आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लपवलेली गोष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण जे काही बघितलं, ते खूप अनपेक्षित होतं. धक्कादायक होतं. मनातला संशय खरा ठरवणारं आणि लाज आणणारंही होतं तरीही आपण दुसऱ्यांची बाजू सांभाळून घेतली. झाकूनही ठेवली... 

दुपार कलली होती. बारमध्ये लागलेले दोन-चार टेबल उठून गेले होते. मी सकाळच्या ड्यूटीला दांडी मारली होती. कॉलेजमध्ये कार्यक्रम असल्यामुळे सकाळच्या ड्यूटीला आज जाता आलं नव्हतं. सबनीस काउंटरवर बसला होता. मी किचनमध्ये एक चक्कर मारली. वस्तादनं अजून रोट्या लावल्या नव्हत्या, म्हणून रेस्टॉरंटवरच्या रिकाम्या काउंटरवर पेपर वाचत बसलो. एकेक पान चाळताना पटकन एका बातमीवर डोळे खिळले. ‘बिल मागायला गेलेल्या वेटरला कस्टमरची मारहाण.’ बातमीचा मथळा वाचताच दत्ता नावाचा वेटर पुन्हा डोळ्यासमोर दिसू लागला. पण, या बातमीशी आपला काही संबंध नाही, म्हणून पटकन उठलो. खिशातला कंगवा काढून बेसिनवरच्या आरशात भांग पाडला. आरशात पाहिल्यावर माझीच प्रतिमा मला पुन्हा सवाल करू लागली. प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं होतं; पण हॉटेल व्यवस्थेच्या दबावामुळे मी तोंडाला पट्टी लावली होती. का मी झालो होतो निःशब्द? अथवा कोणत्या अशा ओझ्याखाली मी वाकलो होतो? खरं तर सभा, मॅनेजरचं भाषण, अर्जावरच्या सह्या, पेपरातली बातमी हे सगळं विसरून माझ्यासकट अख्खा हॉटेल वर्ग षंढ झाला होता. आंदोलन वांझोटं ठरलं होतं... 

गायकवाड नावाचा वेटर खुर्चीत बसून जेवत होता. आठ-दहा रोट्या, डिश भरून भाजी, पाण्याचा जग आणि मुठीत चोरून आणलेल्या सात-आठ लसणाच्या कांड्या! हा सारा पसारा टेबलवर मांडलेला. समोर टी.व्ही. सुरू होता. मी गार्डन स्वच्छ झाडून झाडांना पाइपानं पाणी सोडत होतो. एवढ्यात गायकवाडनं मला आवाज दिला. बहुधा टेबल लागले असे समजून मी हातातला पाइप बाजूला ठेवून आत पळालो. तो अजूनही टी. व्ही. पाहत होता. खरकटं ताट, रोट्याची डाली, पाण्याचा जग तसंच टेबलवर होतं. मला पाहून गायकवाड म्हणाला, ‘ही खरकटी प्लेट मोरीत नेऊन टाक आणि हा टेबल क्लीन कर.’ ‘तू का नेऊन ठेवत नाही?’ असं म्हणताच, त्याला मी उलटून बोलतो आहे, असे वाटून खूप राग आला. ‘औकात में रहकर काम करा कर।’ असे ऐकवून तो माझ्याकडे रागाने पाहत खरकटी प्लेट किचनमध्ये घेऊन गेला. परत आला आणि ‘यापुढे माझ्याशी नीट बोलायचं. हेल्पर आहेस, हेल्परसारखं राहायचं. समजलं. जास्त मस्ती आल्यासारखं बोलायचं नाही. शेठला सांगून मस्ती जिरवायला मला वेळ लागणार नाही,’ असे बोलून तो परत टी.व्ही. पाहत बसला. 

परत मी रेस्टॉरंट झाडायला घेतलं. झाडत झाडत गायकवाड बसलेल्या टेबलजवळ आलो. त्याला पाय वर कर म्हणालो. त्यानं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. टेबलाखालून झाडून घेताना त्याच्या पायाला झाडू लागला. तसा तो पटकन उठला आणि त्याने माझ्या मुस्कटात ठेवून दिली. कान सुन्न झाला. आता माझा तोल सुटला होता. मागचा-पुढचा विचार न करता, त्याला मी हातातल्या झाडूनेच मारू लागलो. अंबादासने मध्ये पडून हातातला झाडू हिसकावून घेतला. दोघांनाही समजावलं, पण आता मी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हतो. त्याच्याही तोंडचा पट्टा थांबत नव्हता. बोलता बोलता त्यानं मायबहीण उधडली. मला शिवी सहन झाली नाही. तसाच गळचुंडीला धरून त्याला ओढत ओढत बाहेर नेला. आमच्या दोघांमध्ये पडायला कोणीच तयार नव्हतं. जांघेत हात घालून त्याला तसाच वर उचलला अन् भिंतीवर फेकला. त्यामुळे भिंतीवरून खाली आलेला टॉयलेटचा जुनाट पाइप फटकन फुटला. सगळीकडे टॉयलेटचे पाणी वाहू लागले. सबनीस काउंटरवर होता, वाहणारं घाण पाणी पाहिल्यावर पळतच आला. त्यानेच लगेच प्लंबरला फोन करून नवा पाइप बसवला आणि प्लंबरच्या मजुरीसह पाइपचं बिलही त्यानं आम्हा दोघांच्या नावावर टाकलं. त्या महिन्यात मला फक्त पन्नास रुपये पगार मिळाला. 

संध्याकाळ झाली होती. एकेक टेबल लागत होतं. जगजित सिंगच्या गझलेनं हॉटेलमधलं वातावरण एकदम भावूक बनलं होतं. रोज संध्याकाळी न चुकता अनिल शेठ जगजितसिंग किंवा पंकज उधास यांच्या गझल  लावायचेच. त्यामुळे कस्टमरला क्वॉर्टर कधी संपायची, हे कळायचंसुद्धा नाही. कधी कधी जास्त झाल्यावर एखाद्या कस्टमरच्या डोळ्यांत पाणीसुद्धा जमायचं. शुक्रवार, रविवार, मंगळवार आणि बुधवार हॉटेल फुल्लं व्हायचं. वेटर, हेल्पर एकमेकांना बोलायलाही सवड मिळायची नाही. आजही संध्याकाळपासून हॅटेलला कस्टमरची भरती आली होती. 

सातपुतेच्या टेबलवर मटन हंडी आणि बाजरीच्या भाकरीची ऑर्डर होती. सुनील वस्ताद दोन्हीकडच्या ऑर्डर काढत होता. ठाकूर वस्ताद अजून आला नव्हता. मोरीवाल्या बाईसुद्धा किचनमध्ये दिसत नव्हत्या. नंदी चुपचाप मोरीत भांडे धूत होती. संजूशेठ आले, त्यांनी हॉटेलमध्ये एक चक्कर मारली. दोन-तीन टेबल वगळता सारे टेबल लागले होते. आज ‘फूड’चा धंदा वाढणार, म्हणून शेठची आशा बळावली. पटकन त्यांनी किशोरला बोलवून मटन, चिकन, फिश आणि प्रॉन्जचा स्टॉक चेक केला. सातपुतेला आणखी दहा चिकन आणायला पिटाळलं. शशीशेठ यायचे बाकी होते. ते रात्री नऊ नंतर यायचे. आल्यावर किचनमध्ये उभे राहायचे. त्यांना पाहून ठाकूर वस्तादचा हातही पटापट चालायचा. 

संजूशेठनं मला आवाज दिला. मोरीवाल्या बाईच्या घरी जाऊन तिला घेऊन ये म्हणाले. दोन माणसांमुळे ऑर्डर तुंबल्या होत्या. मी लक्ष्मणच्या सायकलवर टांग टाकली. मोरीवाली दूर एका कोनाड्यात भाड्यानं राहायची. तिचा मुलगा आणि ती. तिनं तिच्याबद्दल कधीच काही सांगितलं नाही आणि कोणी तिच्याबद्दल जाणूनही घेतलं नाही. हॉटेल लाइनमध्ये कोणी सहसा पटकन मोकळं होत नाही. ‘बशी फुटली, नोकरी सुटली!’ असं आयुष्य असतं सगळ्यांचं! जोरजोरात पायंडल मारत मोरीवालीचं घर गाठलं. पाहतो तर  तिच्या घराला कुलूप होतं. पोरगंही घरी नव्हतं. वस्तादही नेमका याच वेळेला गायब होता. दोघं सोबत तर नसतील ना? असा संशय मनात येऊन गेला. आता संजूशेठ दोघांवर भडकल्याशिवाय राहत नाही, असं मी मनात गृहीत धरलं. मला वस्तादाचं काही वाटत नव्हतं, पण त्यात मोरीवाली बाईचा नाहक बळी जाणार होता. एकदा माझ्याकडून तीन डिनर प्लेट फुटल्यावर तिनं मला वाचवलं होतं. जशा प्लेट फुटल्या, तिनं त्या उचलून पटकन खिडकीतून बाहेरच्या नाल्यात फेकून दिल्या होत्या. वस्ताद असता तर त्यानं नक्कीच शेठला सांगितलं असतं आणि माझ्या पगारातून पैसे कापले असते. 

मी सायकल पार्क केली. खाली जाण्याआगोदर शटरकडे गेलो. थोडा पुढं गेल्यावर शटर उचकटल्यासारखं वाटलं. बघतो तर थोडं उघडं दिसलं. म्हटलं, कोणी तरी आत दिसतंय खरं, पायाचा आवाज न होऊ देता जवळ गेलो. खाली बसलो. कानोसा घेतला, तर आतून बाईचे  दबल्या आवाजातले चित्कार येत होते. म्हणून वाकून आत बघितलं. ठाकूर वस्ताद मोरीवाल्या बाईसोबत संग करत होता. काय करावं काही सुचेना. संजूशेठनं मला या बाईला शोधायला घरी पाठवलं. आणि ती इथं... काय सांगावं शेठला? हा माझ्यापुढं मोठा पेच होता. मग मी थोडा वेळ तिथंच बसून राहिलो. आपण काय या दोघांची राखण करत बसलोय, अस वाटून माझीच मला लाज वाटली. शांतपणे पार्किंगमध्ये आलो. सायकलच्या पुढच्या टायरची हवा सोडली. संजूशेठ खाली वाट पाहत होते. ‘इतका वेळ लावतात का रे?’ त्यांनी प्रश्न केला. ‘शेठ सायकल पंचर झालीय, तशीच ढकलत आणली.’ मी कसाबसा बोलून गेलो. ‘भेटली का मोरीवाली बाई?’ आता आली का पंचाईत. शेठनं पुन्हा विचारलं ‘ती नाही भेटली, पण तिचा मुलगा सांगत होता की, आई मला पुस्तकं आणायला गेली म्हणून.’ संजूशेठ काहीच बोलले नाही. मी टेबलकडे निघून गेलो. तेवढ्या कस्टमरच्या गर्दीतही माझंच मन मला खात होतं. मी लपवलेली एक गोष्ट काही केल्या माझा पिच्छा सोडत नव्हती... 

- रमेश रावळकर, rameshrawalkar@gmail.com 
लेखकाचा संपर्क : ९४०३०६७८२४ 
बातम्या आणखी आहेत...