आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वा.सी.बेंद्रें यांचे मालोजी-शहाजीराजे, शिवाजी, संभाजी राजांवरील पुस्तके पुन: वाचकभेटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काशीची गंगा आणि रामेश्वरचा सागर एकवटून छत्रपतींनी बांधलेल्या राष्ट्रतीर्थांची, वैराग्याच्या वेगाने फडकणार्‍या भगव्या झेंड्याला, महाराष्ट्र लक्ष्मीच्या वैभवाच्या जरीपटक्याची शान राखून आपल्या पराक्रमाने शत्रूंना भयकंपित करणार्‍या मुत्सद्दी व कर्तव्यदक्ष संभाजीराजांचे अवास्तव व खोटे रूप बखरी-वाङ्मयात कथा - कादंबर्‍यांत रचनाकारांनी वास्तवाची शहानिशा न करता मांडले. अशा रूपातच संभाजीला ज्यांनी शेकडो वर्षे जिवंत ठेवले. 1960 पावेतो वास्तवाच्या कसोटीवर संभाजीच्या चरित्राचे संशोधन करण्यास कोणी मराठी संशोधक पुढे येत नव्हता.. तथापि या वर्णनांनी महाराष्ट्राच्या मायेला पारखे झालेल्या या युवराजाची खरी प्रतिमा जगासमोर आणण्यासाठी एक व्यक्ती 40 वर्षांपासून जिवाचे रान करीत होती. देश- विदेशात जाऊन संदर्भ जुळवीत होती अन् माहितीही मिळवीत होती. अखेर त्याच्या प्रयत्नाला पूर्णत्व आले अन् खरा संभाजी जगाला मिळाला व कळालाही.... मराठ्याच्या इतिहासाला नवा आयाम अन् नवा प्रकाश पुरवणारी ही व्यक्ती म्हणजे थोर लेखक इतिहासकार वा. सी. बेंद्रे होत. तब्बल 42 वर्षांनंतर त्यांची मालोजी राजे व शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज (पूर्वाध व उत्तरार्ध), श्री शिवराज्याभिषेक व छत्रपती संभाजी महाराज ही चार पुस्तके कोल्हापूरच्या पार्श्व प्रकाशनाने पुनर्प्रकाशित केली अन् बेंद्रेंनी खरा इतिहास मांडण्यासाठी दिलेले योगदान पुन्हा उजळ झाले.

ल्ल  वा. सी. बेंद्रेंनी 90 वर्षांच्या वाटचालीत 54 पेक्षा अधिक ग्रंथ लिहिले :
बेंद्रे यांनी उभी हयात अभ्यास व संशोधनात घातली. 90 वर्षांच्या वाटचालीत 54 पेक्षा अधिक गं्रथ लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे चित्र खुद्द महाराष्ट्रालाच ज्ञात नव्हते; परंतु बेंद्रे यांच्या परिश्रम व प्रयत्नातून ते महाराष्ट्राला लाभले. इतिहासकार, वाचक, लेखक, पत्रकारांना त्यांच्या पुस्तकांबद्दल कायम आकर्षण राहिले आहे. चार तप अभ्यास करून वास्तवाच्या कसोट्यावर उतरणार्‍या त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज या ग्रंथाने विलक्षण खळबळ उडवली होती . बखरी, कथा, कांदबर्‍यांनी रंगवलेली संभाजी राजांची दुराचारी, दुर्वर्तनी, स्वैर व विवेकशून्य प्रतिमा या पुस्तकाने पुसून टाकली अन् पराक्रमी, शूर, मुत्सद्दी, कर्तव्यदक्ष असे संभाजीचे वास्तवरूप सप्रमाण सिद्ध केले.

चरित्र संशोधनातील एक युगप्रवर्तक
टप्पा : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या पुस्तकाला प्रभावी व मंगल सत्य प्रकट करणारे चरित्र संशोधनातील एक युगप्रवर्तक टप्पा असे संबोधले तर म. म. दत्तो वामन पोतदार यांनीही मुक्तकंठाने स्तुती केली. या पुस्तकाने मराठ्यांच्या इतिहास व संशोधनाला एक नवी दिशा अन् नवा प्रकाशही मिळाला. संभाजीच्या या रूपाची दखल इतिहासकार अन् साहित्यिकांनीही घेतली. आजही त्यात सातत्य आहे.

महत्त्वाचे काम :
रियासतकार सरदेसार्इंनंतर मराठ्यांच्या इतिहासावर व्यापक लिखाण बेंद्रेंनी केले. त्यांच्यामुळेच खरा संभाजी जगाला मिळाला अन् कळालाही. त्यांची पुस्तके दुर्मिळ झाली होती. पार्श्वने ती पुनर्प्रकाशित करून महत्त्वाचे काम केले आहे.
- डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ विचारवंत

संशोधनाला सुलभता लाभेल :
मराठ्यांच्या इतिहासाला नवा प्रकाश पुरवणारी बेंद्रेंची पुस्तके मिळत नव्हती. पार्श्वने ती पुनर्प्रकाशित केल्याने ती उपलब्ध झाली असून यामुळे संशोधनाला सुलभता लाभेल.
- निनाद बेडेकर

यशवंतराव चव्हाणांच्या सांगण्यावरून मालोजी-शहाजींवरील ग्रंथ लिहिला
यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून मालोजी राजे व शहाजी राजांच्या एकूण कारकीर्दीची माहिती देणारा मालोजी राजे व शहाजी महाराज हा 626 पानांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिला. 1967 मध्ये त्याचे प्रकाशन झाले. या ग्रंथाने शिवाजी महाराजावरील संभाव्य छत्रपती शिवाजी महाराज या 1200 पानांच्या द्विखंडात्मक ग्रंथ साकारण्याची पार्श्वभूमी तयार केली.

जगभर मागणी असलेल्या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाचे धनुष्य पेलले राहुल मेहतांनी
मराठ्यांवरील इतिहास लिखाण व संशोधनाला मोलाचा आधार ठरलेल्या या पुस्तकांना जगभर मागणी असूनही त्याचे पुनर्प्रकाशन होत नव्हते की कोणी प्रकाशक यासाठी पुढे येत नव्हते. तथापि वाचक- संशोधकांच्या हाती ही पुस्तके पडावीत अशी तळमळ कोल्हापूरच्या पार्श्व प्रकाशनचे राहुल मेहता यांची होती. गेली दोन वर्षांपासून ते याकामी धडपडत होते. यासाठी त्यांनी वा. सी. बेंद्रे यांच्या नात साधना यांची भेट घेऊन हा प्रकल्प तडीस नेला.