आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जासूसी उलटते तेव्‍हा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळची सगळी कामं आवरून झाली होती. म्हणजे मुलं शाळेत आणि अहो आॅफिसात गेले होते. कामवाल्या मावशी पण काम आवरून गेल्या होत्या. टीव्हीवरच्या आवडत्या मालिका पाहून झाल्या होत्या. एका जासूसी पुस्तकाची काही पानं वाचून झाली होती. मग वर्तमानपत्र वाचायला घेतलं. त्यात एक बातमी होती, सुधारगृहातून पळून गेलेल्या मुलांची. अशाच प्रकारची आणखी एक बातमी होती, मजा म्हणून शाळेत न जाता पळून गेलेल्या मुलांची. कंटाळून शेवटी मी वर्तमानपत्र बंद केलं. आणि मोबाइल हाती घेतला. त्यातही दोनतीन ग्रुपवर पळून गेलेल्या मुलांचे फोटो आणि सापडल्यास संपर्कासाठी त्यांच्या पालकांचे माेबाइल नंबर. मला वाटलं, आजचा दिवस काही चांगला नाही. ही मुलं हरवतातच कशी? पळून जातातच कशी? यांच्याकडे कुणाचंच लक्ष कसं जात नाही?

विचार करता करता कधी डोळा लागला, ते कळलंच नाही. जाग आली तेव्हा साडेपाच वाजले होेते. घाईने उठले. फ्रेश झाले. चहा घेऊन आळस संपवला. भाजीची पिशवी व पर्स घेतली. दाराला कुलूप घातलं. मुलं शाळेतून परस्पर क्लासला जाणार होती आणि अहो क्लबमध्ये. आठच्या आत घरी कोणीच येणार नव्हतं. मग रमतगमतच निघाले. भाजी आणणं हे निमित्त होतं. त्यामुळे घरातनं बाहेर पडायला मिळतं. चार ओळखीची माणसं भेटतात. गप्पा होतात. बातम्यांची देवाणघेवाण होेत. मुख्य म्हणजे विंडो शाॅपिंग होते. आयतं जनरल नाॅलेज अपडेट राहतं. आणि व्यायाम होऊन शरीरालाही फायदा होतो. अशा रीतीने तनमनधन एकत्र येण्याचा हा सुवर्णयोग असतो.
मनात विचार आला, निवांत वेळ आहे तर थोड्या दूर अंतरावर असणाऱ्या मंदिरात जाऊन येऊया. थोडेसे पुण्य पदरी पाडून घेऊया. येताना भाजी आणूया. विचार लगेच अमलात आणला. मंदिरातून परत येत असताना अंधार पडायला सुरुवात झाली होती. सहज इकडेतिकडे बघणं चालू होतं. पुढे एक नऊदहा वर्षांचा मुलगा चालला होता. पाठीला दप्तर होतं. अंगात शाळेचा गणवेश होता. जवळपास त्याच्यासोबत वडीलधारं कुणीच दिसत नव्हतं. तो मुलगाही घाईघाईने निघाला होता. खरं तर ही वेळ मुलांनी घरी किंवा मैदानावर असण्याची होती. मग हा रस्त्यावर कसा? आणि एकटाच कसा? एवढ्या घाईत कुठे चालला आहे? तो हरवला आहे की पळून चाललाय? एक ना दोन. दुपारी वाचलेल्या कादंबरीतील जासूस माझ्यावर स्वार झाला होता.

मी त्याला गाठलं आणि त्याची विचारपूस करू लागले, तसा तो अधिकच भरभर चालू लागला. मग मात्र माझ्यातील जासूसाची खात्रीच पाटली की, तो मुलगा पळून चालला आहे. शाळा सुटल्यानंतर घरी न जाता तो इकडे परस्पर आला आहे. त्यामुळे शाळेचा गणवेश, दप्तर जवळ आहे. आवाजात शक्य तेवढं मार्दव आणून त्याला विचारलं, “बाळा, कुठे राहतोस तू?”
“मी घरात राहतो.” 
आवाजात राग बिलकुल येणार नाही अशी खबरदारी घेऊन, “बरं, तुझं नाव काय?”
“सलील.”
मला वाटलं, चला, बोलायला सुरुवात तर झाली. 
“अरे, तुझं पूर्ण नाव काय?”
“सलील,” पुन्हा हेच उत्तर. 
बळजबरीनं चेहऱ्यावर हसू आणत, “अरे, घरी नाही गेलास का, घर कुठं आहे, लांब आहे का, घरी कोण कोण आहे?”

यावर काहीच उत्तर आलं नाही. मात्र, त्याच्या चालण्याची गती पहिल्यापेक्षा वाढली होती. तो हातचा निसटू नये म्हणून मीही माझी गती वाढवली. जणू आम्ही दोघे शिवाशिवीचा खेळ खेळत होतो. या पाठशिवणीच्या आणि प्रश्नोत्तरांच्या खेळात बराच वेळ गेला होता आणि अंधार वाढायला सुरुवात झाली होती.
मग मी पुढे होऊन त्याचा हात पकडला आणि पर्समधनं एक चाॅकलेट काढून त्याच्या हातात काेंबलं. मला वाटलं, चाॅकलेट पाहून तो खुश होईल. पण झालं उलटंच. त्याने चाॅकलेट फेकून दिलं, माझ्या हाताचा चावा घेऊन स्वत:चा हात सोडवून घेतला आणि हिसडा देऊन पळाला. आता मीही पुरती जिद्दीला पेटले होते. रस्त्यातील माणसं, वाहनं आणि मुख्य म्हणजे स्वत:च्या वयाची पर्वा न करता त्याच्या मागे पळू लागले. येणारे-जाणारे आमच्याकडे रस्त्यात थांबून पाहताहेत हे फार उशिरा माझ्या लक्षात अालं. शालेय जीवनानंतर असं पळण्याचा योग कधी न आल्यानं, सराव कमी पडल्यानं माझा नंबर हुकला. आणि तो मुलगा पुढे गेला.  पण तो माझ्या नजरेच्या टप्प्यात होता. मी पाहिलं की, जवळच पोलिस स्टेशन होतं. माझं नशीब जोरावर होतं, कारण मी त्याला पकडून पोलिसांकडेच सोपवणार होते. पण तोच पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढताना दिसला. मीही त्याच्या मागोमाग एकेक पायरी चढत आत शिरले, आयुष्यात पहिल्यांदाच. एक जबाबदार आणि जागरूक नागरिकाचे कर्तव्य पार पाडल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. त्यात मी चिंब भिजून निघाले होते. आणि सारे श्रम विसरले होते. 

तेवढ्यात आतून एक पोलिस अधिकारी बाहेर येताना दिसले. मला खूप आनंद झाला. आता आपण त्यांना हे सर्व थरारनाट्य रंगवून सांगायचं, मग ते आपलं अभिनंदन करतील, आभार मानतील. दुसऱ्या दिवशी फोटोसह वर्तमानपत्रात ही बातमी झळकेल. भाजी आणण्यासारखं सामान्य कार्य न करता एका जागरूक नागरिकासारखं कार्य करून असं असामान्य झालो, याची माहिती आणि एक संदेश त्यात असेल. आपल्याच सत्काराचे फोटो प्रसिद्ध होतील. मग फोनवर, व्हाॅट्सअॅपवर आणि फेसबुकवर अभिनंदनाचा होणारा वर्षाव, त्यात चिंब भिजलेली मी आणि घरच्यांनी आपल्याला सामान्य, अतिसामान्य समजण्याची केलेली चूक सुधारण्याची धडपड हे सर्व माझ्या डोळ्यांसमोरनं सरकलं. तोच एवढा मोठा आवाज कशाचा झाला म्हणून दचकून मी माझ्या भावविश्वातून जागी झाले, तर?
तर काय!

ते पोलिस अधिकारी ओरडत होते. मला वाटलं बरं झालं, त्या मुलाला ओरडतायत. काही शिस्त, धाक पाहिजे की नाही? अशीच सवय लागते मग. पण समोर तो मुलगा कुठे आहे? बिचारा बावरला असेल. रडत असेल त्याला आधार द्यायला हवा. लहान आहे अजून, असं म्हणून पाहते तो कुठेच दिसेना. त्या पोलिसाला सांगावं म्हणून त्यांच्याकडे वळले तर काय, तो मुलगा त्यांना घट्ट धरून होता आणि काही तरी त्यांना सांगत होता, माझ्याकडे पाहत हातवारे करत होता. आता माझ्या ध्यानात आलं, ते त्या मुलाला नाही, मला ओरडत होते.

म्हणत होते, “अहो बाई, ऐकू न येण्याचं सोंग करता काय? चांगल्या घरच्या दिसता आणि लोकांची मुलं पळवायचं काम करता. काही वाटत नाही तुम्हाला?  मुलांना चाॅकलेटमधनं गुंगीचं औषध देऊन पळवून नेता? बरं झालं, माझा मुलगा तुमच्या तावडीत सापडला नाही ते.” हे आणि असं बरंच काही ऐकताना आपण खरंच बहिरे असतो तर किती बरं झालं असतं असं वाटून गेलं. पण नुसतं वाटून आता काहीच उपयोग नव्हता. मी त्यांना खरं सांगण्याचा खूप प्रयत्न करत होते. पण महत्प्रयासाने तोंडातून शब्द बाहेर येत होते. आणि तेही घशातील हुंदक्याने चिंब भिजून. त्यामुळे मी काय बोलते ते माझं मलाच कळत नव्हतं. त्यांना काय कळलं ते एक तर त्यांनाच माहीत किंवा देवाला माहीत.

काय करावं काहीच सुचत नव्हतं. तेवढ्यात “नमस्कार लघाटे साहेब,” असा यांचा आवाज कानावर आला. 
“अरे, नमस्कार साहेब, तुम्ही इकडे कुठे?”
समोरचा पोलिसी खाक्या आता एकदम मधात भिजून निथळत माझ्या कानावरनं मागे पोहोचला. “अहो, मी आधी ओळख करून देतो. ही माझी मिसेस आणि चारुलता, हे लघाटे साहेब. माझे मित्र. कामानिमित्त आमची एवढ्यातच ओळख झाली, पण खूप जुने मित्र असल्यासारखं वाटतंय.” 

यांनी माझी व त्यांची ओळख करून दिली. नंतर त्यांनी गैरसमजातून सर्व झालं, असं सांगून माझ्याकडे दिलगिरीही व्यक्त केली. त्या मुलानेही नंतर नवीन “काकू”कडून चाॅकलेट स्वीकारलं. पुन्हा एकदा नमस्कार-चमत्कार होऊन आमची वरात घराकडे निघाली.

खरं तर त्याच क्षणी धरणीमाय दुभंगावी आणि तिने मला पोटात सामावून घ्यावं, असं वाटत होतं. परंतु आपलं पुण्य तेवढं नसावं किंवा धरणी दुभंगण्याएवढं काही झालं नसावं अथवा तेवढी जागा तिथे शिल्लक नसावी, म्हणून तसं काहीच झालं नाही.

पोलिस स्टेशनात स्टेनगनच्या गोळ्या झेलल्या होत्या, पण आता घरी जाऊन तोफगोळ्यांना कसं तोंड द्यावं याचा विचार करते आहे. परमेश्वर तेही झेलण्याची मला शक्ती देवो.
 
- संध्या कुर्वे, अहमदनगर
बातम्या आणखी आहेत...