आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझे माहेर पंढरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘माझे माहेर पंढरी। आहे भीवरेच्या तिरी।।’
श्रीक्षेत्र पंढरपुरी जन्म घेणे ही माझ्या दृष्टीने भाग्याचीच गोष्ट. महाराष्ट्रातील संतांचे आद्यदैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे नित्यनेमाने दर्शन, चंद्रभागा नदीचे स्नान याहून परमसुख ते कोणते? बालपण गावातल्या हरिदास वेस येथे आणि शिक्षण चंद्रभागेच्या तीरी असलेल्या लोकमान्य विद्यालयामध्ये. पंढरपुरात वर्षातून भरणा-याचारीही वा-यामोठ्याच. त्यामुळे गर्दीची सवय झालेली. घरी पेढ्यांचा व्यापार. घर गड्यांनी, माणसांनी सदैव भरलेलं. वेगवेगळ्या प्रदेशांतून वारकरी पंढरपुरात येत असल्यामुळे भाषेवरून कुठून आले हे चटकन ओळखायची सवय लागलेली. वारकरी मंडळींना
आम्ही ‘वाडसर’ म्हणतो. वारीत सगळ्यांचीच घरे खचाखच भरलेली. वाडसरांना प्रत्येकी माणशी दर ठरलेला. सामानाची नुसती पिशवी ठेवायची असली तरी त्याचे पैसे ठरलेले. वारी म्हणजे पंढरपुरातल्या लोकांची कमाई. श्रीविठ्ठलाच्या कृपेने सर्वांचा संसार प्रपंच चाललेला.
पूर्वी देऊळ मोकळे वाटायचे; पण आता त्याला बंदिस्त स्वरूप आल्यासारखे वाटते. दर्शनाच्या रांगेलाही सळयांची कुंपणे. बालपणी आम्ही पंचमीला विठ्ठलाच्या मंदिरातील चौकात खेळ खेळायचो. दररोज मंदिरात चक्रीभजन असायचे. ऐसपैस जागा असल्यामुळे चक्रीभजनात महाराजांच्या बरोबर नाचण्यात मजा वाटायची. शाळा सुटली की, सहा वाजता नित्यनेमाने चक्रीभजनाला जाण्याची सवय लागलेली. मंदिरातली धूपारती, शेजारती, महापूजा, पाद्यपूजा, दर्शनवेळा पाठ असायच्या. पहाटेच्या चार वाजताच्या आरतीला लवकर उठून स्नान करून दर्शनाला जाण्याचा नित्य नेम. पहाटेची प्रसन्न वेळ. देवाच्या दर्शनाने मन तृप्त व्हायचे. देवळात अनेक देवतांची मंदिरे. प्रत्येक देवाला नमस्कार केल्याशिवाय चैन पडणार नाही. पहाटे पाच वाजता महाद्वारात असलेल्या नामदेव पायरीजवळच्या आमच्या पेढ्यांच्या दुकानात बसायचे.
पहाटेही तीनचारशे रुपयांची विक्री व्हायची. देवाच्या दर्शनाला पहाटेही गर्दी असायची. पहाटे चार वाजता भक्तगण देवाचे अभंग गात गल्लीबोळातून दर्शनाला जाताना आजही पाहावयास मिळतात.
आजोबा धार्मिक स्वभावाचे. ते आम्हाला म्हणायचे, ‘लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य भेटे.’ आम्ही तो मूलमंत्र आजही जोपासतोय. वारकरी म्हणजे अतिथी. अतिथींचा आदर करणे, त्यांची सेवा करणे हाच खरा धर्म मानून वारकरी लोकांच्या गरजा भागविणे, त्यांना सुखसोयी देणे, विचारपूस करणे, चुकलेल्यांना मार्ग दाखविणे हे विचार सदैव मनावरती बिंबविले गेलेले.
वारकरी यायला लागले की, पंढरपुरात लगबग सुरू होते. दुकानांमध्ये खचाखच माल भरला जातो. प्रत्येक वस्तूची आवक वाढते. सगळ्या यंत्रणा कामाला लागतात. हजारोंनी भरणारी वारी आता लाखोंनी भरते आहे. याचे कारण विठ्ठलभक्ती मनामनात रुजली आहे. एवढी प्रचंड गर्दी वारीत असते; पण माझ्या माहेरी कधी दंगल झाली नाही हे मात्र त्रिवार सत्य. कुणालाही कसले आमंत्रण नसते; पण दाही दिशांतून वारकरी ऊन, वारा, पाऊस, तहान-भूक याची तमा न बाळगता पंढरीत येतो. संत,
वारकरी एकमेकांना उराउरी भेटतात, माउली-माउली म्हणून एकमेकांच्या पायांचे दर्शन घेतात. भजन, कीर्तनात रंगतात, नाचतात. इथेच सगळा मीपणा संपतो. सर्व संतांच्या पालख्यांचे आगमन आषाढ शुद्ध दशमीपर्यंत होते. पालखीबरोबर लहान-मोठे, वृद्ध, पुरुष-महिला, साधुसंत एवढेच काय, हत्ती, घोडे, बैल यांचेही आगमन पंढरपूरला होते. देव माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. इथे कुणी
लहान नाही, कुणी मोठा नाही, गरीब नाही की श्रीमंत नाही. सारे जण सारखेच भक्त. इथे भेदाभेद नाही. हे सारे मागे सोडून मगच पंढरपुरात प्रवेश. इथे फक्त भावभक्तीचा आणि माहेरी आल्याचा आनंद. हा आनंद भरभरून लुटला जातो. सगळी पंढरी नगरी विठ्ठलाच्या नामस्मरणाने दुमदुमलेली. चंद्रभागा नदीच्या काठ तुडुंब भरलेला, टाळ-मृदंगाने आणि कीर्तनाने रंगलेला, वारकरी भक्तगणांनी गजबजलेला, सर्व संतांच्या पालख्यांनी एकत्रित आलेला, ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’च्या गजराने दुमदुमणारा. असा अलौकिक वैकुंठ नगरीचा हा स्वर्गसुखाचा सोहळा माहेर पंढरीशिवाय कुठे
पाहावयास मिळणार? नामदेव, चोखामेळा, तुकाराम, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, नरहरी सोनार, सावता माळी, गोरा कुंभार, सोपानदेव, निवृत्तिनाथ, एकनाथ अशा अनेक संतांनी पंढरीनगरी आपले माहेरघर मानले. माहेरचा हा एकतेचा आणि शक्ती, भक्ती, मुक्तीचा वारसा आजही पंढरीत जोपासला जात आहे. गाडगे महाराज, तनपुरे महाराज, सोनोपंतमामा, रंगनाथ महाराज, अंमळनेरकर महाराज, परभणीकर महाराज, गयाबाई या सर्व साधुसंतांचे मोठमोठे मठ आजही गजबजलेले दिसतात. पंढरीतील अर्धचंद्रकोर वाहणा-याचंद्रभागा तीरावर असलेले भक्त पुंडलिकाचे मंदिर, महाद्वार घाट, कासार घाट, दत्त घाट, गोपाळपूर, विष्णुपद, अंबाबाई मंदिर हे परिसरही वारकरी मंडळींनी गजबजलेले असतात. इतके सारे वैभव माझ्या पंढरीनगरीत आहे. सासर कितीही श्रीमंत असले तरी माहेरची चटणी-भाकरीच गोड लागते. इथे भक्तीचे पंचपक्वान्न आहे. एकत्रित केलेला गोपाळकाला आहे. भूवैकुंठ नगरीचा साक्षात स्वयंभू असा श्री विठ्ठल आणि रखुमाई कर कटेवरती ठेवून युगे अठ्ठाविस विटेवरी उभी आहे. माहेरचा कर्ता माणूस सर्वांचे रक्षण, पालनपोषण करतो आहे. असे हे सर्वांचे नि माझे माहेर किती स्वर्गाहुनी सुंदर आहे. याचा महिमा मी वर्णावा तरी किती?
बातम्या आणखी आहेत...