आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनर्व्हाची ओसाडवाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘कहाँ गए वो लोग’, असे आपण माणसांबद्दल बोलतो. ‘शोले’सारख्या चित्रपटांच्या गाजलेल्या आठवणींनी मिनर्व्हाची ती वास्तूही एकेकाळी जिवंत होती. आता काप गेले भोकं उरली, अशी आहे सारी अवस्था आहे...

छातीत धडकी भरविणाऱ्या सॅडिस्टिक गब्बरसिंगच्या आवाजातील "कितने आदमी थे?' हा सवाल, "एक एक को चुन चुन के मारुंगा, चुन चुन के मारुंगा' असा वीरुने गब्बरसिंगला दिलेला इशारा, बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना... हे मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असतानाही वीरुने आपल्या प्रियतमेला ऐकविलेले कणखर बोल... "शोले' चित्रपटातील या व अशा अनेक गाजलेल्या संवादांची भेंडोळी डोक्यात उलगडत पावले मुंबईतील ग्रँटरोड(पश्चिम) येथील मिनर्व्हा चित्रपटगृहाकडे वळली होती...

जसजसे ते ठिकाण जवळ येऊ लागले, उत्सुकता अधिकच ताणली गेली. थोडे मागचेही म्हणजे तब्बल ४० वर्षांपूर्वीचे काही तपशील आठवू लागले. असे तपशील जे कधी अनुभवले नव्हते, पण वाचण्यात आले होते. मिनर्व्हा हे भारतातील पहिले ७० एमएमचा पडदा असलेले चित्रपटगृह. १९७०च्या दशकामध्ये या चित्रपटगृहात स्टिरिओफोनिक साऊंडसिस्टिम बसविण्यात आली होती. या वैशिष्ट्यांमुळे तिथे कोणताही चित्रपट बघणे, हा भव्यतेचा साक्षात्कार असायचा. अशाच माहोलमध्ये १५ ऑगस्ट १९७५ रोजी तिथे झळकला "शोले'. देशातील बाकी चित्रपटगृहांमध्येही त्याच दिवशी शोलेच्या सुमारे २५० प्रिंट‌्स सिनेप्रोजेक्टवर चालत्याबोलत्या झाल्या होत्या. पण मिनर्व्हाची बातच काही और होती. पहिले काही आठवडे ‘शोले’ फारसा चालत नव्हता. फ्लॉप श्रेणीमध्ये तो जमा होतोय की काय, अशी भीती दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि बाकीच्या कलाकारांच्या मनात दाटून राहिली होती. तिसऱ्या-चौथ्या आठवड्यापासून मात्र चमत्कार घडला. शोलेमधील जय, वीरु, बसंती, गब्बरसिंगसह गेलाबाजार सुरमा भोपाली, मौसीपासून सगळ्यांचे संवाद सोन्याचे आहेत, हे प्रेक्षकांना पटले. शोलेतील अॅक्शन, गाणी, संवाद, फायटिंग अशा सगळ्यांची स्टिरिओफोनिक साऊंड इफेक्टमध्ये खाशी मजा घेण्यासाठी प्रेक्षकांची मुंग्यांप्रमाणे मिनर्व्हाच्या तिकिटबारीवर रांग लागू लागली आणि चित्रपटांच्या इतिहासात मिनर्व्हा म्हणजे ‘शोले’, हे समीकरणच होऊन गेले.

मिनर्व्हाच्या दिशेने पावले टाकताना याच सगळ्या वाचलेल्या, ऐकलेल्या आठवणी दाटून येत होत्या. आता त्या वैभवशाली दिवसांची एकही खूण तिथे उरलेली नाही, हे आधीपासून माहीत होते. पण जसजसे मिनर्व्हा जिथे अत्यंत दिमाखात उभे होते ते ठिकाण दृष्टिपथात येऊ लागले, तसतशी हृदयाची धडधड आणखी वाढत गेली. लहानपणी एकदा पाहिलेली ती ‘मिनर्व्हा’ची वास्तू आता तिथे नव्हतीच. ती सात-आठ वर्षांपूर्वीच संपूर्ण पाडण्यात आली. आता त्या जागेवर आहे, भरवस्तीत फक्त मोकळे मैदान. पावसाळी गवतामुळे हिरवेगार झालेले. आता बिल्डरने ठोकलेल्या पत्र्यांनी ते मैदान वेढले गेले आहे. पुरते जेरबंद झाले आहे. ‘कहाँ गए वो लोग’, असे आपण माणसांबद्दल बोलतो. ‘शोले’सारख्या चित्रपटांच्या गाजलेल्या आठवणींनी मिनर्व्हाची ती वास्तूही एकेकाळी जिवंत होती. आता काप गेले भोकं उरली, अशी आहे सारी अवस्था आहे...
शोले मिनर्व्हाला प्रदर्शित झाला. त्यानंतर सुमारे सव्वापाच वर्षं तो या चित्रपटगृहात मुक्काम ठोकून होता. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात... मिनर्व्हाच्या आजूबाजूला राहणारे बरेचसे लोक त्या काळात शोलेची तिकिटे ब्लॅकमध्ये विकून रग्गड पैसेवाले झाले होते. त्यापैकी काही जणांनी याच भागात दुकाने घेऊन नवीन धंदे सुरू केले. काहींनी आपल्या गावांतल्या घरांवर सोन्याची कौले चढविली. या सगळ्या गोष्टी आता दंतकथा वाटाव्या अशा आहेत. या कथांचे ब्लॅकनायक मात्र आता मिनर्व्हाच्या परिसरात औषधालाही सापडत नाहीत. जिथे चित्रपटगृहच नामशेष झाले, तिथे त्याच्या आजूबाजूला रेंगाळणारे लोक तरी कसे उरतील? तरीही या ब्लॅकनायकांच्या पिढीतील कोणी सापडतो का, म्हणून शोध घेतला. मिनर्व्हाच्या समोरच हॉटेल शबनम आहे. खूप जुने हॉटेल. तेथील मालकाला चाळीस वर्षांपूर्वीच्या ‘शोले’च्या सुवर्णकाळाबद्दल विचारायला गेलो, तर तो म्हणाला की, जुन्या मालकाकडून आम्ही हे हॉटेल पाच वर्षांपूर्वीच विकत घेतलेय. आम्हाला मिनर्व्हाबद्दल फारशी माहिती नाही. ‘मिनर्व्हा’च्या आजूबाजूला शोलेच्या सुवर्णकाळात वस्ती होती मराठी, गुजराती व काही प्रमाणात मुस्लिमांची. तसा हा व्यापारी परिसर. काळ अनेक बदल घडवत असतो. या परिसरातील बहुतांश मराठी माणसे आता उपनगरांकडे सरकली आहेत. मुस्लिमांची संख्याही तुरळकच आहे. मिनर्व्हाच्या आजूबाजूचा सारा परिसर आता गुजराती मंडळींनी व्यापला आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अमाप दुकाने परिसरात बहरली आहेत. त्यातील दोन-तीन जुन्या दुकानांमध्ये जाऊन शोले, व मिनर्व्हा असा िवषय छेडण्याचा प्रयत्न केला, तर त्या मंडळींनी ‘सुना है पर हमको पता नही’, असा सूर लावला...

‘शोले’च्या अनेक कथा उराशी कवटाळून मिनर्व्हाच्या जागी आता जे मोकळे मैदान पसरले आहे, त्याच्या मागील अंगाला सुमारे शतकभर जुनी एक आइस फॅक्टरी आहे. तेथे मिनर्व्हातील शोले दिवसांच्या आठवणी जपणारी दोन माणसे भेटली. पण त्यांचीही उमर ५५ ते ५७ वर्षांच्या दरम्यानची. त्यांनी १०-१५ वर्षांचे असताना मिनर्व्हामध्ये जाऊन ‘शोले’ पाहिलेला. सुनील भोसले व मिलिंद पवार अशी त्यांची ओळख. मिलिंद पवार म्हणाले, ७० एम.एम.च्या भव्य पडद्यावर मी लहानपणी पाहिलेला शोले अजूनही डोळ्यासमोरून हलायला तयार नाही. तुला आठवते की नाही माहीत नाही, ‘शोले’मध्ये अमिताभ साकारत असलेला जय हा त्याच्या हातातील नाण्याने छापा व काटा करत असल्याची काही दृश्ये आहेत. एका दृश्यात हे नाणे जमिनीवर पडते, त्या वेळी त्याचा जो खणकन् आवाज येतो, तो स्टिरिओफोनिक साऊंडमध्ये ऐकायला मला आवडायचे. ‘शोले’तील बसंतीच्या टांग्याचा गब्बरचे डाकू करीत असलेला पाठलाग व पार्श्वभूमीला आर. डी. बर्मनचे संगीत, गब्बरसिंगच्या माणसांबरोबर जय आणि वीरुची चकमक उडायची, तेव्हा होणारे गोळीबारांचे आवाज, त्या चित्रपटांतील पाच गाणी या साऱ्या साऱ्या गोष्टी स्टिरिओफोनिक साऊंडमध्ये ऐकताना खूप मजा यायची. ‘शोले’मध्ये बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या जणू आपल्याच हातापायांच्या जवळून जात आहेत असा जबरदस्त इफेक्ट मिळायचा...

सुनील भोसले सांगत होते की, ‘शोले’चे एक तिकीट १९७५मध्ये ३०० रुपयांना ब्लॅकमध्ये विकले गेल्याचे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. मिनर्व्हाला शोले प्रदर्शित झाल्यावर काही आठवडे मंद गेले. त्यानंतर मात्र चित्रपटगृहाची करंट बुकिंगची खिडकी पुढे पाच वर्षं बंदच राहिली होती! कारण अॅडव्हान्स बुकिंगची खिडकी उघडली की, अवघ्या एक तासात पुढच्या दोन आठवड्यांचे बुकिंग झालेले असायचे. त्यामुळे ब्लॅकने सिनेमाची तिकिटे विकणाऱ्यांची चांदी, सोने, प्लॅटिनम जे जे काही व्हायचे ते सारे झाले... ब्लॅकवाले इतके गब्बर बनले की, गब्बरसिंगही त्यांच्यापुढे गरीब भासावा... आता ब्लॅकनायकांपैकी फारच थोडे मिनर्व्हा परिसरात उरले आहेत. जवळजवळ नाहीच म्हणा ना... त्यातील अर्धे म्हातारे झाले, कोणाचे निधन झाले आणि बाकीचे एकदम व्हाइटकॉलर झालेत... देव पावतो, तसा शोले अनेकांना पावला! मला आठवते की, शोलेच्या संवादांच्या एल. पी. रेकॉर्ड‌्स त्या काळी निघाल्या होत्या. मिनर्व्हाच्या परिसरात अनेक चिरकुट हॉटेल्स होती, तिथे रेकॉर्डरवर प्रत्येक शोच्या आधी या रेकॉर्ड लावल्या जायच्या. हॉटेलमध्ये बसून खाणारे-पिणारे तसेच हॉटेलबाहेर उत्साही फुकटे लोक असे सारे सारे शोलेचे संवाद कान देऊन ऐकायचे. हे करूनही त्यांचे कान तृप्त झालेले नसायचे. मग ते मिनर्व्हामध्ये जाऊन शोले बघायचे आणि समाधानी मनाने बाहेर यायचे. तीस-तीस वेळा मिनर्व्हामध्ये शोले बघितलेले लोक आमच्या लहानपणी माहीत होते... आता सारेच इतिहासजमा झाले आहे. मिनर्व्हा हे सिंगलस्क्रीन थिएटर आणि शोले गाजविणारे कमिटेड प्रेक्षकही...

सुनील भोसले व मिलिंद पवार यांनी ४० वर्षांपूर्वीचे उभे केलेले शोलेयुग अनुभवतानाही वर्तमान मनात खुपत होते. मिनर्व्हा पाडून त्या जागी उरलेल्या मोकळ्या मैदानावर भविष्यात टोलेजंग इमारत होईलही...पण तिचा पाया हा ‘शोले’च्या आठवणींचा राहणार आहे. ‘शोले’नंतर मिनर्व्हामध्ये खूप वर्षांनी "सडक' हा चित्रपट खूप चालला होता. जुन्या सोनेरी दिवसांच्या आठवणी त्या वेळी पुन्हा काहीशा तरारून आल्या होत्या. त्या आठवणींचे लेणे वस्तुसंग्रहालय रूपात मिनर्व्हाच्या जागी उभारल्या जाणाऱ्या नव्या इमारतीत छोट्या स्वरूपात का होईना असावे, असे कोणाही सच्च्या सिनेप्रेमीला वाटणारच... मिनर्व्हाकडे पाठ करून जेव्हा पुन्हा ग्रँटरोड रेल्वेस्थानकाकडे निघालो, तेव्हा मनात द्वंद्व होते. मिनर्व्हाच्या जागी असलेली ओसाडवाडी कुठेतरी डाचत होती आणि दुसऱ्या बाजूला शोलेच्या सुवर्णस्मृतींची पाखरे भिरभिरत होती...