आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shirin Kulkarni Article About Creative Education

कल्पकतेकरिता शिक्षकांचा सहभाग मोलाचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या शाळेत तुम्ही गेलात, तिथे सर्वत्र शांतता असेल, सगळे विद्यार्थी ठोकळ्यांसारखे एका जागी बसले असतील आणि फक्त शिक्षक एकासुरात शिकवत असतील, एकंदरीतच वातावरणात काहीसे औदासिन्य असेल तर अशी शाळा तुम्हाला आवडेल का ?
नक्कीच या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल. शाळा म्हणजे कसं प्रसन्न वातावरण, हसती खेळती मुले आणि त्यांचा सहभाग घेऊन शिकवणारे शिक्षक असावेत असं अपेक्षित आहे. मात्र सद्य:स्थितीत भारतातील अनेक शाळांमध्ये हे वातावरण आढळून येत नाही हे वास्तव आहे. विद्यार्थ्यांमधील कल्पकता वाढीस लागण्यासाठी शिक्षकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी मुळात शाळेत विद्यार्थ्यांकरिता पोषक प्रसन्न वातावरण असले पाहिजे. तसेच कल्पकतेने विचार करण्याकरिता विद्यार्थ्यांना वेळोवेळी उद्युक्त करण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. मग विद्यार्थ्यांना कल्पक विचार करण्याची सवय लागावी यासाठी शिक्षकांना विशेष मेहनत घ्यावी लागेल, असे मला येथे सांगावेसे वाटते.

ही विशेष मेहनत म्हणजे वेळोवेळी स्वतःची कल्पकता वापरणे त्याचबरोबर विविध साधनांचा वापर करणे. तसेच उपलब्ध असलेल्या साधनांमध्येच शिक्षकांना विद्यार्थ्यांचा कल्पक दृष्टिकोन विकसित करता येऊ शकतो. त्यासाठी भरपूर पैसे, महागडे इन्फ्रास्ट्रक्चर यांची अजिबातच गरज नाही.

प्रत्येक शिक्षकाला काही नवीन उपक्रम राबवायचा म्हणजे वर्गातला गोंधळ वाढणार ही सर्वात मोठी भीती वाटते. यावर उपाय म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त रुजवणे हाच होय. किंबहुना हीच कल्पनाशक्तीला चालना देण्याची पहिली पायरी आहे असे म्हणता येईल. समजा गणित हा विषय मैदानात शिकायचा असं ठरवलं तर मुलांनी रांगेत जावं, शांततेत जावं आणि त्याकरिता जो लीडर असेल त्याचं ऐकणं हे नियम स्वतः मुलांनी बनवले तर त्यांचा सहभाग अधिक वाढतो. यामुळे आपोआपच त्यांच्यात जबाबदारीची जाणीव वाढीस लागते. ही जाणीव वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. माझा सहभाग महत्त्वाचा आहे हे मुलांना वाटल्यानंतरच ही जाणीव रुजते. कल्पकतेकडे नेणारी ही दुसरी पायरी. त्यानंतर शिक्षकांनी विविध साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. त्यासाठी सहज उपलब्ध असलेली साधने वापरणे अधिक श्रेयस्कर. उदाहरणार्थ पाने, फुले, दगड, माती वगैरे. याखेरीज तक्ते, कोडी अशाप्रकारच्या विविध बाबींचा अवलंब करण्यात येऊ शकतो. तसेच एकाचवेळी अनेक उपक्रम राबवण्यापेक्षा एकच उपक्रम राबवा त्यावर लक्ष केंद्रित करा. त्यासाठी मुलांना पूर्वतयारी करण्याचा वेळ द्या. उपक्रम कोणता राबवायचा, साहित्य काय निवडायचं हे विद्यार्थ्यांचा कल ओळखून ठरवा. उदा. गणित विषय शिकवताना विद्यार्थ्यांचे गट करणे, खेळाच्या माध्यमातून सम-विषम संख्या शिकवणे इ.
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे उदाहरण येथे घेता येईल. ते जेव्हा टस्कगीच्या शाळेत गेले तेव्हा त्यांच्याजवळ केवळ मायक्रोस्कोप हे एकमेव साधन होते. त्यांच्याजवळ प्रयोगशाळा नव्हती. मग त्यांनी मुलांना घेऊन कचऱ्यातून साधनं गोळा केली. जसे पत्र्याला भोकं पाडून चाळणी तयार केली, काचेला काजळी लावून त्याद्वारे फोकस्ड बीम तयार केला आणि असं करत करत प्रयोगशाळा उभारली.

शिक्षकांनी स्वतःच्या वागण्यात कल्पक दृष्टिकोन बाळगला, स्वतःची कल्पकता वापरून ज्ञानदान केले तर त्यांच्याकडून मुलांना प्रेरणा मिळेल आणि कल्पकतेने विचार करण्याची सवयच लागेल. मात्र त्यासाठी शिक्षकांना थोडसं धैर्य दाखवावं लागेल. इतरांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावं लागेल. कल्पकता हा एक गुणांचा समूहच आहे. धैर्य, वेगळा विचार करण्याची क्षमता, तो मांडता येण्याची क्षमता, इतरांच्या टीकेकडे दुर्लक्ष करणे, आत्मविश्वास असे अनेक गुण या एका माध्यमातून वाढवता येतात. मात्र त्यासाठी सातत्य व मेहनतीची जोड देणे अत्यावश्यक आहे.