आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकल्या पानाचा देठ की हो.....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही वर्षांपूर्वी आम्ही एका ट्रॅव्हल कंपनीतर्फे उत्तर प्रदेशची सफर करायला गेलो होतो. ठरावीक वेळेला सर्व प्रवासी बसथांब्याजवळ जमा झाले आणि आपापल्या सीटची शोधाशोध करून बसत असतानाच एक पंचाहत्तरी ओलांडलेले कृश पण तरतरीत ज्येष्ठ नागरिक धावतपळत आले आणि ‘मला पहिल्या नंबरची सीट हवी हं,’ म्हणत आत घुसले. त्यांच्या वयाकडे पाहून सर्व प्रवाशांनी समजूतदारपणे त्यांना त्यांची जागा दिली.


ठरावीक ठिकाणी बस चहापाण्यासाठी थांबली आणि जो तो एकमेकांची चौकशी करू लागला. आता 12 दिवस सलग सगळ्यांना एकत्र राहायचे होते. आमच्या सीट्स बसच्या मधल्या भागात होत्या. आमच्या पाठी सत्तरीच्या दोन महिला होत्या. चांगल्या घरातल्या, सुशिक्षित, परदेशदेखील फिरून आलेल्या. एक नंबरच्या सीटवरचे गृहस्थ बालब्रह्मचारी. या दोघींशी त्यांची ओळख निघाली. ‘अगं, तू अमुक अमुक ना, या पेठेतले तुझे माहेर ना. मी तुमच्याकडे अनेकदा मुंज्या म्हणून जेवायला यायचो. ही तुझी खास मैत्रीण अमुक अमुक.’ या दोघींनीही त्यांना ओळखले. नंतर गप्पा मारता मारता हे गृहस्थ सतत ‘दे टाळी’ म्हणून हात पुढे करत. सुरुवातीला या दोघींनी त्यांना प्रतिसाद दिला, पण त्याचं प्रमाण वाढू लागलं तसं त्या टाळाटाळ करू लागल्या.


आमच्या यादीतलं स्थळ आलं की गाइड प्रथम माहिती सांगून मग त्याच्याबरोबर यायला सांगे. या दोघींनी यापूर्वी हा भाग पाहिलेला असल्याने त्या ठरावीक ठिकाणीच उतरत. वयाला सोसेल इतपतच चढउतार करत. एव्हाना ‘नंबर एक’ महाशय हळूहळू त्यांच्या रांगेत बसायला गेले होते. सतत त्या दोघींशीच बोलत होते.
त्या उतरल्या की ते उतरत. याला कंटाळून त्या बसमध्ये बसून राहिल्या तर तेही बसून राहत. पुढे पुढे तर त्या आधीच विचारत, उतरणार की नाही. ‘नंबर एक’च्या उत्तरावर ठरवत काय करायचे. हरिद्वारला तर ते या दोघींना म्हणाले, ‘तुम्ही निवांत गंगास्नान करा, मी किना-यावर तुमचे सामान सांभाळतो.’ त्या म्हणाल्या, ‘रूममधल्या नळांना गंगेचेच पाणी येते, आम्ही काही गंगास्नान करणार नाही.’ नंतर मात्र बाकीच्यांना विश्वासात घेऊन त्या गुपचूप गंगास्नान करून आल्या, त्यासाठीच त्या सहलीला आल्या होत्या.


त्याच कंपनीचा दुसरा गट हरिद्वारला आमच्याच हॉटेलमध्ये थांबला होता. मध्यमवयीन महिलांसमोर नंबर एक केवळ पंचा गुंडाळलेल्या अवस्थेत मार्गदर्शन करत होते. त्या गटाबरोबर खरे तर त्यांचे संयोजक होते.
एरवी तरुण-तरुणींच्या वागण्याने इतरांचे लक्ष विचलित होत असते. इथे मात्र ‘नंबर एक’नी सर्वांचे लक्ष स्वत:वर खिळवून ठेवले होते. सुरुवातीला आदरस्थानी असलेले ते गृहस्थ नंतर कुचेष्टेचा विषय झाले. शेवटी शेवटी तर या दोघी शाल डोक्यावर घेऊन झोपेचे सोंग करत. तरीही खाणंपिणं देण्याच्या निमित्ताने ‘नंबर एक’ त्यांना छेडतच राहिले. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात बसच्या चालकाने सुरक्षित वाहन चालवले म्हणून त्याला बक्षीस द्यायचे ठरले. आम्ही त्या दोघींना हसत हसत विनवले की तुम्ही सांगाल ती रक्कम ‘नंबर एक’ देतील. त्याही अतिशय समंजस. त्यांनी नंबर एककडून भरभक्कम देणगी चालकाला मिळवून दिली.


या सहलीत एक शिकायला मिळाले की केवळ वयाचे ज्येष्ठत्व तुम्हाला आदराचे स्थान मिळवून देत नाही. प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखून वागावे. भलत्या ठिकाणी सीमोल्लंघन केले तर समाजात आपले स्थान ढासळायला वेळ लागत नाही. आपला मान आपणच ठेवायचा असतो. या दोघी सभ्य घरातील महिला होत्या म्हणून त्यांनी सहन केले. एरवी ‘नंबर एक’ची चांगलीच धुलाई झाली असती.
निरोप घेताना आम्ही सर्वांनीच एकमेकांचे नंबर/पत्ते टिपून घेतले, पण ‘नंबर एक’कडे मात्र दुर्लक्ष केले.