आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्पनाशक्तीचा आविष्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखन, चित्रकला, शिल्पकला आदी कलांच्या माध्यमातून कल्पनाशक्तीचा आविष्कार होतो, हे आपण जाणतो. त्याचबरोबर विविध माध्यमांच्या साहाय्यानेदेखील कल्पनाशक्तीचा वापर करून आपण आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करू शकतो. दृक् माध्यम, श्राव्य माध्यम आणि दृकश्राव्य माध्यमं याबरोबरच सोशल नेटवर्किंगकरिता अवलंबली जाणारी विविध माध्यमं वापरून कल्पनाशक्तीचा आविष्कार आपल्याला करता येऊ शकतो. मात्र याकरिता माध्यमाचे सखोल ज्ञान मिळवणे, त्याचा अभ्यास करणे अत्यावश्यक असते. तुम्ही तुमच्या कलेत अधिकाधिक नैपुण्य आणि अचुकता मिळवण्याचा ध्यास घ्याल, त्याचबरोबर स्वतःचा आनंद सहजतेने मिळवू शकाल.

माध्यमांच्या साहाय्याने एकाच वेळी मोठ्या गटापर्यंत आपण आपली कला पोहाेचवू शकतो. मात्र त्यासाठी स्वतःच्या ज्ञानाची सुस्पष्टता जितकी आवश्यक आहे तितकेच समाजाची मानसिकता आणि त्या त्या माध्यमाची ताकद ओळखणेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. याचे कारण आपल्या कल्पनाशक्तीने जो विचार आपल्याला मांडायचा असेल तो मोठ्या संख्येतील लोकांपर्यंत थेट तसाच पोहाेचवता येणे हेदेखील एक मोठे कौशल्य आहे. नवा चित्रपट प्रदर्शित होताच त्यातील प्रत्येक दृश्य, संवाद बघण्याकरिता प्रेक्षक गर्दी करतात. त्याचबरोबर त्यातील कोणतेही दृश्य अथवा संवाद खटकला तर तत्क्षणी मोठ्या संख्येने लोक त्याविरुद्ध आवाज उठवतात, हा अनुभव अनेकवेळा आपण घेतला आहे. त्यामुळेच आपली कल्पनाशक्ती वापरून मांडावयाचा विचार लोकांपर्यंत नेमका पोहाेचवण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.

श्राव्य माध्यमाच्या जगतातील सर्वात मोठे नाव कोणते असा विचार करताच गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचेच नाव सर्वप्रथम येते. आकाशवाणीवरून त्यांची सुमधुर गीते ऐकताना त्या त्या गीताचे भाव आपल्या मनाला हात घालतात तसेच त्या गीतातील वर्णन आपल्या चक्क डोळ्यांसमोर उभे राहते. केवळ आवाजाच्या जोरावर संपूर्ण जगात असंख्य चाहते मिळवणारे आणखी एक कलाकार म्हणजे अमिताभ बच्चन. आपल्यातील ताकद ओळखून या लोकांनी त्यात वैविध्य आणत समर्थपणे संपूर्ण जगात आपले स्थान निर्माण केले. आजवर असे अनेक कलाकार, दिग्दर्शक, साहित्यिक केवळ कल्पनाशक्तीच्या सामर्थ्यावर जगभरात आपला चाहतावर्ग निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.

व्ही. शांताराम, संजय लीला भन्साली, पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, आशा भोसले, कवी ग्रेस, एम.एफ.हुसेन, माधुरी दीक्षित अशी अनेक नावे कल्पकतेच्या दुनियेतील मैलाचे दगड म्हणून घेता येतील. फरक हाच की या माणसांनी आपली कल्पकता विशिष्ट माध्यमांच्या साहाय्याने लोकांसमोर आणली. अभिनय, नृत्य, संगीत, चित्र, लेखन, शिल्प आदींमध्ये प्रावीण्य मिळवून केवळ तिथवरच न थांबता माध्यमांच्या साहाय्याने अधिकाधिक लोकांपर्यंत आपली कला पोहाेचवण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. त्यासाठी अथक परिश्रम, जिद्द, अपयशाला तोंड देणे, सातत्य आदी गुणांचीदेखील कल्पनाशक्तीला जोड दिली, त्यानंतरच ते एका उंचीवर स्वतःला नेऊ शकले. त्यामुळेच केवळ कल्पक दृष्टिकोन बाळगून किंवा कल्पकपणे विचार करून त्याच पायरीवर थांबणे उचित नाही तर त्यास इतर सर्व गुणांची जोड देऊन कल्पनाशक्तीचा आविष्कार करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. पुढील भागात आपण दृकश्राव्य माध्यमाचा अवलंब करून कल्पनाशक्तीचा आविष्कार कशापद्धतीने केला जातो याविषयी विवेचन करूया.

शिरीन कुलकर्णी
संचालक, काैन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन,
सीसीई, फिनलंड, shirin.kulkarni@ccefinland.org
शब्दांकन : मोहिनी घारपुरे-देशमुख
बातम्या आणखी आहेत...