आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बयतन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘एकीकडे आमच्या पोरांचं हे लाडकं बालपण तर दुसरीकडे तो मुलगा. कुटुंबाची जबाबदारी किती सहजपणे घेतलीय त्याने. पावसाळ्यापूर्वी बयतन जमा करायला निघालाय. हे काम खरं तर मोठ्या माणसांचं आणि संपूर्ण एका दिवसाचं होतं. हा चिमुरडा हे कसं काय करणार होता कुणास ठाऊक. मला मोठाच प्रश्न होता. पण माझ्याकडे काहीएक करण्याजोगं नव्हतं.’ 

हातात चहाचा कप घेऊन खिडकीत बसून पाणी पिणाऱ्या कोकिळेला न्याहाळत बसणं हा माझा रोजचा आवडता उपक्रम. आज मी तशीच बसले होते. नेहमीच्या पक्ष्यांच्या आवाजाऐवजी आज झाड तोडण्याचा आवाज येत होता. नजर फिरवली पण कुठे काही कुणी नजरेस पडेना. आपल्या आवारात कुणी नाही अशी खात्री झाली आणि पेपरसमोर घेतला, तोच कड्डाकड आवाज झाला. चांगली मोठी फांदी तुटली वाटतं. खिडकीतूनच डोकावले पण कुणी दिसेचना. आता लाकूड तोडण्याचा आवाज येऊ लागला, आवाज वाढू लागला. शेवटी जागेवरून उठलेच आणि मागे परसात गेले.

दहाबारा वर्षांचा चिमुकला सराईतपणे पूर्ण ताकदीनिशी त्या तुटलेल्या फांदीवर कुऱ्हाडीचे घाव घालत होता. जीव ओतून एकाग्रतेने मनापासून तो करत असलेले काम क्षणभर मी पाहातच राहिले. एरवी झाड तोडणाऱ्याला ओरडणे, सुरक्षारक्षकाला फोन करणे, आणि माझा आरडाओरडा ऐकून शेजारी जमा होणे असं बरंच काही होई. पण आज... आज मी त्याच्याकडे पाहातच राहिले. ताकदीने फांदीवर पडणारा कुऱ्हाडीचा घाव, त्याच्या कामातलं कसब, एकाग्रता सारं सारं काही बघतच राहावं असं होतं. 
खूपदा असं होतं, लहानपणी हमखास व्हायचं. 

माझं बरंचसं बालपण मामांकडे चाळीत गेलं. तिथे सार्वजनिक नळांवर धुणीभांडी होत. मावशी भांडी घासे तेव्हा असंच पाहात राहावसं वाटे. राखेने खर्खर आवाज करत पितळी तांब्या वा भांडं मावशी सोन्याचा करून टाकी. तिच्या त्या भांड्यावरून फिरणाऱ्या हाताला एक लय असे, ताल असे. राख सुकू नये म्हणुन दोनचार भांडी घासून झाली की, ती धुवावी लागत. धुतलेली भांडी मावशी माझ्याकडे देई, मी ती घरात नेऊन ठेवी. यासाठी मला तिथे उभं राहावे लागे. तसंच कपडे धुताना शु…शु... करत तालासुरात असा काही सपका मारायची की, कुणाच्या अंगावर पाण्याचा शिंतोडाही उडत नसे. एकटक पाहात राहावं असं कसब होतं कामात.

मनापासून आनंदाने काम करणाऱ्या चिमुकल्याचं मला भारीच कौतुक वाटलं. बघता बघता आता पोटात गलबलायला लागलं, मनात माया दाटून आली. घरात आले, गार पाण्याने भरलेलं तांब्याभांडं घेतलं आणि मागे गेले. त्याला आवाज दिला. तांब्याभांडं पुढे केलं, हे घे, पाणी पी. माझ्या हातातून तांब्याभांडं घेतलं. माझं असं अचानक त्याला पाणी देणं, तेही ओळखदेख नसताना, त्याचंही त्याला आश्चर्य नव्हतं की, उपकार नव्हते. प्रसन्न मुद्रा, अजिबात त्रासिक नसलेला चेहरा. भांड्याला तोंड न लावता पूर्ण तांब्याभर पाणी प्यायला. मला त्याच्या पाणी पिण्याचंही कौतुक वाटलं. लगेच कामाला लागण्याचा मस्त मूड होता त्याचा. तो वळणार तेवढ्यात मी त्याला विचारलं,
“का रे ही एवढी मोठी फांदी तू कशी काय तोडलीस?”
“थोडी कुऱ्हाड चालवली, मग उडी मारून फांदीला लटकलो आणि खाली ओढत राहिलो. थोड्या वेळात तुटली. देवाच्या पान्याआदी बयतन (जळण) जमा करायचंय,” अगदी सहज बोलला. 
माझ्या मनात चर्रर्र झालं. बापरे. पडण्याची, आपटण्याची, लागण्याची कशाचीच याला अजिबात भीती कशी वाटली नाही?
“आणि नेशील कशी काय?”
माझा पुढच्या प्रश्नालाही त्याचं उत्तर तयार होतं.
“आता लहान लहान फांद्या तोडतो, सायकलवर बांधतो आणि नेतो.”
जणू हे त्याच्या डाव्या हाताचं काम होतं. हुश्श नाही, हाश्श नाही, घाम पुसणं नाही, काही नाही.
एकच लक्ष्य, बयतन जमा करायचं.

“शाळेत जातो का?”
“मंग.”
“कितवीत आहेस?”
“सातीत गेलो.”
त्याच्या भाषेतलं हे बिनधास्त दिलेलं उत्तर होतं.
कुटुंबाची जबाबदारी पेलणार.
बयतन जमा करणार.
हेही एक बालपण.

मला आमची मुलं आठवली. सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलाभोवती सारं घर फिरतं. अरे ऊठ ऊठ ऊठ. इकडे डब्याची तयारी, त्याने दूध प्यावं म्हणून चाललेली लाडीगुडी. दप्तर भरा, डबा भरा, बुटं टाय. अशी तयारी झाली की, स्वारी निघते बसस्टॉपवर. त्याचं दप्तर, डबा इ. धरायला बहुधा आई किंवा बाबा असतातच. बस येते, चारसहा तासांसाठी पोरगं शाळेत जातंय, त्यांचं एकमेकांना निरोप देणं, हे कौतुक बघण्यासारखंच असतं. आमच्या पोरांचं हे एक लाडकं बालपण, कुटुंबाची जबाबदारी किती सहजपणे घेतलीय त्याने. पावसाळ्यापूर्वी बयतन जमा करायला निघालाय. हे काम खरं तर मोठ्या माणसांचं आणि संपूर्ण एका दिवसाचं होतं. हा चिमुरडा हे कसं काय करणार होता कुणास ठाऊक. मला मोठाच प्रश्न होता. पण माझ्याकडे काहीएक करण्याजोगं नव्हतं. 
घरात आले. नेहमीप्रमाणे रेडिओ सुरू होता. 

“हम बच्चे हिन्दुस्थान के है, हम बच्चे हिन्दुस्थान के.”
निवेदिका सुमधुर आवाजात म्हणत होत्या, टीचभर पोटासाठी ही सोनेरी आयुष्य मातीमोल नका करू. शिक्षणापासून वंचित मुलं म्हणजे सुगंधाविण फुलं.
देशाचं भविष्य ह्या बालकांच्या हाती आहे मित्रांनो.
देशाचा भविष्यकाल उज्वल करायचा असेल तर, बालमजुरीचा हा विषवृक्ष वेळीच तोडला पाहिजे.
निवेदीकेचा आवाज ऐकला आणि माझी नजर परसात बोडखी होऊन पडलेल्या त्या फांदीवर गेली.
चिमुकल्याचे शब्द आठवले, देवाच्या पान्याआदी बयतन जमा करायचंय.

- शैला सावंत, भुसावळ, shailasawant060@gmail.com
बातम्या आणखी आहेत...