आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघाची कातडी पांघरलेले कोल्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत तुकारामांसारख्या महाकवीला, महान संताला शूद्र ठरवून त्यांना अभंग लिहिण्याचा, धर्माविषयी काही बोलण्याचा अधिकार नाही, म्हणतात आणि त्यांचे अभंग बुडवून टाकण्याला कारणीभूत होतात, ही विकृती नाही तर काय? छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या विलक्षण पराक्रमी अशा महामानवाला शूद्र ठरवून राज्याभिषेकाचा अधिकार नाकारतात; छत्रपती शाहू महाराजांसारख्या जनकल्याणासाठी आयुष्य झिजविणा-या महापुरुषाला शूद्र ठरवून वेदांचा अधिकार नाकारतात आणि नाना प्रकारांनी त्यांचा मानसिक छळ करतात, ते तथाकथित विकृत नाही तर काय? महाराष्ट्राचे भाग्यविधाते प्रतिभावंत साहित्यिक यशवंतराव चव्हाण यांना दोन वेळा साहित्य संमेलनात अपमानित केले गेले. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा की, रविवार दिनांक 12 जानेवारी 2014 रोजीच्या दै. ‘दिव्य मराठी’ या वर्तमानपत्राच्या ‘रसिक’ पुरवणीत 87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्याविषयी प्रतीक पुरी यांचा ‘झूल पांघरलेले मठ्ठ काळे बैल’ हा लेख त्या विकृतीचाच एक भाग आहे.
कोणत्याही महापुरुषाची किंवा प्रतिभावंताची बदनामी करण्यामागची भूमिका ही विकृतच असते, ते जाणीवपूर्वकच केलेले षड्यंत्र असते. बिचारी माणसे त्यापासून योग्य तो बोध घेतात किंवा जशास तसे उत्तर देऊन सामोरे जात असतात. अशाच एका विकृतीतून प्रतिभावंत साहित्यिक फ. मुं. शिंदे यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न पुरीने केला आहे. मराठी साहित्यातील सुसंस्कृत, विचारशील आणि परिवर्तनवादी परंपरा ज्यांनी जोमाने पुढे चालविली आहे, ते फ. मुं. शिंदे आज मराठी साहित्याला मिळालेले देदीप्यमान रत्न आहेत, यात कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही.
प्रा. फ. मुं. शिंदे सासवड येथील 87व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मी जे भाषण केले ते माझ्या लिखित भाषणाचे सार आहे. 48 पानांचे लिखित भाषण वाचून दाखविणे वेळेअभावी शक्य नसल्यामुळे मी सार सांगितले. ज्यांना माझे भाषण वाचायचे असेल त्यांनी माझे लिखित भाषण वाचावे आणि आपली मते नोंदवावीत. असे स्पष्टीकरण देऊनसुद्धा पुरी यांनी ते भाषण न वाचता फ.मुं.वर बिनबुडाचे आरोप केले आहेत. कदाचित ते लिखित भाषण आणि फ.मुं.चे साहित्य संपूर्ण वाचल्यावर पुरी यांनी मत नोंदविण्यास हरकत नव्हती; परंतु तसे झाल्याचे दिसत नाही. केवळ सूडबुद्धीने व विकृत मानसिकतेने हे केलेले आहे, असेच यावरून दिसून येते.
कवी फ. मुं. शिंदे यांनी समाजनिष्ठ जाणीव असणारे आणि मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावणारे लेखन केले आहे. त्यांचे साहित्य म्हणजे मराठी वाङ्मयातील उच्च कोटीचे वैभव ठरावे असेच आहे, ते जगमान्यच ठरले आहे. फ. मुं.च्या कवितेत पुराण अवस्था, वर्णवाद, विषमता, शोषण याविरुद्ध निषेध व्यक्त करणारी भाषा प्रतीत होते. अर्थातच मानवी मूल्यांचा, परिवर्तनाचा, क्रांतीचा गौरव करणारी भाषा अभिव्यक्त होते.
सासवड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी साहित्यातील सुसंस्कृत, विचारशील आणि परंपरेच्या वृद्धीची प्रकर्षाने जाणीव झाली. संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत फ. मुं. शिंदे यांची निवड होणे ही साहित्य क्षेत्राच्या वृद्धीची, परिपक्वतेची आणि आनंदाची बाब आहे. यासाठी त्यांना निवडून दिलेल्या मतदारांचे आभार मानून अभिनंदन केले पाहिजे. कारण ख-या अर्थाने ‘सुजाणता हरली आणि सवंगपणा जिंकला आहे,’ हे फ. मुं.चे वाक्य समर्पकच आहे. त्यांनी केलेले अध्यक्षीय भाषण आजपर्यंत झालेल्या भाषणापेक्षा आगळेवेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे. त्यांनी केलेली साहित्य साधना आणि त्याचा साहित्य व्यवहारांशी असणारा संबंध महत्त्वाचा दिसून येतो. त्यांनी भाषणात सीमाप्रश्न व पुरस्कार यावर केलेले भाष्य महत्त्वाचेच आहे.
साहित्य व्यवहारांमध्ये आज शीर्ष स्थानावरची काही मंडळी स्वत:ला कार्यक्षम समजतात; पण त्यांना मराठीचा कळवळा नाही, साहित्याचा लळा नाही, मराठीच्या भविष्याच्या कसल्याही योजना त्यांच्याकडे नाहीत. तेच शिंदे यांच्यावर टीका करतात आणि म्हणतात, आम्ही या गोष्टींपासून दूर राहतो. तर का राहतात दूर? मुळात त्यांची कुवतच नाही, असेच म्हणावे लागते. आणि हो, जे शिंदे यांना राजकारण्यांच्या संगतीत राहून शिंदेंचा तो सच्चेपणा हरवला आहे, असे म्हणतात; त्याच विचारसरणीच्या विकृत माणसांनी साहित्यिक असूनसुद्धा महाराष्ट्राचे भाग्यविधाते प्रतिभावंत साहित्यिक यशवंतराव चव्हाण यांना संमेलनातून दोन वेळा जाण्यास भाग पाडले होते व अपमानित केले होते, हे मराठी वाचक कदापिही विसरू शकणार नाही.
संमेलने कशासाठी भरवली जातात? अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांना माझा प्रश्न आहे, आतापर्यंत का भरवली गेली? आता का नको आहेत? अशा प्रकारे नसावे तर कशा प्रकारे असावे? याची उत्तरे मात्र त्यांच्याकडे नाहीत. यावरून त्यांना फक्त नावे ठेवणे, दुस-यांना कमी लेखणे व स्वत:ला शहाणे समजणे एवढेच जमत असावे, असे वाटते.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. माणुसकी म्हणजे काय, माणुसकीची लक्षणे यावर बोलण्याचा पुरी यांचा अधिकार आहे, असे वाटत नाही. कारण ज्या शब्दांत ते टीका करतात ते माणुसकीला शोभणारे नाही.
प्रतीक पुरी हे प्रथम दर्जाची माणसे आणि दुय्यम दर्जाची माणसे असा उल्लेख करतात. माझा प्रश्न आहे, प्रथम दर्जाचे नेमके कोण? दुय्यम दर्जाचे नेमके कोण? आणि तुमचा दर्जा कोणता आहे, हे अगोदर ओळखा किंवा ठरवा आणि मग दुस-याविषयी बोला आणि आरोप करा.
दुय्यम दर्जाच्या माणसांच्या हाती मराठीचा गाडा दिला आहे, म्हणजे नेमका कुणी कुणाच्या हाती दिला आहे? याचा अर्थ काय?
राजकीय माणसाला, प्रतिभावंताला नावे ठेवली; दोष दिला; म्हणजे आपण मोठे होतो, या भ्रमात कदाचित प्रतीक पुरी असावेत, असाच याचा अर्थ निघतो. उपक्रम राबविणे, चळवळी चालविणे, संमेलने भरविणे यामागचा उद्देश व्यापकच असतो. हे समजून घेण्याची मात्र लायकी असावी लागते.
फ. मुं. शिंदे यांच्यावर आरोप करणारे पुरी कोण आहेत? कदाचित ते कोणाच्या तरी हातचे बाहुले आहे, असेच वाटते. त्यांचा बोलविता धनी कुणी दुसरा तर नाही ना? अशी शक्यता वाटल्याशिवाय राहत नाही.
मराठी भाषा व साहित्य टिकवायचे असेल, त्यात गुणात्मक वाढ करायची असेल, तर बंद सभागृहामध्ये चर्चा करून चालणार नाही; तर अशा प्रकारे खुलेआम संमेलने होणे गरजेचे असते. यामधून वाचक, लेखक, कवी यांचा संवाद होतच असतो आणि त्यामध्ये फ. मुं. शिंदेंसारखेच प्रतिभावंत साहित्यिक संमेलनाचे अध्यक्ष झाले पाहिजेत. एखाद्याला फ.मुं.चा विचार कळत नाही, त्यात फ. मुं.चा काय दोष? त्यांचे साहित्य ज्यांना कळत नाही किंवा जाणीवपूर्वक सूडबुद्धीने कळून घ्यायचे नाही, त्यांची कीव करावी वाटते आणि मुळात त्यांची समजून घेण्याची कुवतच नाही, असे म्हणावे लागते. कारण फ.मुं.वर टीका करणारे वाघाची कातडी पांघरलेले कोल्हे आहेत, असे वाटल्याशिवाय राहत नाही.
shivanandbhanuse@gmail.com