आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चमचेबहाद्दूर (शेखर देशमुख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ आणि केवळ अनुपम खेरांजवळ विरोधकांचे सतत टार्गेट होण्यातले अंतरीचे दु:ख तरी बोलून दाखवत असावेत; किंवा अनुपम खेर, ज्याला इंग्रजीत ‘इमोशनल फुल’ किंवा मराठीत ‘भावूक वेडा’ म्हणतात, तसे तरी असावेत.

गेले साधारण सहा-एक महिने टीव्ही-ट्विटर-पेपर-जाहीर कार्यक्रम या सगळ्यांतून लोकांपुढे एक मिशन म्हणून येत राहणं, भाजप आणि मोदींची बाजू लावून धरणं, आदी कामं अनुपम खेर निष्ठेने करत आले आहेत. गंमत म्हणजे, खेर यांचे मित्र आणि अहमदाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकलेले फिल्म इंडस्ट्रीतले दुसरे हरहुन्नरी नट भाजप खासदार परेशभाई रावल या धुमश्चक्रीत मात्र शांत-निवांत आणि बऱ्यापैकी अज्ञात आहेत. तर विरोधाभास असा की, भाजपचे खासदार आणि खेरांचे इंडस्ट्रीतले सीनिअर शत्रुघ्न सिन्हांची मोदी विरोधात धडाडणारी तोफ थांबायचं नाव नाही. असहिष्णुतेविरोधात बोंब ठोकणाऱ्या डाव्या ‘इंटुकां’ना शिंगावर घेणं असो, की जेएनयू प्रकरणात देशविरोधी घोषणाबाजीची तथाकथित घटना असो, अनुपम खेर भाजपचे अधिकृत प्रवक्ता नसतानाही, केवळ ‘देशहित’ नजरेपुढे ठेवून नेपोलियनच्या त्वेषाने शत्रूपक्षावर तुटून पडत आहेत. त्यात विस्थापित काश्मिरी पंडितांचा प्रश्न त्यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि जिवाभा‌वाचा आहे.

पण अगदी अलीकडेपर्यंत म्हणजे, मोदी सरकार सहिष्णू-असहिष्णू वादामुळे अडचणीत येईपर्यंत खेर काश्मिरी पंडित, त्यातही विस्थापित काश्मिरी पंडित आहेत, हे फॅन लोकांना ठाऊकच नव्हतं. म्हणजे, खेर हे मूळचे काश्मिरी पंडित आहेत, हे सत्य(?)असलं तरीही आपण पीडित पंडित आहोत, हे खेर यांच्या बोलण्यातून सहसा यापूर्वी आलं नव्हतं. फॅन लोकांसाठी ते थंडगार-बर्फाळ सिमल्याहून मुंबईला नशीब काढायला आलेले एक गुणी, व्यवहारी, आणि संधीचं सोनं करणारे नट होते. अर्थात, जसं स्ट्रगलर लोक अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान बनायला मायानगरीत येतात, तसं कुणी अनुपम खेर बनायला येत नसलं, तरीही थिएटर बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांच्याबद्दल समवयस्क आणि नवोदित कलाकारांमध्ये बऱ्यापैकी आदराची भावना होती. पडद्यावरच्या अभिनयात कमी होत चाललेला वेळ अॅक्टिंग स्कूल सुरू करून ते भरून काढत होते. म्हणजे, एकेकाळचा एनएसडीचा विद्यार्थी शिक्षक बनून कलेच्या विकासासाठी रक्त आटवतो, हे पाहणं अनेकांसाठी भलतंच पॅट्रिऑटिक होऊ लागलं होतं.

एकूण सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. विक्रमी मताधिक्याने मोदी सरकार दिल्लीत स्थिरस्थावर झालं होतं. पुढचे दीड-दोन वर्षं सर्व जगभर वाजत-गाजत राहिलं होतं. मोदी हे जगाचे नेते आणि भारत विश्वगुरू हे स्वप्न यशस्वीरीत्या पेरलं जात होतं. पण मुंग्यांनी मेरूपर्वत गिळावा, तसं घडत गेलं. अचानक शक्तिमान मोदींपुढे ‘इमेज क्राइसिस’ उभा राहिला. एक दिवस ‘काश्मिरी आयडेंटीटी’ घेऊन अनुपम खेर मैदानात उतरले. मोदींसारखा खमका नेता पंतप्रधानपदी असताना काश्मिरी पंडितांना कधी नव्हे ते सुरक्षित वाटायला हवं, त्यांचा जगण्यावरचा, भारत सरकारवरचा विश्वास वाढायला हवा. पण तसं न होता खेर पंडितांवरच्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरले. कुणाच्या विरोधात तर सत्ताधारी मोदींच्या नव्हे, मुस्लिमांचं लांगूलचालन करणाऱ्या विरोधकांच्या. म्हणजे, मोदींच्या राजकीय शत्रूंच्या. क्षणाक्षणाला निमित्त बदलत गेलं. खेर यांचे शत्रू बदलले नाहीत, वाढले मात्र नक्की. त्यातूनच दिवस-रात्र टीव्ही-ट्विटरवर आग ओकणं सुरू झालं. कधी बोचरे, कधी तिखट, तर कधी विखारी शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडू लागले. मोदींंना टार्गेट करणाऱ्या विरोधकांना, त्यातही मुख्यत: राहुल गांधी यांना अंगावर घेत राहणे, हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम होऊन गेला. मात्र, यातही त्यांचं एफटीआयआय वादात अडकलेल्या गजेंद्र चौहानना टीव्ही चर्चांदरम्यान जाहीरपणे लायकी दाखवून देणं लक्षात राहिलं, तसंच बीफ बाळगल्याच्या संशयावरून अखलाखची जमावाकडून हत्या झाल्यानंतर, तसंच हैदराबाद विद्यापीठातल्या रोहित वेमुलाने आत्महत्या केल्यानंतर अचानक सोयीने मौनात जाणंही खटकत राहिलं. तरीही मी सर्वसामान्य नागरिकाच्या भूमिकेतून या लढाईत उतरलोय, असं ते वारंवार सांगत राहिले. पण ‘सेव्हन रेसकोर्स’शी असलेली त्यांची सलगी कधी लपून राहिली नाही.

असहिष्णुतेविरोधात रस्त्यावर उतरलेल्या डॉ. गणेश देवींसारख्या मृदू-मवाळ शिक्षक-साहित्यिकांना भेटायला पंतप्रधान मोदींना कधी वेळ मिळाला नाही. पण मधुर भांडारकर, अशोक पंडित या इतर मोदीप्रेमी इंडस्ट्रीवाल्यांसोबत दिल्लीत ‘ढोंगी साहित्यकारों को, जुते मारो सालों को…’ ‘प्रेस्टिट्यूट सक -अप टु युरोपिअन्स, प्रेस्टिट्यूट गो टु हेल…’ अशी वचनं लिहिलेले फलक हाती घेतलेल्यांच्या ‘मार्च फॉर इंडिया’चे नेतृत्व करणाऱ्या खेरना पंतप्रधानांनी खास बाब म्हणून भेटीची वेळ देऊन घरी बोलवून घेतलं. भारताच्या इभ्रतीसाठी पुढे आलेल्या खेरप्रभृतींचं म्हणणं पंतप्रधानांनी अत्यंत शांतपणे, कान देऊन ऐकलं. ‘भारतीय संस्कृती या सोकॉल्ड ‘टॉलरन्स’पेक्षा मोठी आणि सर्वार्थाने सहिष्णू आहे, म्हणाले. बहुधा, वर्णव्यवस्था राबवून असहिष्णुतेचं दर्शन अरबी वा पाश्चिमात्य संस्कृतीने घडवलं होतं, असं त्यांना त्यातून सुचवायचं होतं.
कुणी इनटॉलरन्सची तक्रार करत दांडगटांविरोधात उभे ठाकणे, हेही विधायक; आणि देश इनटॉलरन्स नाही, हे पटवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणं, हेही विधायकच. दोन्ही गटांचे उद्देश देश वाचवण्याचे. देशाची शान उंचावण्याचे. पण मोदींसारखा पुढारी पंतप्रधानपदी असताना काश्मिरी पंडितांसाठी आपण रस्त्यावर का उतरतोय? ‘एफटीआयआय’चे विद्यार्थी करतात ते राजकारण, तर मग गजेंद्र चौहान यांची नियुक्ती हे राजकारण नाही का? जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या असतीलही, घोषणा देणारे कायद्याने देशद्रोही असतीलही; पण सरकारने कन्हैयाकुमारपेक्षा त्या घोषणा देणाऱ्यांना का पकडलं नाही? घोषणा तर नंतर दिल्या गेल्या. आधी त्यांना भडकावलं गेलं. त्या भडकावणाऱ्यांना का ताब्यात घेतलं नाही? मोदी व्यक्तिश: अत्यंत ममताळू-कनवाळू वृत्तीचे गृहस्थ असतीलही; पण त्यांच्यावर टीकात्मक बोलणाऱ्या-लिहिणाऱ्यांची आई-बहीण काढणाऱ्यांना सहिष्णू कसं ठरवायचं? असे अनेक अडचणीचे प्रश्न अनुपम खेरांनी सत्ताधारी व्यवस्थेला विचारल्याचे ऐकिवात नाही. नपेक्षा ते जाहीर कार्यक्रमांत रागाने लालेलाल होऊन विरोधकांना झोडपून काढताना, देशाच्या भल्यासाठी खपणाऱ्या मोदींनी आजपर्यंत एकही दिवस रजा घेतलेली नाही, या लोकांना (म्हणजे अर्थातच काँग्रेसला) काही लाज वाटते की नाही, असा उफराटा सवाल करत आहेत. पंतप्रधानांना देशाची एवढी काळजी की, त्यांनी एकही क्षण स्वत:साठी दिलेला नाही. सुट्टी घेतलेली नाही. मोदींचं स्वत:ला असं समर्पित करणं हे सगळं ग्रेटच आहे. पण असं अहोरात्र खपणं माणसाचा ‘रोबोट’ झाल्याचंही एक लक्षण आहे.
आता ही शक्यताही काही खोटी नसावी की, विरोधकांनी मोदींची प्रतिमा मलिन करण्याचं सूत्रबद्ध कारस्थान रचलं आहे. पण ज्या खेळात मोदी उतरलेत, त्या राजकीय खेळाचा हा अपरिहार्य भाग आहे. चार वर्षांपूर्वी मीडिया आणि मार्केटला हाताशी धरून मोदी, त्यांच्या साथीदारांनी डॉ. मनमोहनसिंग सरकारची प्रतिमा टराटर फाडून टाकण्याचं कारस्थान रचलं आणि यशस्वीपणे पूर्णत्वास नेलं होतंच की. आता त्या न्यायाने पाळी मोदींची आहे. कारण, त्यांनी ‘मूक-बधीर’ मनमोहनसिंगांची जागा घेतली आहे. भारतीय लोकशाहीत सर्वोच्च स्थानी राहून शोभेच्या स्थानाचा मान राष्ट्रपतीपदाला आहे. पंतप्रधानास ती सूट नाही. नेहरूंपासून-इंदिरा गांधींपर्यंत आणि व्हीपी सिंगांपासून अटलबिहारी वाजपेयींपर्यंत ती कुणालाही नव्हती. मोदींनाही त्यांचे विरोधक ती घेऊ देणार नाहीत. म्हणूनच ती मिळावी, हा अप्रत्यक्ष आग्रहसुद्धा अप्रस्तुत आहे. ‘पाच वर्षं काम तर करू द्या, मग फेकून द्या’, असं खेरांचं म्हणणं म्हणजे, कोळशाच्या खाणीत आपखुशीने काम करायला राजी झाल्यानंतर हात काळे होतात, म्हणून भोकाड पसरण्यासारखं आहे. मोदींच्या प्रेमाखातर स्वयंस्फूर्तीने आकारास आलेल्या हल्लाबोल ब्रिगेडचे खेर आता अग्रणी बनले आहेत. याचमुळे ते ‘टाइट क्लोजअप’मध्ये नजरेस पडू लागले आहेत. दिल्लीतल्या सत्तेच्या व्हरांड्यातली कुजबुज असं सांगतेय की, त्यांचा राज्यसभेच्या खासदारकीवर डोळा आहे. काहीही असेना, त्यांच्या प्रत्येक शब्दांतून, प्रत्येक कृतीतून त्यांच्यातलं सटपटलेपण उघड होऊ लागलं आहे. मोदी सरकारचं समर्थन तर करायचं आहे, पण दर दिवशी नवा झमेला करणाऱ्या मोदी सरकारला पाठीशी घालताना त्यांची होणारी दमछाक चाणाक्षांच्या नजरेतून सुटलेली नाही.
आता आनंदाची गोष्ट ही आहे की, अनुपम खेर फिल्म इंडस्ट्रीचा आवाजी चेहरा बनले आहेत. आणि चिंतेची बाब ही आहे की, हासुद्धा चेहरा इतर मोदी समर्थक चेहऱ्यांप्रमाणे प्रसंगी अधिकाधिक आक्रमक, अशिष्ट आणि अश्लाघ्य होत चालला आहे. विरोधकांच्या प्रोपोगंडानुसार देशात असहिष्णुता वाढत नसेलही कदाचित; पण मोदी सरकारमध्ये वाढत चाललेली असुरक्षितता समर्थकांच्या वागण्या-बोलण्यातून प्रतिबिंबित होऊ लागली आहे. अनुपम खेरांचं शब्दतांडव चढत्या क्रमाने वाढतच जाणं, ही त्याचीच २०७ फुटी ठळक निशाणी आहे...
deshmukhshekhar101@gmail.com
बातम्या आणखी आहेत...