आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Bharapte Article About Buffet In Weddings, Madhurima

लग्न आणि बफे पध्‍दत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पूर्वी साध्यासरळ पद्धतीने लग्नं लावण्यात येत असत. महागडी वस्त्रं, फोटोसेशनचा बडेजाव नव्हता. पारंपरिक लग्नाच्या प्रथा पाळण्यात येत होत्या. लग्न म्हणजे दोन परिवारांचे मिलन मानले जाते. लग्नानंतर आलेल्या पाहुण्यांना जेवण देण्याचा हेतू अन्नदान व्हावे, असा असायचा. पट्ट्यावर बसून, पत्रावळ्यांवर वाढून लोक जेवत असत. पदार्थही साधे असत. वरणभात, भाजीपोळी, एक गोड. परंतु वऱ्हाडी मंडळी पोटभर एका जागेवर बसून आरामात जेवत असत.
जेवण झाल्याचे समाधान एवढ्या गर्दीत लाभे. आता काळ बदलला. पाच दिवसांचे लग्न तीन दिवसांवर आणि आता एका दिवसाचे काही तासांवर आले. मोठा बडेजाव करून सगळे शॉर्टकटमध्ये उरकण्यात येते. जेवणही बफे पद्धतीने दिले जाते. या पद्धतीत लग्न लागले, की सर्व वऱ्हाडी एकादमानी जेवणाच्या ठिकाणी गर्दी करतात. मानपानाची गोष्ट सोडा, एवढ्या गर्दीत लोटालोटीत धड पोटभर जेवणही होत नाही. जेवायला छप्पन भोग असतात, परंतु गर्दीच्या ससेमि-यात सर्व पदार्थ प्लेटमध्ये घेणं अवघड होऊन जातं. माझ्या परिचितांच्या लग्नामध्ये एका व्यक्तीच्या अंगावर गर्दीमध्ये संपूर्ण प्लेट सांडली. लेकुरवाळ्या बाया आणि वयस्कर माणसांची आणखीनच गैरसोय. म्हाता-या माणसांना उभे राहून जेवणे शक्य नसते, मग ते जागा मिळेल तिथे बसतात. खुर्च्यांसाठी शर्यत लागते, जणू काही आपण संगीत खुर्चीसारखे जेवण खुर्ची खेळत आहोत.

पुरुष मंडळी खाण्याचे काउंटर सोडायला तयार होत नाहीत, म्हणून बायकांचा नंबर लागत नाही. अशी ही खर्चिक आणि गैरसोय करणारी पद्धत आहे. पूर्वीच्या काळी पंगत बसवायचे तेच बरोबर होते. जुनं ते सोनं. बफे पद्धतीमध्ये अन्नही जास्त वाया जाते म्हणून पंगत बसवणेच योग्य.
लग्न कमीत कमी खर्चात, योग्य त्या पद्धतीनुसार व्हायला पाहिजे. मोठेपणा आणि बडेजावाच्या नादामध्ये पैशाचा अपव्यय होतो. त्यापेक्षा हे पैसे वधू-वरांच्या भविष्यासाठी वापरले गेले तर अतिउत्तम. या पैशातून अन्नदानाचा उद्देश साधला गेला तर फारच चांगले.