आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena And BJP Leader Narendra Modi Meet Uddhav Thackeray

भाजपचा डाव, शिवसेनेपुढे पेच !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नितीशकुमार एनडीएतून बाहेर पडल्याने, आता भाजपबरोबर केवळ अकाली दल व शिवसेना हे दोनच मित्रपक्ष उरले आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेचा भाव एनडीएमध्ये खरे तर खूपच वधारायला हवा. मात्र राज्यातील भाजप नेत्यांची एकंदरीत राजकीय वर्तणूक पाहता, शिवसेनेचा भाव वधारण्याऐवजी उलट उतरतोय की काय, असेच वाटावे अशी परिस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना जणू कोषात गेल्यासारखीच झाली आहे. उद्धव ठाकरे यांचा स्वभाव हा कायमच नेमस्त म्हणून ओळखला जायचा. मात्र राजकीय डावपेच आखण्यात उद्धव ठाकरे माहीर आहेत. बाळासाहेबांच्या निधनानंतर लगेचच शिवसेनेमध्ये मोठी पडझड सुरू होईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, उद्धव ठाकरे यांनी कौशल्याने असे काही होऊ दिले नाही. किंबहुना, महाराष्ट्रभर फिरून पक्षावरील आपली पकड अधिकच घट्ट केली. मात्र असे असूनही बाळासाहेबांशिवायच्या शिवसेनेला भाजप पूर्वीसारखी किंमत द्यायला तयार नाही. भाजपचे नव्याने झालेले तरुण अध्यक्ष देवेंद्र फडणवीस सातत्याने मनसेला युतीमध्ये येण्याचे आवतण देत असतात. यामुळे गेल्या दोन दशकांपेक्षाही जास्त काळ युतीत असलेल्या मित्रपक्षाला मिरच्या झोंबत असतील, याचा विचारही केला जात नाही. किंबहुना, शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर शिवसेनेला मिरच्या झोंबाव्यात, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठीच सातत्याने मनसेचा जप भाजपतर्फे केला जात आहे.
शिवसेना-भाजपच्या युतीत मनसे येणे शक्य नाही. शक्य नाही, याचे कारण साध्या अंकगणितात लपलेले आहे. शिवसेना व भाजपमध्ये लोकसभेसाठी अनुक्रमे 22 व 26 जागांची विभागणी झालेली आहे, तर हीच विभागणी विधानसभेसाठी 171 व 117 अशी झालेली आहे. मनसेसारखा नवा भिडू आल्यास तो लोकसभेला 5 ते 8 जागांच्या खाली समझोता करणार नाही, तर विधानसभेला 60-70 जागा पदरात पाडून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. मग इतक्या मोठ्या प्रमाणावर या जागा सोडायच्या कुणी, हा प्रश्न आहे. शिवाय ज्या शिवसेनेतून फुटून मनसे हा पक्ष निर्माण झाला, त्या पक्षाच्या उमेदवारांचे काम शिवसैनिकांनी कसे काय करायचे, असा राजकीयदृष्ट्या नैतिक प्रश्नही शिवसेनेपुढे आहेच. याला भाजपचे काही धुरीण उत्तर देताना सांगतात की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे काम नाही का काँग्रेसवाले करत? मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संपूर्ण राजकीय तत्त्वज्ञानच मुळी सत्तेभोवती फिरते. तर शिवसेनेचा मूळ गाभा हा सत्ताधार्‍यांच्या विरोधात लढण्यातून तयार झाला आहे. त्यामुळे काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे सत्तेसाठी शिवसैनिक या पद्धतीचा समझोता करणे शक्य नाही. दुसरीकडे, मनसेला युतीत घेण्याच्या सतत घोषणा केल्याने, शिवसेना या संघटनेच्या मनोधैर्याचे आपोआपच खच्चीकरण होते आहे. शाळेमध्ये वर्गातील एखाद्या विद्यार्थ्यास सतत तू ‘ढ’ आहेस, असे बोलत राहिल्यास तो अभ्यास करणेच सोडून देतो. परिणामी परीक्षेचा निकाल काय लागणार, हे त्याच्या आजूबाजूच्यांना आधीच समजलेले असते. सतत मनसेची गरज आहे, असे बोलल्याने शिवसेनेमध्ये आता युतीला जिंकवण्याची ताकद राहिलेली नाही, असे आपसूकपणेच शिवसैनिकांच्या मनावर बिंबवले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपपेक्षा जवळपास 60 जागा कमी लढवूनदेखील भाजपचे उमेदवार अधिक निवडून आले. तेव्हापासून महाराष्ट्रात आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात टक्कर देण्यासाठी शिवसेना नव्हे तर भारतीय जनता पक्ष हाच खरा पर्याय आहे, असे जनतेच्या मनावर ठसविण्याचे भाजप नेत्यांनी ठरविले आहे. मात्र जागावाटपामध्ये सुरुवातीपासून जे सूत्र ठरलेले आहे, ते सूत्र बदलण्यास शिवसेना कदापि तयार होणार नाही, हेदेखील चाणाक्ष भाजप नेत्यांना ठाऊक आहे. अशा वेळी शिवसेनेचे नैतिक खच्चीकरण करणे, हाच राजकीय पर्याय त्यांच्यापुढे शिल्लक आहे. मनसेला सोबत घेतले तरच काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव आपण करू शकतो, असे म्हणत राहायचे. मनसे बरोबर आल्यास उत्तमच! नाही आली तरी शिवसेनेचा जोर राहिलेला नाही, असे सांगत अधिकच्या जागा पदरात पाडून घ्यायचा, असा भाजपचा डाव असल्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.
मात्र नितीशकुमार एनडीएतून बाहेर पडल्यानंतर केंद्रीय पातळीवरील भाजप नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उसने अवसान आणून नितीशकुमार यांच्या विरोधात कितीही दवंडी त्यांनी पिटली तरी केवळ मोदींच्या करिश्म्यावर 2014 पर्यंतचा राजकीय शो खेचणे भाजपला अशक्य आहे. भारतीय राजकारणातील अस्पृश्यता किती भयंकर असते व ती सत्तेपासून कशी दूर खेचते, हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याआधीही अनुभवलेले असल्यामुळे नितीशकुमार बाहेर पडूनदेखील त्यांच्या विरोधात वैयक्तिक आरोप करण्याचे भाजप नेते एकीकडे पूर्णपणे टाळत असताना दुसरीकडे मात्र राज्यातील खूपच दूर असलेली सत्ता भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला शिवसेनेसारख्या मित्र पक्षाला डिवचण्यासाठी उद्युक्त करीत आहे. जनता दल(युनायटेड)चे नेते शरद यादव यांनी एनडीएच्या संयोजकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद अद्याप भरण्यात आलेले नाही. या पदासाठी अकाली दलाच्याच नेत्याला संधी दिली जाईल, अशी चर्चा भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात आहे. मात्र आता राज्यातील भाजप नेत्यांचे काड्या घालण्याचे राजकारण पाहून शिवसेनादेखील त्या जागेसाठी हट्ट धरून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांकडूनच एनडीएच्या संयोजकपदासाठी उद्धव ठाकरे यांची निवड झाली असल्याची पुडी सोडण्यात आली होती. ही पुडी सुटल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांची तोंडे पाहण्यासारखी झाली होती. राज्यातील बहुतांश सर्व प्रमुख भाजप नेते दिल्लीतील आपल्या नेत्यांकडे असे खरोखरीच झाले आहे काय, याची आवर्जून चौकशी करीत होते. त्यांच्या सुदैवाने ही बातमी खोटी ठरली असली तरी ऐन वेळी उद्धव ठाकरे या पदावर दावा सांगणारच नाहीत, याची कोणतीही खात्री नाही. त्यामुळे येणार्‍या काळात भाजपकडून आळवल्या जाणार्‍या मनसे रागावर जालीम उपाय म्हणून शिवसेना एनडीएच्या नाड्या आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करणार. नाड्या जरी हातात येत नसल्या तरी या नाड्यांचा इतका गुंता करून ठेवण्यात येईल की भाजपच्या केंद्रातील नेत्यांना तो सोडवता सोडवता तोंडाला फेस येईल व त्याचा राग ते राज्यातील भाजप नेत्यांवर नक्कीच काढतील, असे शिवसेनेच्या नेत्यांना वाटते आहे. हे सगळे होत असताना राज्यातील दोन प्रमुख विरोधी पक्ष आपापसात कुरघोडीचे राजकारण करीत असल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना खूपच हायसे वाटते आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात विधिमंडळात काय किंवा विधिमंडळाबाहेर काय, कोणत्याही प्रमुख प्रश्नावर शिवसेना असो वा भाजप; कुणीही मोठे आंदोलन पुकारलेले नाही. एखाद्या प्रश्नावर जोरजोरात बोलायचे व प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या आल्या की खुश होऊन पुन्हा दुसर्‍या कशात तरी मग्न व्हायचे, हेच कायम सुरू आहे. एकीकडे राज्यात पाऊस चांगला होतो आहे. शेतकरी खुश आहेत. दुसरीकडे विरोधक कोणत्याही प्रश्नावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करून त्याला टोक न काढता, एकमेकांशी भांडण्यात मश्गूल असल्यावर आणखी काय पाहिजे, असे सत्ताधार्‍यांना वाटणे साहजिक आहे. परिणामत: आधीच निर्णय घेण्याबाबत नकारात्मक भूमिका असणारे राज्याचे नेतृत्व अधिकच सुस्तावले आहे. त्यामुळेच येणार्‍या काळात सुस्त सरकार व एकमेकांवर कुरघोड्या करणारे विरोधक असेच चित्र महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळणार आहे.

samarkhadas@gmail.com