृतीची कल्पना आहे की नाही यांना?

प्रश्न एका अर्थाने योग्यही असतात. पण माणसाचं जगणं निर्हेतुक असूच नये का? काही तरी मिळवण्यासाठी किंवा देण्यासाठीच त्याने घराबाहेर पडावं का? असेही प्रतिप्रश्न एखादा विचारतो. मतांचा स्वीकार-नकार उद‌्भवत असताना नजरेसमोर घडत असलेली पदयात्रेची मूर्त कृती मात्र सहसा कुणालाच नाकारता येत नाही. ती मनावर ठसतेच ठसते.
एरवी, आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या ओढीने पदयात्रा करत लाखो भाविक दरवर्षी नेमाने पंढरपुरात एकवटतात. धार्मिक-अाध्यात्मिक हेतूंनी प्रेरित ही कृती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक-सामाजिक वैभवात भर टाकत राहते. त्याचं प्रतिबिंब साहित्य-नाटक-चित्रपट-चित्रकला-शिल्पकला यांत सातत्याने पडत असतं. अर्थात, आपल्याकडे पदयात्रा जितक्या धार्मिक-आध्यात्मिक हेतूंनी निघाल्या आहेत किंवा निघतात, तितक्याच त्या सामाजिक-राजकीय-पर्यावरणीय हेतूंनीही काढल्या जातात किंवा काढल्या गेल्या आहेत.

महात्मा गांधींनी आरंभलेल्या स्वातंत्र्यलढ्यात पदयात्रा हे महत्त्वाचं अंग होतं. मिठाच्या सत्याग्रहासाठी त्यांनी अनुसरलेला साबरमती आश्रम ते दांडी गाव अशा ३९० किमीचा ‘दांडी मार्च’ हे त्याचं जिवंत उदाहरण होतं. याच पदयात्रेद्वारे त्यांनी सत्य आणि अहिंसेचा वैश्विक मंत्र प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवला होता. पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर भू-विषमतेचा उग्र प्रश्न हेरून आचार्य विनोबा भावेंनी माणसं जोडत, माणसांची मनं जोडत म्हैसूर, आंध्र, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांतून भूदान चळवळ राबवली, ती मुख्यत्वे पदयात्रेच्या माध्यमातूनच. साठच्या दशकात ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकरांनी अन्नस्वातंत्र्याचा विचार समाजात रुजवण्यासाठी वेरूळ ते मुंबई अशी साडेतीनशे मैलांची ‘श्रीकैलाश ते सिंधुसागर’ (याच पदयात्रेतील अनुभवांवर आधारित दि. बा. मोकाशी यांचं ‘अठरा लक्ष पावलं’ नावाचं महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज ठरलेलं पुस्तक ‘मौज’तर्फे प्रकाशित झालं होतं.) ही पदयात्रा काढली होती.

साठच्याच दशकात, गांधीजी आणि विनोबांपासून प्रेरणा घेऊन ‘चिपको’ आंदोलनाचे प्रणेते, पर्यावरणवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांनी पदयात्रा हेच पर्यावरणविषयक जनजागृतीचं मुख्य साधन बनवलं होतं. त्यांची १३०० कि.मी.ची उत्तराखंडच्या दर्‍या-पर्वतांतली १२० दिवसांची पदयात्रा जनचेतना जागवून गेली. पर्यावरणाचा जागर करताना याच पदयात्रेत त्यांना पहाडी प्रदेशातल्या गावोगावी पसरलेल्या दारूच्या व्यसनाचंही भान आलं. त्यातूनच काही यशस्वी उपक्रमही त्यांनी राबवले. सत्तरच्या दशकात संपूर्ण क्रांतीचा नारा देत समाजाचे राजकीय भान जागवताना लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे पदयात्रा हेच मुख्य अस्त्र होते आणि ऐंशीच्या दशकाच्या प्रारंभी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी चार हजार कि.मी.ची पदयात्रा काढून तळागाळातल्या जनतेचे प्रश्न समजून घेत राजकारणात स्वत:चे स्थान पक्के केले होते.

त्यानंतर पंजाबातल्या रक्तरंजित खलिस्तान चळवळीत होरपळ झालेल्यांना दिलासा आणि शस्त्रास्त्र हाती घेतलेल्यांना उपरती यावी, या हेतूने सिनेअभिनेते, राजकीय नेते स्व. सुनील दत्त यांनी ८०च्या दशकात काढलेली मुंबई ते अमृतसर (सुवर्णमंदिर) ही पदयात्रा जनतेच्या अशीच स्मरणात राहिली. इतकेच कशाला, समाजवादी/सर्वोदयी आणि कामगार चळवळीत सामील डाव्या विचारांच्या नेत्यांसाठी पदयात्रा हेच वेळोवेळी महत्त्वाचे अस्त्र ठरत गेले. १९९०च्या डिसेंबर महिन्यात मेधा पाटकरांनी मध्य प्रदेशातल्या राजघाटपासून हाती घेतलेल्या नर्मदा बचाओ आंदोलनाला २२ दिवसांच्या पदयात्रेच्या माध्यमातूनच प्रारंभ केला होता. त्याच दरम्यान पाण्याच्या प्रश्नावर राजस्थान पिंजून काढताना राजेंद्र सिंग यांनी देशाचे लक्ष वेधून घेतलं होतं.

हेही सर्वज्ञातच की, वेदांचा प्रसार करण्यासाठी कधी काळी शंकराचार्यांनी पदयात्रेचाच मार्ग अनुसरला होता. अहिंसा आणि करुणेचा संदेश पोहोचवण्यासाठी बुद्ध आणि भगवान महावीरांनी पदयात्राच केली होती. येशूने जेव्हा क्षमाशीलता आणि प्रेमाचा संदेश सर्वदूर पोहोचवला, तेव्हाही त्याच्या प्रसाराचे मुख्य माध्यम पदयात्रा हेच होतं.

एकूणच, औद्योगिक क्रांतीपूर्व काळात, छपाई माध्यमाचा उदय होण्यापूर्वी समाज आणि संस्कृतीच्या उत्थानात पदयात्रेच्या कृतीचं स्थान अनन्यसाधारण राहिलं आहे. अर्थातच आजवरच्या पदयात्रांचे स्वरूप जितके निराळे, स्वभावधर्मही तितकाच भिन्न राहिला आहे. धार्मिक-अाध्यात्मिक असो वा राजकीय-सामाजिक; विशुद्ध हेतूंनी काढलेल्या पदयात्रांचा मुख्य उद्देश आचार-विचारांचा प्रसार-प्रचार हे असले तरीही त्यामागे स्वत:मधल्या धैर्य, संयम आणि चिकाटी या गुणांची पारख करणे, माणूस म्हणून आपल्या क्षमता जोखणे आदी हेतू प्रारंभापासून अनुस्यूत होते.

गांधीजी असो वा विनोबा-बहुगुणा; पदयात्रांच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक उद्दिष्ट गाठताना एका पातळीवर स्वत:मधल्या शारीरिक-मानसिक क्षमताही जोखत होते. सर्वसामान्यांच्या वेदना आणि व्यथा समजून घेत होते. मुख्यत: पारंपरिक शिक्षणापलीकडच्या वास्तव जगाची ओळख करून घेत होते. त्यातूनच त्यांच्या विचार-आचारांत प्रगल्भता येत होती. सध्या पायी शिर्डीकडे मार्गक्रमण करत असलेल्या गावोगावच्या पदयात्रांमधून व्यापक पातळीवर समाजप्रबोधनात्मक फारसं हाती लागत नसलं, तरीही डोळे आणि कान उघडे ठेवून जाणार्‍या पदयात्रींना या निमित्ताने स्वत:मध्ये दडलेल्या शारीरिक-मानसिक क्षमतांचा शोध लागला, तरीही आत्मशोधाच्या पातळीवर बरंच काही साधलं, असं म्हणता येईल.
deshmukhshekhar101@gmail.com