आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी निघाले परदेशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘‘आज तुमच्यापुरती खिचडी करून घेता का जरा, आता सवय करायला हवी तुम्हांला, की फलाहारावरच भागवता, पोट बिघडलंय नं तुमचं, की लंघनच करता? बरं असतं तब्बेतीला, मला तर बाई अजिबाऽऽत भूक नाही.” “अगं, फलाहार काय, लंघन काय?” “प्ली ज, मला जरा बॅग भरायचीय, मी निघाऽऽले, परदेशी.”

“अहो, हे पाह्यलंत का,” सुधाताईंनी पेपर सतीशरावांसमोर धरून उत्साहानं म्हटलं. 
“हुं.” सतीशरावांची थंड प्रतिक्रिया. 
“अहो...”
“क्काय?” ते शब्दकोडं सोडवत होते.
“किती मोठ्ठी जाहिरात आलीय ह्या प्रवास कंपनीची. 
“हं.”
“ते शब्दकोडं ठेवा बाजूला, नाहीतर मी जातेच कशी,” असं पुटपुटत त्या आत निघून गेल्या आणि थोड्याच वेळात भजी आणि चहा घेऊन आल्या.
“पुन्हा चहा आणि भजीही?” 
“हं, सहजच.”
‘व्वा! छान.”
‘अहो...” 
“ही भजी खाऊ दे बुवा आधी, तूही घे.”
“मला नकोत, पण आपण जाऊ या का परदेशी ट्रिपला, मोठ्ठा डिस्काउंट आहे.”
“हो क्का, तरीच ही भजी. परदेशात? आपल्या देशातच तर किती वैविध्य आहे, उत्तर प्रदेश, मेघालय, पंजाब, बंगाल, आणि काश्मीर? सारे जहां से अच्छा.”
त्यांचं प्रास्ताविक ऐकून सुधाताई आतमध्ये जाण्यास निघाल्या. 
“काय झालं गं?” 
“हूं, कध्धी मेली हौस पुरवायची नाही.”
‘सुटलो बुवा, डिस्काउंट म्हणे. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. म्हातारपणाची पुंजी आपली, राखून ठेवायला नको? शिवाय, विमानात बसायची भीती वाटते, आपली झाकली मूठ.’ 
एवढ्यात सुधाताई बाहेर आल्या. 
“गेला का राग?”
“इश्श, राग कसला, नक्कोच तो परदेश, आपण आपला देशच पाहू, कुठून सुरुवात करायची? बंगाल?” 
“छे, कित्ती वास येतो तिथं.”
“बरं, मेघालय? उंचच उंच घाट, खोल दऱ्या.”
“घाटात चक्कर येते, ऐकूनच गरगरायला झालं बघ.”
“बसा खाली, पडाल नाहीतर. मग एमपी किंवा यूपी? नर्मदा परिक्रमा, गंगास्नान करू, तेवढाच पुण्यलाभ.”
“पुण्य? त्वचेचा रोग मात्र व्हायचा एखादा, तो गंगा शुध्दीकरण प्रकल्प पूर्ण झाला नं की जाऊ हं आपण. तोपर्यंत तू घरातल्या नळाखाली ‘गंगे च, यमुने च’ असं म्हणत स्नान कर कशी.”
“ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. चला, स्वयंपाकाला लागते मी आता, तुमच्या आवडीची कारल्याची भाजी करतेय ओलं खोबरं घालून, शिवाय सांजाही करते गोडाचा.”
“क्या बात है!”
जेवताना सुधाताईंनी पुन्हा विषय काढला. “अहो, मी काय म्हणते?”
“भाजी छान झालीय आणि सांजाही गोड झालाय बेताचा. तुम्हा बायकांचं नं, स्वयंपाक कसा झाला हे ऐकल्याशिवाय पोटच भरत नाही बुवा.”
“पण मी ते नव्हते विचारत.”
“मग?”
“मी म्हणत होते, ते तिकडं कुठं दूर नकोच जायला.”
“नक्को नं, तेच तर, नसती दगदग, घरात बसावं, तब्बेतीत जेवावं, शब्दकोडं सोडवावं, बस्स.’
“एवढं दूर नको जायला तर आपल्या महाराष्ट्रातलेच गडकिल्ले, धार्मिक स्थळं, हिल स्टेशनं, अभयारण्य पाहू.” 
“किती गर्दी असते सगळीकडे. पूर्वीच्या काळी माणसं तीर्थयात्रेलासुद्धा कधीमधी जात. आजकाल आपल्या आजूबाजूचा परिसर माहीत नसला तरी चालेल, पण दूऽऽर कुठेतरी जायचं. मग ट्रॅफिक जाम, रस्त्यावरचे खड्डे, तो धिंगाणा, वैताग नुसता. त्यापेक्षा घरांत बसावं.”
“कोडी सोडवत,” असं पुटपुटत सुधाताई आत जायला निघाल्या.
तेवढ्यात, “अगं, चहा करतेस कां, आज आता तल्लफ आलीय जरा, हवाच तशी पडलीय ना.” 
“करते. म्हणे घरात बसावं. आधी सासूबाई होत्या, नंतर मुलांची शाळा, अभ्यास, आतां नातवंडांना सांभाळायचं म्हणून, घरातच तर बसलोय आयुष्यभर,” असं म्हणत सुधाताई जराशा नाराजीनंच आत गेल्या. जरा वेळानं त्या चहा घेऊन बाहेर आल्या. दोघंही चहा घेऊ लागले.
“छान झालाय चहा, अशा पावसाळी हवेत आलं घातलेला चहा म्हणजे अमृतच, अहाहा.”
“अहो, चला नं, बाहेर चक्कर टाकून येऊ गार्डनमध्ये. संध्याकाळी बाहेरच जेवू, हं?”
“अगं, काय झालंय तरी काय तुला, आपलं वय आहे काय अशा पावसाळी हवेत बाहेर फिरायचं? सर्दी पडसं झालं म्हणजे?’ सतीशरावांनी त्यांची कल्पना झटकूनच टाकली. 
“छत्री घेते नं मी,” सुधाताईही पिच्छा सोडायला तयार नव्हत्या. 
“असं म्हणतेस? आलोही असतो गं, पण आज माझे गुडघे दुखताहेत, पोटही बिघडलंय, शिवाय हे शब्दकोडंही पाठवायचंय आजच्या आज. असं करतेस कां, तूं एकटीच जाऊन ये नं. मी म्हणतो जाच तूं, तुझी आवडती पावभाजीही खाऊन ये, तेवढाच तुला चेंज, आल्यावर माझ्यासाठी फक्त मऊ खिचडी तेवढी टाकशील.” आता मात्र सुधाताईंचा संयम संपला. 
“काय म्हणता, एकटी जाऊ? आणि काय हो, वय काय वय, तरुणपणी तरी गेलोय का आपण कुठं बाहेर कुणाच्या लग्न-मुंजीशिवाय?”
“अगं, अगं, अशी रागावतेस काय?” सतीशरावांना एरव्ही आपल्या मनाप्रमाणे वागणाऱ्या सुधाताईंचा हा अवतार नवाच होता.
“काही बोलू नका, नाही नं यायचं तुम्हांला, ठीक आहे, नका येऊ तुम्ही. जातेच मी आज, ए क टी.” सुधाताईंनी मनाशी काहीतरी निश्चय केला आणि त्या आतमध्ये निघून गेल्या. 
“अरे बापरे! खरंच रागावली की काय? हं, होईल शांत थोड्या वेळात, तिचा राग टिकत नाही फार वेळ, माहीत आहे मला,” असं स्वत:शीच म्हणत सतीशराव पुन्हा कोड्याकडे वळले. एवढ्यात सुधाताई कपडे बदलून आणि पर्स घेऊन बाहेर आल्या आणि ‘येते मी’ असं म्हणत बाहेर पडल्या. सतीशराव अवाक् होऊन पाहातच राहिले. 
तास दीड तासाने सुधाताई परत आल्या. पर्समधून कागद काढून त्यांनी टेबलवर ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. ते बघून सतीशराव म्हणाले, “काय, आलीस फिरून? खूश दिसतेस अगदी, कोणी मैत्रीण भेटली होती वाटतं?” 
“हो, मी खरंच खूप खुश आहे, पण कोणी मैत्रीण भेटली म्हणून नाही, तर...” आणि त्यांनी आपलं वाक्य मुद्दामच अर्धवट सोडलं.
“तर? तर काय?”
“नवीन मैत्रिणी मिळणार आहेत म्हणून,” सुधाताईंनी टेबलावरचा कागद त्यांच्या हातांत दिला. 
“हे काय, हा कागद कसला? बघू, पावती दिसतेय. अगं, देणगी-बिणगी दिलीस की काय? तुझा काही नेम नाही बुवा. अगं, आपली म्हातारपणाची पुंजी...” सतीशराव अगदी गोंधळून गेले होते आणि सुधाताई त्यांचा उडालेला हा गोंधळ मनापासून एंजाॅय करत होत्या. अखेर त्या म्हणाल्या, “तुम्ही मुळीच काळजी करू नका, आपली म्हातारपणाची पुंजी अगदी सुरक्षित आहे बरं, ही पावतीच आहे, पण देणगीची नाही.”
“देणगीची नाही? मऽऽग?”
“ही पावती आहे माझ्या पहिल्यावहिल्या परदेश प्रवासाच्या बुकिंगची,” प्रत्येक शब्दांवर जोर देत सुधाताई म्हणाल्या. 
“क्काय, परदेश प्रवास? मी मुळीच येणार नाही हं तुझ्यासोबत परदेशी-बिरदेशी, सांगून ठेवतो, काय ठेवलंय काय त्या परदेशांत. अगं, आपला भारत देश... पण, कुठं चाललोय तरी कुठं आपण दोघं?”
“था य लं ड. आणि आपण दोघं नाही, फक्त मी.” 
“थाय, थायलंडला? आणि फक्त तू, कोणाबरोबर? कोण आहे सोबत? की एकटीच?” सतीशरावांना काय बोलावं ते सुचत नव्हतं.
“हे पाहा, शांत व्हा. इथं बसा बरं आधी. हं, हे पाणी प्या.” 
“अगं, पण, परदेशी, तू... त... एकटीच...”
“कशाला हवंय बाई सोबतीला कोणी? जेव्हा आहेत ‘विमेन्स स्पेशल’च्या मैत्रिणी?” सुधाताई चक्क गुणगुणू लागल्या. थोड्या वेळानं त्या म्हणाल्या, “अहो, मी काय म्हणते?” 
“आता अजूनही काही राह्यलंच आहे का?” 
“नाही, तसं काही राहिलं नाही. पण, प्लीज आज तुमच्यापुरती खिचडी करून घेता का जरा, आता सवय करायला हवी तुम्हांला. की फलाहारावरच भागवता, पोट बिघडलंय नं तुमचं? की लंघनच करता? बरं असतं तब्बेतीला, मला तर बाई अजिबाऽऽत भूक नाही.”
“अगं, फलाहार काय, लंघन काय?” 
“प्ली ज, मला जरा बॅग भरायचीय, मी निघाऽऽले, परदेशी.”
 
- भारती रायबागकर, नाशिक, bharati.raibagkar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...