आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॉरगॉट्न हिरो!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्यांनी ज्यांनी ‘शोले’ बघितला, त्या सगळ्यांच्या
मनावर तो कायमचा कोरला गेला.
पण यामागे मेहनत आणि करामत
होती, संकलक माधवराव शिंदेंची…
चित्रपटाचा खराखुरा आधारस्तंभ कोण? लेखक? निर्माता, दिग्दर्शक की नायक? सत्यजित रे म्हणायचे, संकलक! त्याने ठरवलं तर उंची गाठतो, नाहीतर तळ. म्हणूनच त्याचं काम सर्वांपेक्षा आव्हानात्मक. झुपकेदार मिशा राखलेले, करारी मुद्रेचे, कायम सफेद कुर्ता पायजमा अशा साध्या वेशात वावरणारे माधवराव शिंदे हे एकेकाळचे हिंदी चित्रपटसृष्टीतले दादा संकलक वा एडिटर. जी. पी. सिप्पींच्या निर्मिती संस्थेत महिना दोन हजार रुपये पगारावर नोकरीस होते. दिग्दर्शक रमेश सिप्पींनी माधवरावांच्या पुढ्यात जवळपास ११ तासांची आणि तब्बल तीन लाख फूट लांबीची फिल्म टाकली होती. माधवरावांना त्या जंजाळातून तीनेक तासांचा ‘शोले’ पडद्यावर आणायचा होता. हे काम ‘हर्क्युलियन टास्क’ प्रकारातलं, सृजनाच्या अत्युच्च आविष्कारात मोडणारं होतं आणि हीच गोष्ट माधवरावांना त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट संकलनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देण्यास पुरेशी होती. गौरवाची बाब म्हणजे, आज लोकप्रिय क्लासिक ठरलेल्या या सिनेमाला १९७५ मध्ये मिळालेला तो एकमेव पुरस्कार होता. त्यावेळी ना दिग्दर्शक, ना लेखक ना नायक-खलनायक यापैकी एकही जण समीक्षकांच्या पसंतीस उतरला नव्हता. पण माधवराव त्याला अपवाद ठरले होते. ‘शोले’च्या अलीकडे-पलीकडे त्यांनी, सीता और गीता, शान, शक्ती, सागर, बुनियाद ही दूरदर्शन मालिका असे मिळून शंभरहून अधिक चित्रपटांचं संकलन केलं होतं. शाहरुख खानचा रमेश सिप्पीदिग्दर्शित जमाना दिवाना (१९९५) हा माधवरावांचा संकलक म्हणून अखेरचा चित्रपट ठरला. स्वाभाविकपणे निवृत्तीनंतर चित्रपटसृष्टीशी असलेला संबंध कमी होत गेला आणि एका टप्प्यावर इंडस्ट्रीने माधवरावांना जणू विस्मृतीच्या कप्प्यात ढकलून दिलं. हाताला काम नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडत गेली. मुंबईतल्या परळ भागातलं राहातं घर कोसळल्यामुळे अखेरच्या दिवसांत धारावीतल्या संक्रमण शिबिरातल्या १६० फुटांच्या खोलीतलं जीणं त्यांच्या नशिबी आलं. केटरिंगची कामं करून उदरनिर्वाह करणाऱ्या धाकट्या मुलीनं त्यांचा अखेरपर्यंत सांभाळ केला. मनसेची चित्रपट शाखा, फिल्म एडिटर्स असोसिएशन, दिवंगत काँग्रेस नेते बॅ. ए.आर. अंतुले आदींनी मिळून थोडीफार मदत केली, पण ज्यांना स्टार बनवण्यासाठी आपलं सगळं कौशल्य खर्ची घातलं त्या इंडस्ट्रीतल्या बड्या नटांनी बेदखल केल्याची खंत उराशी बाळगतच तीन वर्षांपूर्वी माधवरांवांनी जगाचा निरोप घेतला…