आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय करील साबण ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहोरात्र चालू असणार्‍या एका म्युझिक चॅनलवर ‘दयावान’ (विनोद खन्ना, माधुरी दीक्षित) चित्रपटाचे एक गाणे चालू होते - ‘आज फिर तुम पे प्यार आया है.’ विनोद खन्नाची आंघोळ चालली आहे, माधुरी त्याला साबण लावते आहे. इतक्यात माझे लक्ष गेले माधुरीच्या हातातल्या साबणाकडे! शूटिंगसाठी प्रॉपर्टी हजर करणार्‍या माणसाला मनोमन सलाम ठोकला. कथेच्या काळानुसार किती योग्य तयारी केली होती त्याने.
माझ्या डोळ्यात गेलेला भरलेला साबण होता - लाइफबॉय काबरेलिक सोप! 3डी/4डी सिनेमा बघत असल्यासारखी मी अगदी त्या काबरेलिक साबणाच्या वासात हरवून गेले. हाय रे देवा! साबण का बघायचा होता त्या गाण्यामध्ये, असेही काही जण ऐकवतील मला. पण म्हणे संत शिल्पा : आहे निर्मळ मन, म्हणून दिसला फक्त साबण!
तर लाइफबॉय काबरेलिक सोपबद्दल बोलत होतो आपण. तेल आणि साबण या दोन परस्परविरुद्ध गोष्टी एकाच दुकानात विकणार्‍या आणि ‘ऑइल डेपो’ नावाच्या दुकानात असे साबण मिळायचे. एके काळी म्हणजे तीसेक वर्षांपूर्वी, साबणांच्या ब्रँड्सची आजच्याइतकी रेलचेल नव्हती. बाबा-काका-आजोबा लोकांचा हमाम, आई-काकूचा लक्स आणि आम्हा मुलांना आरपार दिसणारा पिअर्स यापलीकडे यादी जायची नाही! फार तर फार एखादी सुकेशिनी वापरेल असा शिकेकाई साबण! आणि म्हणूनच की काय, दिवाळीला मोती-चंदन किंवा मोती-गुलाब हे अनेक अभ्यंगस्नानाच्या सोहळ्याचे साक्षीदार होते. अगदी पराकोटीची ऐश म्हणजे मैसूर सँडल सोप! त्याचे कव्हर कपड्याच्या घडीत घालून ठेवणे आणि त्याचा वास घेणे, हासुद्धा एक फार जुना, बालिश खेळ.
काळ बदलला आणि साबणानेसुद्धा कात (बॉक्स) टाकली, महाराजा! आंघोळीबरोबरीने वॉशबेसिनवर लावण्यासाठी विविध आकाराचे साबण येऊ लागले. रविवारी दुपारी चिंबोरी / बांगडे / हलवा (शाकाहारी लोकांनी दुधी-हलवा, गाजर-हलवा, गेला बाजार माहीम-हलवा समजून मिटक्या माराव्यात) खाऊन हाताचा वास घालवण्यासाठी माशालाच (साबणाच्या) हात घासणे क्रमप्राप्त झाले! साबणाची झीरो फिगर प्रवासी पोटजात, पेपरसोप. ट्रेकला जाताना कमीत कमी वजन बरोबर नेण्यामध्ये या पेपर सोपनी बाजी मारली. स्वच्छतेच्या वैयक्तिक संकल्पना प्रचलित होऊ लागल्या आणि हँडवॉशचा जमाना आला. हात धुताना हायजिनची काळजी, मग आंघोळ करताना का नको? आणि बॉडीवॉश जन्मला! प्रवासाला जाताना याचा उपयोग होतो हे खरे, पण एकदा सामानात बॉडीवॉशची बाटली उघडली आणि नेलेले सगळे कपडे, एकाच वेळी अंगावर घालून आंघोळसुद्धा करावी लागली आहे.
अजूनही हमाम, लक्स, पिअर्स वापरले जात असतीलही कदाचित; पण न्हाणीघरातल्या कपाटात त्यांची जागा अनेक महागड्या आणि जास्त आकर्षक साबणांनी घेतली आहे. ‘आकर्षक’ विशेषणांमध्ये वेष्टनाचा भाग अधिक, का जाहिरात करणारा हृतिक - हा मुद्दा वेगळाच! पर्यावरण रक्षण म्हणून ताडाच्या पानापासून द्रोणासारखे डिझायनर वेष्टनदेखील बनले. आत साबण 75 ग्रॅम आणि खोका मात्र 150 ग्रॅमच्या आकाराचा. उगाच नाही ‘तीनवर एक फ्री’ ऑफर येत. ही ऑफर जुने साबण लवकर विकण्यासाठी आहे म्हणावे, तर परवा नवा साबण घेताना त्याचीसुद्धा तीच कथा - ‘तीनवर एक फ्री!’ नवा साबण टीव्हीवर दिसला आणि तो आपल्या घरी नाही आला हे कसे चालेल? परिणाम : 4 साबण घरी! अगदी रातोरात सुंदर बनवले नाही तरी किमान अंगाचा घाम / तेलकटपणा घालवणे हे साबणाचे काम. आजकाल ही व्याख्यासुद्धा बदलली आहे. हल्ली साबणसुद्धा कशा-कशापासून बनतात आणि काय-काय करतात हे बघून तोंडाला फेस येईल. एक चतुर्थांश साय घालून साबण बनवला तर ती साय धुवायला किती वेळ लागेल.. मग लोक उगाच बायकांना बोलतात, ‘कित्ती वेळ लागतो यांना आंघोळीला!’ ‘लिंबाच्या तेलाचा साबण’ तुम्हाला प्रसन्न करेल; जाई/चमेली-फुलांच्या तेलाची साबण-वडी तुम्हाला छान झोप मिळवून देईल; वेलचीच्या अर्कापासून बनलेला साबण तुम्हाला रिलॅक्स करेल, एक न दोन. चिकट समुद्र-शेवाळापासून साबण बनतो? दालचिनी आणि मध हे पोटातून घ्यायचे जिन्नस अंगाला लावून वाया घालवायचे? तेसुद्धा 500 रुपयांना 75 ग्रॅम? घेणारे घेतात, विकणारे हात धुऊन घेतात! पण बाबा साबणा, तुझे दिवससुद्धा भरले आहेत - वो दिन दूर नाही जेव्हा हँड सॅनिटायझर्स आपल्या आयुष्यातून साबण धुऊन टाकतील. आता हे साबणाचे फुगे थांबवते. नाही तर म्हणाल, ‘किती घसरायचे साबणावरून!’ zarapkareen@gmail.com