आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिश्‍ता वही सोच नयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘स्वयंपाकघरातील दिनचर्येविषयी मी जो विचार केला आहे तो तुझ्यापुढे मांडते. सकाळी मी तुझा आणि समीरचा डबा तयार करणार. नाश्त्याची जबाबदारी तू घे. सर्वजण मिळून चहा-नाश्ता करत जाऊ. नंतर ते घेऊन तू ऑफिसला जात जा. सकाळचा स्वयंपाक मी करणार, रात्रीचा तू करत जा. आणि हो, संध्याकाळी तू आल्यावर मी चहा करणार. त्या वेळी दिवसभरात काय घडलं ते आपण एकमेकींना सांगत जाऊ.’ 

सहा वाजता गजर झाला. केतकी बिछान्यावर उठून बसली. दोन्ही हात जोडून ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ म्हणाली, आरशासमोर आली आणि स्वत:च्या प्रतिबिंबाशी हसून म्हणाली, ‘मी खूश आहे, खूश राहणार आणि माझ्या परिवारालाही आनंदी ठेवणार.’

तिनं पटापट सकाळची कामं केली, मुलाचा आणि सुनेचा डबा तयार केला. आता सून सेजल नाश्त्याच्या तयारीला लागली. दोन वर्षांपूर्वी सेजल समीरशी लग्न करून घरी आली, तेव्हा केतकीनं सेजलला सांगितलं, “हे बघ, स्वयंपाकघरातील दिनचर्येविषयी मी जो विचार केला आहे तो तुझ्यापुढे मांडते. सकाळी मी तुझा आणि समीरचा डबा तयार करणार. नाश्त्याची जबाबदारी तू घे. सर्वजण मिळून नाश्ता करत जाऊ. नंतर मी ज्यांना जे हवं ते चहादूध वगैरे देत जाईन. त्याचा आस्वाद घेऊन तू ऑफिसला जा.” “सकाळचा स्वयंपाक मी करणार, रात्रीचा तू कर. आणि हो, संध्याकाळी तू आल्यावर मी चहा करणार. त्या वेळी दिवसभरात काय काय घडलं ते आपण दोघी एकमेकींना सांगत जाऊ. काही गोष्टींवर सल्ला विचारू, चर्चा करू. एखाद्या गोष्टींबद्दल राग आला असेल तर त्याबद्दल मोकळेपणानं बोलू. आणि हो, एकमेकींच्या चांगल्या गोष्टींची प्रशंसा पण करू.” सेजलला सासूबाईंनी सांगितलेल्या गोष्टी आवडल्या.

समीर, सेजल दूध घेऊन ऑफिसला जाण्याची तयारी करू लागले. राजन, समीरचे पप्पा चहा घेऊन शेजारच्या प्रकाशरावांकडे गेले. केतकी तिचा चहा घेऊन खुर्चीत बसली. चहाच्या कपातून निघणारी वाफ आणि मनात उचबंळून येणारे विचार एकमेकांत गुंतून गेले. दहा मिनिटांपूर्वी मन एकदम शांत होते. पण रेखाच्या, मोठ्या बहिणीच्या, फोनने तिच्या मनात विचारांच्या वावटळी उठल्या होत्या. रेखा फोनवर वारंवार एकच गोष्ट सांगत होती, ‘मी सुनेला नेहमी मुलगीच मानत आले तरीसुद्धा तिने मला काय काय गोष्टी ऐकवल्या.’ खरं तर प्रत्येक घरात या गोष्टी घडतच असतात. पण केतकीचं मन तर्कवितर्कात फसले आहे. आपली सून मुलीसारखी का? सुनेला तिच्याच रूपात प्रेम नाही देता येत? आपण वारंवार सुनेला मुलगी मानण्याची बतावणी करून स्वत:च्या अपराध भावनेला तर लपवत नाही आहोत? ही बदलत्या काळाची परिभाषा आहे का?
“आई, कसला विचार करता आहात? कुणाचा फोन होता?”
“रेखामावशीचा फोन होता. संध्याकाळी तू आल्यावर एका विषयावर चर्चा करू.”

“ठीक आहे, मी संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करेन,” सेजल म्हणाली. असं एवढं काय घडलंय की, रेखा वारंवार सुनेला नावं ठेवत होती? मला तरी वाटतंय की, रेखा जरी सुनेला लेकच मानत असली तरी रेखाचं अंतर्मन अजूनही तिला सूनच मानत आहे. म्हणूनच ती ही गोष्ट वारंवार सांगत होती. यापेक्षा ४०-४५ वर्षांपूर्वी बरं होतं. सासू सासू होती आणि सून सून. आजकालच्या सासवांच्या मनात सुनेविषयी इतकं प्रेम उचंबळून येतं की, त्या साऱ्या दुनियेला सांगत सुटतात, माझी सून माझी मुलगीच आहे. त्याच परिणाम असा झाला की, ती सुनेकडून जास्त अपेक्षा करू लागली. रेखाला असं तर नसेल ना वाटत की, मी सुनेला मुलगी मानलंय म्हणजे तिने माझा प्रत्येक शब्द मानलाच पाहिजे? मुलीचा राग आला तर त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तिला समजून घेतो, मग सुनेला का नाही समजून घेत? 
संध्याकाळी सेजल घरी आली. दोघी चहा घेऊन बसल्या. सकाळी रेखासोबत फोनवर झालेलं बोलणं केतकीनं सेजलला सांगितलं आणि विचारलं, “सेजल, तुला काय वाटतं, सुनेला मुलगी मानायचं का?”

“आई, आपण मुलीला सून मानतो का? नाही नं? सुनेला सूनच राहू दे आणि मुलीला मुलगी. जसे बाबा बाबाच असतात अन आई आई. त्यांना कोणासारखं होण्याची गरज नसते. जेव्हा दुनिया सांगते की, सून मुलीसारखी असायला हवी त्या वेळी आम्ही आमचं स्वतंत्र अस्तित्व गमावून बसतो. मला कोणासारखं नाही व्हायचंय कारण मी स्वत: एक पूर्ण व्यक्तिमत्त्व आहे. आणि हो, मी काल पण माझ्या आईवडलांची मुलगी होते, आजही आहे आणि उद्याही मुलगीच राहीन. माझ्या आईवडलांची जागा मी माझ्या सासूसासऱ्यांना कधीच नाही देणार.”

“तुला असं म्हणायचंय का, सासूसासऱ्यांपेक्षा जास्त मोठेपण आईवडलांना द्यायला हवं?”
“आई, मला असं अजिबात म्हणायचं नाहीये कारण दोन्ही त्यांच्या त्यांच्या जागी परिपूर्ण आहेत. आईनं मला जन्म दिला. सासूबाईंनी जीवनसाथी दिला. आईने संस्कार दिले पण संस्कारांना धरून कुटुंब चालवण्यास तुम्ही शिकवलं. आईनं समजूतदार करून पाठवलं पण कारण नसतांना गैरसमज करून न घेण्याची शिकवण तुम्ही दिलीत. आई मुलीवर खूप प्रेम करते त्यामुळे ती तिला शिस्त नाही लावू शकत. शिस्त सासूबाईच छान लावू शकतात.”

केतकी आणि सेजल बोलत होत्या त्याच वेळी रेखाची सून मयुरी आली. आल्याबरोबर ती सेजलच्या गळ्यात पडून रडू लागली. शांत झाल्यावर म्हणाली, “आईंनी मला कल्पनाताईंना रेल्वे स्टेशनवरून आणायला सांगितलं होतं. पण अचानक ऑफिसमध्ये कामाचा खूपच ताण माझ्यावर आला आणि त्या गडबडीत मी ताईंना आणायला विसरले. आई माझ्यावर खूपच चिडल्या. म्हणाल्या, तुझ्या बहिणीला आणायचं असतं तर तू अशीच विसरली असतीस का? तुम्हाला कितीही मुलीसारखं वागवा, तुम्ही आपल्या मनासारखंच वागणार. करिअरसोबतच संसाराकडेही लक्ष देत चला.”

केतकी म्हणाली, “सेजल तू आणि मयुरी गप्पा मारा, मी चहा घेऊन येते.” आत आल्यावर तिने रेखाला फोन लावला आणि ताबडतोब घरी यायला सांगितलं. 
केतकी चहा घेऊन बाहेर आली. थोड्याच वेळात रेखा तिथे आहे. मयुरी रेखाला आलेली पाहून दचकली. केतकी म्हणाली, “मीच तिला बोलावलंय. तुला जे काही बोलायचय ते मनमोकळेपणानं बोल.” मयुरी म्हणाली, “आई, माझी चूक झाली. मी क्षमा मागते. इथून पुढे ऑफिससोबतच घराकडेही लक्ष देईन.”

केतकी म्हणाली, “हे बघ रेखा, कारण नसताना वर्षानुवर्षं या समाजानं सासूसुनेचं नातं बदनाम केलं आहे. सुनेला नेहमी वाटतं की, सासू सतत टोमणे मारते आणि सासूला वाटतं की, सून मुद्दाम आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. डोक्यातून या गोष्टींना हद्दपार करायला हवं. सुनेला मुलगी समजण्यापेक्षा तिला माणूस समजलं पाहिजे. तिचा मान ठेवला पाहिजे. तिच्यावर प्रेम करायला पाहिजे. रेखा, अडचणीच्या काळी, संकटात त्यांना मदत करायला हवी. कोणतीच व्यक्ती परिपूर्ण नसते. त्यामुळे सुनेमध्ये काही गोष्टींची कमतरता असली तरी त्याचा स्वीकार करायला हवा. आणि हो, सेजल-मयुरी तुम्हीपण आमच्या चुका समजून घ्या. आपण एकमेकीच्या गुणांची पण प्रशंसा करायला हवी. आपण हसतखेळत एकमेकींना समजून घेत राहिलो तरच आपण छान जगू शकू.”

रेखा पटकन पुढे आली आणि तिने केतकीला मिठी मारली आणि म्हणाली, “तू मला सासू सुनेच्या नात्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन दिलास.”
त्याच वेळी सेजल पुढे आली आणि तिने पटकन चौघींची एक सेल्फी काढली.
 
- हेमलता झंवर, नाशिक, hemazawar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...