आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबाजी का ठुल्‍लू!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बौद्धिक सुख देणारा निरागस विनोद हा तद्दन नॉस्टॅल्जिया आहे. सध्याचा जमाना ऐकणा-याला किक बसवणा-या ‘वाह्यात’ आणि ‘पांचट’ विनोदांचा आहे. हा विनोद आक्रमक, अगोचर आणि ब-याच अंशी अभद्रही आहे. उद्धटपणा हा या विनोदाचा स्थायीभाव आहे. ज्याला हा उद्धटपणा व्यवस्थित जमतो, ज्याच्या अंगी हजरजबाबीपणा आहे, आणि ज्यामध्ये विनोद निर्मितीसाठी समोरच्या माणसाचा पाणउतारा करण्याची क्षमता आहे, तो मनोरंजन विश्वाचा राजा आहे. एंटरटेनमेंट ही एकच मागणी असलेले हे जग (यात मुलगा-मुलगी, आई-बाप, आजी-आजोबा असे सगळे आले.) त्याने निर्माण केलेल्या विनोदी लाटांत हरवून जायला कमालीचे इच्छुक आहे. कपिल शर्मा हा या घडीचा छोट्या पडद्यावरचा कॉमेडी किंग आहे. त्याचा विनोद ऐकून प्रेक्षकांतला एक वर्ग गडबडा लोळणा-यांचा आहे, तर एक वर्ग शिरशिरी येणा-यांचाही आहे. अर्थातच, गडबडा लोळणा-यांची संख्या भलीमोठी असल्यामुळे बॉलीवूडचे बडे बडे स्टार्स कपिल शर्माच्या प्लॅटफॉर्मवर एकदा नव्हे, अनेकदा यायला एका पायावर तयार आहेत. आगामी सिनेमांची जाहिरात करायची असेल तर कपिल शर्माचा ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ हा या घटकेला सर्वाधिक मायलेज मिळवून देणारा शो आहे. केवळ एकटा कपिलच नव्हे तर या कॉमेडी शोमध्ये झळकणारे बहुतेक सगळे कलावंत जोरदार फटकेबाजी करताहेत. शाब्दिक, आंगिक, वाचिक, व्यंगात्मक, प्रासंगिक वगैरे टाइपातले विनोद करून बिट्टू, दादी, बुवा, गुथ्थी, पलक अशी कॅरेक्टर्स फेसबुकवर अक्षरश: धुमाकूळ घालताहेत. या सगळ्यांची स्वतंत्र पेजेस आहेत, या पेजेसचे स्वतंत्र फॅन्स आहेत. कपिल शर्माच्या तोडीची लोकप्रियता गुथ्थी नावाचे पात्र रंगवणा-या सुनील ग्रोवरला मिळतेय. सात्त्विकतेचा आग्रह धरणा-यांच्या (आणि सात्त्विकतेची झूल पांघरलेल्यांच्याही) मते, कपिल शर्मा आणि कलावंतांनी केलेल्या विनोदाची शेल्फ व्हॅल्यू शून्य आहे. त्याचा दर्जा बहुतेककरून पातळी सोडलेला (खरे तर खालावलेला) आहे. त्यांच्या दृष्टीने कपिल शर्मा म्हणजे आचरटपणाचा कळस आहे. कुणी काहीही म्हटले तरीही, या घटकेला कपिल शर्मा हा छोट्या पडद्यावरचा सुपरस्टार आहे. इथे ही घटिका महत्त्वाची आहे. कारण, आणखी वर्षभरानंतरही त्याच्या कॉमेडीचा झपाटा असाच कायम राहील, त्याच्या फॅन्सची संख्या अशीच वाढतच राहील, अशी गहराई त्याच्या विनोदात सध्या तरी जाणकारांना दिसलेली नाही. पण तरीही, त्याला बहाल झालेल्या कॉमेडी किंग स्टेटसबाबत या जाणकारांत दुमत नाही.
विनोदाचे उगमस्थान असलेल्या सरदार मंडळींच्या अमृतसरहून आलेल्या कपिल शर्माचं एकूण व्यक्तिमत्त्व कॉमेडियन या पदनामाला शोभलसं नाही. व्यंगात्मक विनोदाच्या नावाखाली भयानक आचरटपणा करण्यातही त्याला फारसा रस दिसत नाही. त्याच्या बोलण्याला विलक्षण वेग आहे. एकमेकांच्या पायात पाय अडकून पडावेत, असे त्याचे शब्दोच्चार आहेत. यातूनही विनोदाची निर्मिती होत नाही. त्याची निरीक्षणशक्ती मात्र इतर अनेक कसलेल्या कॉमेडियनप्रमाणे जोरदार आहे. इतर कॉमेडियनप्रमाणेच त्यालाही स्वत:वर विनोद करायला आवडतं, पण एवढ्याने आॅडियन्सला बांधून ठेवता येत नाही. कपिल शर्मा हे सगळं करतोच; पण तो ज्या पद्धतीने हजरजबाबीपणा दाखवतो, तो दाखवताना तो ज्या प्रकारे समोरच्या माणसाचा यथेच्छ पाणउतारा करतो, त्याला तोड नसते. किंबहुना, तेच त्याचे बलस्थान ठरते. समोर बसलेल्या प्रेक्षकांनाही कपिलकडून पाणउतारा करवून घ्यायला जाम आवडतं. म्हणजे, कार्यक्रमात आलेल्या सेलिब्रिटीला प्रश्न विचारणा-या प्रेक्षकाचे पोट सुटलेले असेल तर कपिल त्याला, ‘भाईसाब थोडा पेट घर में रखके आया करो...’ असा सल्ला देतो. प्रश्न विचारणा-याचं टक्कल असेल तर ‘भाईसाब आप मुँह कहां तक धोते हो...’ असा प्रश्न तो त्याला विचारतो आणि प्रेक्षकांत हास्याचा स्फोट होतो. कपिल शर्मा प्रेक्षकांचीच विकेट घेतो असं नाही; तर कार्यक्रमात आलेल्या सेलिब्रिटींनाही तो सोडत नाही. शाहरुख खान-सलमान खानसारखे बडे बडे स्टार्स कपिलकडून हजेरी घेणं पसंत करतात.
एरवी, स्वत: प्रेक्षकांचा ताबा घेण्यापूर्वी तो इतर कलाकारांच्या मदतीने प्रहसन सादर करून स्टेजवर धिंगाणा घालतो. प्रत्येक नव्या एपिसोडमध्ये हे कलावंत नवे नाटकच सादर करतात. कधी ते भरकटते, कधी प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत धरूनही ठेवते. त्यात, अर्थात उपासनासिंग (बुवा), दादी (असगर अली), गुथ्थी (सुनील ग्रोवर) हे कलाकार वर्चस्व गाजवतात. तेथे कपिल स्वत:हून मागे झालेला दिसतो. प्रचंड ऊर्जेसह सादर होणा-या प्रहसनाचा दर्जा अनेकदा खूप वरचा असतो, अनेकदा अगदी खालचा दर्जासुद्धा गाठलेला पाहायला मिळतो. पण कपिलच्या तोंडचा ‘बाबाजी का ठुल्लू’ हा आचरट डॉयलॉग, अतरंगी दादीचे इत्तुसा था... तू इत्तुसा... म्हणत ओरडणे, बिट्टू कौन है ये आदमी... असं बुवाने तारस्वरात विचारणे, स्वत:ची आणि इतरांची ओळख करून देण्याचा सोस असलेला गुथ्थीने एकसुरी आवाजात गुथ्थी-पलक-पलक-गुथ्थी-कॅमेरा-आॅडियन्स-म्हणणे... क्षणोक्षणी विनोदाची निर्मिती करत राहते. त्यातील गुथ्थी हे पात्र रंगवणारा सुनील ग्रोवर नावाचा कलावंत ज्या सहजतेने वयाने वाढलेल्या पण बुद्धीने न वाढलेल्या इनोसंट मुलीचं बेअरिंग घेतो, ते लाजवाब असते. एरवी, कपिल शर्मा एकसुरी होण्याचा धोका इतर पात्रे व्यवस्थित टाळताना दिसतात. मुख्य म्हणजे, स्टेजवर जे काही चाललं आहे ते मनापासून एन्जॉय करत असल्याचं प्रत्येकाच्या चेह-यावर झळकत असतं.
मध्यंतरी फिल्मसिटीवर उभारलेला या कार्यक्रमाचा सेट आगीत जळून खाक झाला. पण या पठ्ठ्याने शोमध्ये खंड पडू नये म्हणून लोणावळा येथे तात्पुरता गावातल्या घराचा सेट उभारला. आमच्या शहरातल्या घराला आग लागल्याने आम्ही काही दिवसांसाठी दादीच्या गावातल्या घरी आलोय, असं सांगत धिंगाणा कायम ठेवला. तिथेही अक्षयकुमार, कंगना राणावतसारख्या बड्या स्टार्सनी हजेरी लावली. आज कपिल शर्मा हे छोट्या पडद्यावरचे खणखणीत नाणे बनले आहे. अल्पावधीत पैसा, प्रसिद्धी आणि लोकप्रियता त्याच्या पायाशी लोळण घेऊ लागली आहे. निर्माता तर तो बनलाच आहे. लेखक, गायक हीदेखील त्याची फारशी प्रकाशात न आलेली ओळख आहे. मोठ्या पडद्यावर पाऊल न ठेवता टेलिव्हिजन इंडस्ट्रीत स्वत:चा दबदबा निर्माण करणारा बहुधा तो अलीकडच्या काळातला पहिला विनोदवीर ठरला आहे. विनोदाची धार कमी झाली की गायन- लेखनाचा पर्याय त्याला लाइमलाइटमध्ये ठेवण्यास पुरेसा आहे...

deshmukhshekhar101@gmail.com