आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रामीण भागांमध्ये मुलींना मैदानी खेळ खेळायला फारसं उत्तेजन नसण्याच्या काळात, गावात होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत संघात एक खेळाडू कमी पडतो म्हणून कोचनी केलेली युक्ती म्हटलं तर संघाच्या अंगलट येते, म्हटलं तर एका व्यक्तीच्या आयुष्यात आनंदाचे क्षणही आणते, याचं वर्णन करणारी काही वर्षांपूर्वी घडलेली ही सत्यकथा.

राजेश आज वेगळ्याच मूडमध्ये घरी परतला. घरासमोरच्या लिंबाच्या झाडाला खेटून बसला. बीडहून लवकर आलेला. हातात दोन दिवसांपूर्वीचं सायंदैनिक होतं. थोडंफार वाचून झाल्यावर त्याची नजर एका बातमीवर खिळली. चऱ्हाटा येथील संघ जिल्हास्तरीय स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल. बातमी वाचता वाचता राजेश एकदम भूतकाळात शिरला.

चऱ्हाटा हे बीड तालुक्यातलं डोंगरी क्षेत्रातलं गाव, दोन हजार लोकवस्तीचं. या गावाने देशाला अनेक सैनिक तसंच पोलिसही दिलेत. देशाचे सेवा करताना तीन जवान शहीद झालेले. पूर्वीपासून गावात खेळाचं वातावरण. त्यामुळे गावातून तीन क्रीडा अधिकारीही तयार झालेले. दत्ता झोडगेसारखा राष्ट्रीय धावपटूही गावात तयार झालेला. आता हे वेड काहीसं कमी झालंय. मुलांच्या हातात मोबाइल आले नि खेळाचा पार विचका झाला. गावाचा खानदानी खेळ म्हणजे कबड्डी. घराघरात कबड्डीपटू असत. 

काही वर्षांपूर्वी गावात मोठ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. बरेच संघ सहभागी झाले होते. मुलांचे सामने सकाळी, तर मुलींचे दुपारनंतर होत. मुलींना खेळण्यासाठी तयार करणं हीच मोठी कसोटी होती खरं तर आमच्या गावातल्यांसाठी. कसाबसा आमच्या गावातला संघ सामन्यासाठी झाला. पण एक खेळाडू कमी पडत होती. अनेक मुलींना विचारून झालं होतं, पण कोणीच तयार होईना. खेळाचं नियोजन अंकुश उबाळे करत, त्यांना सर्व काका म्हणत. कबड्डीची तयारी घेण्यापासून संघ निवडेपर्यंत सर्व नियोजन ते करत. एक जण कमी पडतेय म्हटल्यावर काकांनी कॅप्टनला सांगितलं की, राजेश तुमच्यात खेळणार. राजेश त्यांच्याच वर्गातला मुलगा होता. तो आपल्यात खेळणार म्हटल्यावर मुलींनी नाकं मुरडायला सुरुवात केली. पण काकांची आॅर्डर मोडणं कुणालाच शक्य नव्हतं. आता बघा, तुम्ही म्हणाल की मुलगा मुलींत कसा काय खेळणार? लोकांना तो ओळखू येणार नाही का? पण हा राजेश काही साधासुधा नव्हता. जर त्याने पाेरीचा ड्रेस घातला असता तर कोणीच म्हणू शकलं नसतं की हा मुलगा आहे म्हणून. कारण त्याला मुलींप्रमाणे लांब लांब केस होते. तो त्यांच्या वेण्या घालून लाल रिबिनीही लावायचा. 

तो एक पोतराज होता. 
काकांनी त्याला सांगितलं, “राजेश, पँट काढ.”
पण त्याने काहीच हालचाल केली नाही.
काका जाम चिडले. परत म्हणाले, “अरे पँट काढ आणि मुलींमध्ये उभा राहा.”
तिकडून संघाला पुकारणं चालूच होतं. दुसरा संघ समोर उभं राहून बराच वेळ झाला होता. 
काका राजेशची पँट ओढण्यासाठी पुढे सरसावले. तेवढ्यात ताे म्हणाला, “काका, काढू नका पँट, आतून चड्डी नाही घातलेली.”
ते ऐकून मुली मात्र मुरख्यामुरख्या हसू लागल्या.

काकांनी त्याला कबड्डीचा टीशर्ट आणि हाफ चड्डी घालायला दिली आणि कॅप्टनच्या मागे उभं केलं. त्याला सांगितलं, नाव संगीता सांगायचं म्हणून.
संघ मैदानात उतरला. राजेशने इकडेतिकडे पाह्यलं तर सगळीकडे माणसंच माणसं दिसत होती. मैदान खचाखच भरलं होतं. गावतली माणसं, पोरंपोरी सगळे जमले होते. स्टेजवर पुकारणारा माणूस बोलत होता. साऱ्यांच्या नजरा खेळाडूंवर आणि हात टाळ्या वाजवण्यात दंग. टाळ्यांच्या कडकडाटात दोन्ही संघांचं स्वागत झालं. कुणालाही कल्पना नव्हती की, मुलींमध्ये एक मुलगा खेळतोय. त्यानं कितीही लपवलं तर गावातल्या पोरांपासून काय लपतोय ताे? प्रत्येकाच्या मुखी एकच वाक्य, “आरे, आपला राजेश आहे हा!” जसजसा टाळ्यांचा आवाज वाढत होता, तसतसे राजेशच्या हृदयाचे ठोकेही वाढत होते. 

दोन्ही संघ अामोरासमोर आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ओळखपरेड सुरू झाली. राजेश मनात संगीता संगीता असं पुन्हापुन्हा म्हणू लागला. प्रमुख पाहुणे त्याच्यासमोर आले तेव्हा तो खूप गोंधळला. चाचरत म्हणाला, “सं.. रा.. संगीता.” पाहुण्यांचं अशा वेळी लक्ष असतं कुठे, ते तसेच पुढे गेले. यामुळे तो जास्तच चुळबुळू लागला. लांडग्यांच्या सभेत एखादी शेळी जावी, तसं त्याला वाटलं.  नाणेफेक जिंकून एंट्री सुरू झाली. राजेश कॅप्टनच्या हाताखाली कोपरा खेळू लागला. त्याची मन:स्थिती बिघडलेली स्पष्ट दिसत होती.  “हे ये हे ये राजेश राजेश..”
कडकड टाळ्यांचाआवाज येऊ लागला. साऱ्या लोकांचं खेळावरचं लक्ष राजेशवर केंद्रित झालं. बघता बघता आमचा संघ पूर्ण बाद झाला. दुसऱ्या वेळी सगळे खेळाडू मैदानात आले. याही वेळी सगळ्या जणी फटाफट बाद होऊ लागल्या. राजेश आणि कॅप्टन दोघंच राहिले. कॅप्टनने राजेशला एंट्रीसाठी पाठवलं. राजेश जीव मुठीत धरून एंट्रीसाठी गेला. तो पार बिथरलेला दिसत होता. पोरं मोठमोठ्यानं ओरडत होती, “राजेश.. राजेश..”
घाबरलेला राजेश थर्डच्या सपाट्यात सापडला आणि पार लांब मैदानाबाहेर फेकून देण्यात अाला.

प्रेक्षकांतल्या मुलांचं ओरडणं एेकून समोरच्या संघाने त्यांच्या कोचला सांगितलं की, “चऱ्हाट्याच्या संघातनं एक मुलगा खेळतोय.” हे काकांना समजताच त्यांनी राजेशला पळून जायला सांगितलं. राजेश पळून गेला. बदली खेळाडू घेऊन पुन्हा सामना सुरू करण्यात आला. अर्थात आमचा संघ तो सामना हरला होता. राजेशला कोणी न ओळखल्याचं साऱ्यांनाच नवल वाटलं होतं. 

मुख्य बक्षीस समारंभ झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी राजेशचं नाव पुकारलं, बक्षीस घेण्यासाठी. पण तो लांब लपून बसला होता. त्याला वाटलं होतं, लोक खवळतील, मारतील. त्यामुळे तो येत नव्हता. पण रज्जाक शेखने त्याला हात धरून स्टेजवर आणलं. मुलीच्या भूमिकेच्या नाटकाबद्दल त्याचा सत्कार करून दहा रुपये बक्षीस दिलं. बक्षीस घेतलं तसा राजेश चिंगाट घरी पळाला.

गावात अनेक दिवस त्याच्या या पराक्रमाची गोष्ट चर्चिली जात होती. शाळेत राजेश गेला की, पोरी म्हणायच्या, “त्यो त्यो राजेश, पोतराज राजेश, पोरीत खेळल्याला.” आणि हसायच्या.
शालेय जीवनात घडलेला हा प्रसंग पेपरातल्या बातमीमुळे आठवून राजेशचा मूड एकदम फ्रेश झाला. आईने हाक मारताच तो भानावर येऊन घरात गेला.
 
- श्रीकृष्ण उबाळे, चऱ्हाटा, बीड 
बातम्या आणखी आहेत...