आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा 'चेतन'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्ष किरण - Divya Marathi
क्ष किरण
दोन व्यक्तींमधलावाद-संवाद सौहार्दपूर्ण वातावरणात होऊच नये, अशा पद्धतीचा सध्याचा माहोल आहे. उद्दामपणा हे जणू आजच्या संवाद व्यवहाराचं व्यवच्छेदक लक्षण होऊन गेलं आहे. यातून विचारांची नव्हे तर आरोप-प्रत्यारोपांची देवाणघेवाण होऊ लागली आहे. यातून सुसंस्कृत नव्हे तर आक्रस्ताळी नि आक्रमक गट तयार होत चालले आहेत. चेतन भगत आणि त्याच्या टीकाकारांनी याच अप्रिय बाजूचं दर्शन घडवलं आहे...
 
अराजकाचं एक तंत्र असतं. ज्याला ते अवगत असतं, तो उन्मादात  जुनं ते उद्ध्वस्त तरी करत सुटतो, वा उन्मनी अवस्थेत नवं काही रचत तरी असतो. ही प्रक्रिया जाणीव-नेणिवेच्या पातळीवर सर्वकाळ घडतच असते. त्या अर्थाने अराजकी अवस्था हा काळाचा अदृश्य स्वरूपातला स्थायीभावही असतो. आपल्याकडे सोशल मीडियाच्या आगमनानंतर असं अराजक आपण दररोजच अनुभवत आहोत. याच अराजकी अवस्थेने स्वत:बद्दलच्या अवास्तव कल्पनांनाही जन्म दिलाय आणि पराकोटीच्या उद्दामपणालाही धग दिलीय. म्हणजे, एखाद्या मुद्द्यावर जो हल्लेखोराच्या (शाब्दिक अशा अर्थाने) भूमिकेत आहे तो उद्धट आणि आक्रमक आहेच, पण जो बळी आहे, तोही त्याच्या तोडीस तोड आहे. विनम्रता, विनयशीलता, विवेक या गुणांना जणू इथे कायद्यानेच बंदी घालण्यात आली आहे.
 
अभिजात साहित्याचे, सामाजिक सांस्कृतिक चळवळींचे अभावानेच संस्कार असलेल्या पिढीचा चेतन भगत हा आवडता ‘पॉप्युलर’ लेखक आहे. ज्यांचा जन्मच कॉम्प्युटर-टॅब-स्मार्टफोनच्या सोबतीने झालाय, त्यांना त्याच्या मनोरंजक लिखाणाने भुरळ घातलीय, त्या निमित्ताने ते काही तास पुस्तक वाचन करताहेत, हीसुद्धा एक अपूर्वाईचीच गोष्ट आहे. पण ना या त्याच्या चाहत्यांमध्ये शिष्टाचाराचा अंश आहे, ना त्याच्या टीकाकारांमध्ये संयम आहे. आता चेतन भगतचं ‘फाइव्ह पॉइंट समवन’ हे तरुणाईमध्ये गाजलेलं पुस्तक दिल्ली विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाने ‘पॉप्युलर फिक्शन’वर्गात ऐच्छिक अभ्यासक्रमात समाविष्ट करणं, ही म्हटली तर नित्याचीच एक घटना आहे. अशी दरवर्षी अपात्र-सत्पात्र लेखकांची हजारो पुस्तकं वेगवेगळ्या कारणांनी/ हेतूंनी अभ्यासक्रमात समाविष्ट होत असतात. पण चेतन भगत हा सेलेब्रिटी लेखक असल्याने या घटनेचा इव्हेंट होणं, त्या इव्हेंटची ब्रेकिंग न्यूज होणं आणि पाठोपाठ ‘डिबेट’च्या नावाखाली मीडिया-सोशल मीडिया अराजकी स्वरूपाची शाब्दिक हाणामारी होणं, हे सारं आजच्या काळाला धरून असलं तरीही शोभादायक नक्कीच नाही. 
 
चेतन भगत हा तरुणाईची भाषा बोलणारा, तरुणाईच्या शारीरिक मानसिक गरजा ओळखणारा लेखक असल्याची ख्याती आहे. त्याच्या कादंबऱ्यांवर थ्री इडियट्स, टू स्टेट्स सारखे बॉलीवूडमध्ये सुपरहिट सिनेमे निघाले अाहेत. ‘हाफ गर्ल’ निर्मिती अवस्थेत आहे. त्यामुळे त्याच्या नावाला असलेलं वलय इतर लेखकांच्या तुलनेत दसपटीने अधिक आहे. याच वलयाने बहुधा त्याला सेलेब्रिटी कॉलमिस्ट, सेलेब्रिटी रिअॅलिटी शो जज्ज हे स्टेटसही मिळवून दिलंय. त्यात तो उदारमतवादी आहे. ज्याला इंग्रजीत एखाद्याकडे ‘गिफ्ट ऑफ दी गॅब’ असणे म्हणतात, तसे समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकणारे वाक्चातुर्य (ज्याला काही छद्मीपणे बोलबच्चन असेही म्हणतात) त्याच्याकडे आहे. पण ग्लॅमर आहे, पुस्तकांची तडाखेबंद विक्री होते आहे, याचा अर्थ त्याचं लेखन साहित्याच्या निकषांनुसार दर्जेदार आहे, त्या लिखाणात अभिजाततेचा अंश आहे, असंही नसतं; आणि हाच मुद्दा  त्याचे टीकाकार आक्रमकपणे मांडत आहेत.
 
या टीकाकारांचं पहिलं म्हणणं, चेतन भगत हा या घडीचा भारतातला एकमेव सर्वोत्कृष्ट पॉप्युलर लेखक नाही. त्याच्यापेक्षाही वरचा दर्जा आणि साहित्यिक गुणवत्ता असलेले लेखक (उदा. करण महाजन, अमिश त्रिपाठी, अखिल शर्मा आदी) आपल्याकडे आहेत. त्यांचं दुसरं म्हणणं, लुईसा एलकॉट, अगाथा ख्रिस्ती, जे. के. रॉलिंग्ज या अभ्यासक्रमात समाविष्ट इतर साहित्यिकांच्या रांगेत बसण्याची त्याची लायकी नाही. आणि तिसरं म्हणणं, त्याची ‘फाइव्ह पॉइंट समवन’ ही कादंबरी भाषा, व्याकरण आणि आशयाच्या अंगाने अत्यंत सामान्य दर्जाची कलाकृती आहे. त्याच्या इतरही कादंबऱ्यांच्या विषयसूत्रात एकसंधता नाही, व्यक्तिरेखा एकसुरी आहेत, भाषा व्याकरणाचा अवमान करणारी आहे आणि त्याचं सामाजिक-आर्थिक आकलन अत्यंत सामान्य दर्जाचं आहे. सबब अभ्यासक्रमाच्या प्रारंभालाच भरीव साहित्यसंपदा नसलेला चेतन भगतसारखा पॉप्युलर पण साहित्यिकदृष्ट्या सामान्य वकुबाचा लेखक इंट्रोड्युस करणं विद्यार्थ्यांची चव बिघडवणं आहे. अर्थात, हे सगळंच म्हणणं आक्रमकपणे मांडलं गेल्याने आणि ‘असेल चेतन भगतचं लिखाण सामान्य दर्जाचं, पण दर्जा ठरवायचा कुणी? शेक्सपिअरनं लिहिलं तेव्हाही तर लोकांनी त्याची खिल्ली उडवली होती. पण कालांतराने श्रेष्ठ लेखक ठरला होताच की. चेतन भगतमध्ये नसेलही तशी चमक, पण विद्यार्थ्यांना चांगल्या-वाईटाची तर पारख करता येईल’, असं संयमाने आपलं म्हणणं मांडणाऱ्याचं प्रमाण अत्यल्प असल्यानेच खुद्द चेतन भगतही लेखकाचा आब सोडून हा  ‘अार्मागेडॉन’चा क्षण असल्याच्या त्वेषाने विरोधकांवर तुटून पडला.  त्याचं म्हणणंं, माझी पुस्तकं लाखोंमध्ये खपत नाहीत का? सुपरहिट सिनेमे त्यावर बनत नाहीएत का? वाचकांना ही पुस्तकं आवडताहेत, सो व्हॉट्स युवर प्रॉब्लेम?’
चेतन भगतचं म्हणणं बरोबरही असेल, पण अडचण ही आहे की, लेखक म्हणून विनम्रता आणि विनय त्याच्याकडून अपेक्षित आहे, ते त्याच्या व्यक्त होण्यात पूर्णपणे गैरहजर आहे. एरवी, तुम्ही म्हणता ते खरं असेलही, मी असेन सामान्य वकुबाचा, तर विद्यार्थी नाकारतीलच की, आणि लेखक म्हणून मलाही स्वत:ला नव्याने तपासता येईलच की, अशा आशयाचं विधान करून त्याला संयम आणि सन्मानाने या वादाला तोंड देताही आलं असतं. परंतु हू आर यू? किंवा, मी सांगितलेलं नाही, विद्यापीठाकडे माझं पुस्तक लावा म्हणून... अशी भाषा त्याच्या तोंडून एेकू आली. हाही एक प्रकारचा उद्दामपणाच. कारण, एखाद्या लेखकाचं पुस्तक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लागणं किंवा लागलेलं पुस्तक (उदा. सच ए लाँग जर्नी- रोहिंग्टन मिस्त्री मुंबई विद्यापीठ, थ्री हंड्रेड रामायनाज : फाइव्ह एक्झाम्पल अँड थ्री थॉट्स ऑन ट्रान्सलेशन - ए. के. रामानुजन) काढून घेतलं जावं लागणं वा एखाद्या नेत्याने एखाद्याच्या घरी लग्नाला जाणं, न जाणं या सार्वजनिक स्तरावरच्या बाबींमध्ये अदृश्य स्वरूपात राजकारण असतंच असतं. लेखकाचं पुस्तक अभ्यासक्रमाला लागणं याचा अर्थ केवळ लेखन गुणवत्तेचा आधार घेतला जातो, असं नसतंच. तर लेखकाचं सामाजिक स्थान, लेखकाचे राजकीय-सांस्कृतिक नेतृत्वाशी असलेले संबंध-सलगी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव, या गोष्टी काही निर्णयांत महत्त्वाच्या ठरतच असतात. या प्रकरणात चेतन भगतने आपलं राजकीय प्रेम कुठे झुकतंय आणि उदारमतवादी विचार कुणाची भलामण करणारे आहेत, याची जाहीर वाच्यता  केलेली नसली तरीही, या घटकांनी संबंधितांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकला नसेलच, हेही पूर्णपणे संभवत नाही.
अर्थातच जसे विद्यापीठाशी संबंधित या प्रकरणाला चेतन भगतच्या विरोधात जाणारेअनेक पैलू असू शकतात, त्याचप्रमाणे अन्विता बाजपेई नावाच्या लेखिकेने दाखल केलेल्या आशयचोरीच्या प्रकरणातले  अनेक पैलू चेतन भगतच्या बाजूचेही असू शकतात. म्हटला तर हा विलक्षण योगायोग आहे. ज्या क्षणी भगतचं पुस्तक दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होतंय, त्याच क्षणी फांदी तुटलीय. म्हणजे, बंगळुरूच्या सत्र न्यायालयाने लेखिका अन्विता बाजपेईने केलेल्या आशयचोरीच्या तक्रारीवरून भगतच्या प्रकाशकाला ‘वन इंडियन गर्ल’ नावाच्या त्याच्या ताज्या पुस्तकाची विक्री करण्यास पुढील सुनावणीपर्यंत मनाई केली आहे. अन्विता हीदेखील चेतनप्रमाणेच आयआयटीची पार्श्वभूमी असलेली लेखिका आहे. तिचं म्हणणं, २०१४मध्ये बंगळुरू लिटरेचर फेस्टिवल दरम्यान ती चेतनला भेटली. त्या भेटीत तिने त्याला ‘लाइफ ऑड्स अँड एंड्स’ हे कथासंग्रह असलेलं पुस्तक दिलं. त्यातल्या एका कथेवरून त्याने ‘वन इंडियन गर्ल’चा आशय लिहिला आहे. त्यामुळे चेतनने आशयचोरी केली, हे मान्य करावं आणि नुकसान भरपाई म्हणून काही लाख रुपये द्यावे. प्रकरण कोर्टात गेलं. आश्चर्य म्हणजे, कोर्टाने चेतनच्या विरोधात निकाल दिला. जे काही घडलं त्यातून अनेक अर्थ निघतात. अन्विता बाजपेईची महत्त्वाकांक्षाही लपून राहात नाही आणि चेतन भगत आणि प्रकाशकाचं आरोप खोडून काढण्यात आलेलं अपयशही लपून राहात नाही. कोणीही माणूस मी चोरी केली, अशी कबुली देत नाही, तरीही इथेसुद्धा चेतन भगतचा उद्दाम अवतार कायम आहे. त्याचं म्हणणं, मी या लेखिकेला भेटलेलोही नाही आणि तिचं काही वाचलेलंही नाही. मी वैश्विक कथा लिहितो. काहीही असेना, ढापाढापी करणारा लेखक विद्यापीठ अभ्यासक्रमात हवाच कशाला? असाही सवाल या क्षणी कुणी उपस्थित करू शकतं. पण म्हणूनच वेळ कोणतीही असो, किमान लेखकाच्या अंगी विनम्रता, विनयशीलता  गरजेची. सत्याची स्वत:पुरती जाणीव महत्त्वाची. ती असली की सहसा मनाचा संयम सुटत नाही आणि अनावश्यक उद्दामपणा करण्याची खुमखुमी मनात जागून इतरांच्या नजरेत खुजे ठरण्याची चेतन भगतवर आता ओढवली तशी वेळही ओढवत नाही.
 
divyamarathirasik@gmail.com
बातम्या आणखी आहेत...