आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shivkanya Patil Writes About Being A Small Enterpreneur, Madhurima, Divya Marathi

झटकून काम करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरचा आर्थिक डोलारा सांभाळावा कसा, ही चिंता अनेक महिलांपुढे असते. घरातच बसून त्यावर उपाय होणार नसतो, त्यासाठी हातपाय हलवावे लागतात, कष्ट उपसावे लागतात. परंतु, अनेकदा काय करावं ते कळत नाही, शिक्षण नसतं, कौशल्य नसतं, त्यामुळे करू त्याला यश मिळेलच याची खात्री वाटत नाही.

परंतु या मेहनतीनंतरचं फळ अतिशय गोड असतं, आपली व्यक्ती म्हणून वाढ करणारं, सन्मान देणारं असतं. असं करणाऱ्या अनेक सर्वसामान्य घरातल्या स्त्रिया आपल्या आजूबाजूला असतात, त्यांची ओळख करून देणारं हे पाक्षिक सदर.

माझा दिवस सुरू होतो सकाळी चार वाजता. पापड, लोणची, भाजणी आणि इतर पिठे, अगरबत्ती, वाती इत्यादी उत्पादने विकण्यासाठी मी घरापासून चार किलोमीटर अंतरावरील मैदानावर जाते. नऊ वाजेपर्यंत घरी परत. मग ही उत्पादने तयार करण्याची धावपळ. गेल्या वर्षीपासून विविध प्रदर्शनांमध्ये स्टॉल्स लावतेय. त्यामुळे त्यासाठीचेही नियोजन असते. अनेकदा पॅकिंग करता करता रात्र कधी टळते, कळतही नाही. माझ्याकडे उपवास आणि इतर असे सर्व प्रकारचे पापड, चिप्स बनतात, ते आईच्या मार्गदर्शनाखाली. कोणत्या साहित्यात किती मीठ, तिखट टाकायचे आणि त्याचा योग्य रंग येईपर्यंत त्याला गॅसवर ठेवायचे की नाही, याबाबतचे सर्व निर्णय आईचे म्हणजेच आमच्या मास्टरशेफचे. यासाठी लागणारे सर्व साहित्य जमवण्याची जबाबदारी माझी. एकदा मिश्रण तयार झाल्यावर टेरेसवर मोठमोठी भांडी घेऊन जाणे आणि पापड्या, कुरडया, खारोड्या टाकण्याचे कामही माझे. हे पदार्थ वाळल्यावर त्याचे पॅकिंग करण्याचे काम बाबांचे. या सर्वांसाठी योग्य ती जागा उपलब्ध करून देण्यात महत्त्वाचा वाटा आहे दादा आणि वहिनीचा.

२०१०मध्ये मुलीच्या नावाने वैष्णवी गृह उद्योगाची सुरुवात केली, ती १०० रुपयांच्या अगरबत्तीच्या विक्रीपासून. उद्या म्हणजेच ९ जानेवारीला माझ्या व्यवसायाला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. नशिबाने अत्यंत हलाखीचे दिवस दाखवले, पण त्यातून जोमाने उभे राहण्याची प्रेरणाही दिली. माझी वैष्णवी मोठी होतेय, तसा हा छोटासा उद्योगही फुलतोय. अगरबत्तीसाठी दारोदार फिरताना काही पापड, कुरडया बनवणाऱ्या महिला भेटल्या. त्यांची उत्पादनेही विक्रीसाठी घेऊन फिरू लागले. मग ही उत्पादने विकताना मिळणाऱ्या नफ्यापेक्षा आपणच हे पदार्थ घरी तयार केले तर आणखी नफा मिळेल व दर्जाची हमीही घेता येईल, असे वाटले. आईनेही माझ्या विचारांना कृतीची जोड दिली. बटाट्याचे पापड, खारोड्या, गव्हाच्या शेवया, तांदळाचे पापड, साबुदाणा- बटाटा पापड, बटर चकली, ठेचा, बाजरीचे पापड, मुगवडे इत्यादी पदार्थ घरीच बनवू लागलो. वर्षभरातील सणवारांनुसार पदार्थ आणि उत्पादने विक्रीसाठी ठेवू लागले. उन्हाळ्यात सर्व प्रकारचे वाळवणाचे पदार्थ, पावसाळ्यात भाज्या निवडून, चिरून देणे, फुलांचे हार करून देणे, नवरात्रीत उपसावाचे पदार्थ अशी कामे लागलेली असतात. आमचे खास माठात घातलेले कारळाचे गावरान लोणचे तर परदेशापर्यंत पोहोचले आहे. ते १२ महिने मिळते.
सुदैवाने माझे कुटुंब या कामात १०० टक्के साथ देते. पण अनेक महिलांच्या पाठीशी विश्वासाने लढ म्हणणारे हात नसतात. त्यांना मला हेच सांगायचेय की, माझ्याही या लघुउद्योगाच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या. कुणाला उत्पादनांची चव पाहण्यासाठी दिलेल्या वाणवळ्यावरून अपमानित व्हावे लागले. पण हे टक्केटोणपे खाल्ल्यानेच आज माझ्या वयाच्या इतर महिलांपेक्षा मी धीट बनले. फारशी शिकलेली नसतानाही मला झोपडपट्टीतल्या महिलांसाठी व्यवसायासाठी प्रोत्साहनपर व्याख्यान देण्यासाठी बोलावतात. त्यांनाही मी तेच सांगते, कोणतेही काम कमी दर्जाचे नसते. प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असल्यास साध्या कामातूनही सोने पिकते. जिद्दीने ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना चार माणसेही जोडली जातात. ही माणसेच आपली संपत्ती. विक्रेता आणि ग्राहक या पलीकडे आमचे माणुसकीचे नाते आहे. मी दररोज विक्रीसाठी पाच ते सहा किलोमीटर पायी फिरते. बँक, दवाखाने, इतर कार्यालये सगळीकडे आता चांगल्या ओळखी झाल्या आहेत. कामासाठीच्या बाजारातील चकरा वेगळ्याच. आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीत घरातच रडत, कुढत बसण्यापेक्षा बाहेर पडून थोडे कष्ट घेतल्यास घराबाहेरचे जगही आपल्याला नव्याने भेटते. आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते. आपल्या कुटुंबाकरिता, आपल्याकरिता छोटासा उद्योग सुरू करणे फार अवघड नाही. गरज आहे, ती फक्त झटकून काम करण्याची. माझ्या या अनुभवावरून काही जणींना तरी स्वत:च्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा मिळाल्यास मला धन्य वाटेल.
बातम्या आणखी आहेत...