आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काशी ( एक परिक्रमा )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘पाेरांनाे, मला कळतं रं की तुम्हाले साळंत घालावं. पण कसं? त्याला कापडं लागतेत. पुस्तक, दफ्तर, 
माेप पैका लागताे. मी कुठून अाणू?’ पाेरांच्या शिक्षणासाठी अाईचा जीव कासावीस हाेताेय हे काशीला उमगलं तसं ती बाेलली, ‘माय तू रडू नगं. अागं गावाकडं मी शाळेत गेलेच की, काय बी नसतं तिथं, तू नगाे रडू. तवा शाळेत जायची तर तू नव्हतीस, अाता मला तू पाहिजे तर शाळा न्हाई अासं कसं. शाळेत तसं काय बी नसतं,’ असं समजावत काशीनं अाईचे डाेळे पुसले.

शाळेची घंटा वाजली अन् पहिलीच्या वर्गातल्या काशीने धावतच घराकडे अश्शी काही धूम ठाेकली जणू तिच्या पायाला पंख फुटले. कितीतरी दिवसांनी अाज तिला अाई भेटणार हाेती. दारातच दफ्तर फेकत काशीनं ‘माऽय’ अशी हाक दिली. ताेच रंगानं काळीसावळी, उंच-सडपातळ बांध्याची, कपाळावर जाडं-भरडं काेरलेलं कुंकू अन् उसाच्या पाचटानं झालेल्या जखमा अंगभर लेवून रखमा पुढ्यात अाली. 

भेटीसाठी व्याकूळ मायलेकींची नजरानजर झाली तसं अत्यानंदानं दाेघींचा दाटून अालेला ऊर डाेळ्यावाटे पुरासारखा अाेसंडला. स्वत:ला सावरत रखमा म्हणाली, ‘काशी, अाता तुुला कधीच दूर साेडणार नाही हाे बयाे. मी साेबतच नेणार तुला उसाच्या फडावर लहानग्याला सांभाळायला. तू थाेरली बहीण हाय नं.’
काशीला जणू अाभाळ मुठीत अाल्यासारखं झालं. लहानपणापासून अाईपासून दूर राहिलेली पाेर. अधेमधे कधी सणावाराला रखमा तिला भेटायला यायची. जेव्हा ती परत जायला निघायची तेव्हा काशी हंबरडा फाेडायची. ‘नकाे जाऊ नंऽ माय.’ रखमाचं काळीज भरून यायचं. गुदमरलेला जीव घेऊन ‘पाेरी लवकर येईन हा,’ म्हणत डबडबलेले डाेळे पदरानं पुसत पुसत रखमाची पावलं ऊसताेडीसाठी झपाझपा पुढे पडायची. पण अाजचा दिवस तिच्यासाठी खूपच स्पेशल हाेता. काशी खूपच खूष हाेती. ती मायसाेबत जाणार हाेती उसाच्या फडावर. अाज पारावर खेळायला गेली तेव्हा सगळ्यांना एकच सांगत हाेती, ‘मी मायसाेबत जाणार. मी गावाला जाणार.’ सारं गाव-शिवार तिच्या अानंदानं सुखावलं.

अाजची पहाट काशीसाठी राेजच्यासारखी नव्हती. अाज उत्साहाचा बहर सळसळत हाेता. शाळेची घंटा वाजली अन काल जशी घराकडे पळाली त्यापेक्षा कितीतरी जास्त वेगाने ती शाळेकडे धावत निघाली. धापा टाकतच तिनं अावाज दिला, ‘मॅऽडम अाज मी शाळेला येणार नाही.’ काहीशा प्रश्नार्थक चेहऱ्यानं मॅडमनं विचारलं, ‘का गं काशी, काय झालं?’ ती अावेगातच म्हणाली, ‘मी मायसाेबतच राहणार सगळ्या मुलींसारखं. मी, माय, बाबा अान लहानगा.’ तिची बडबड सुरूच हाेती. ‘माय म्हणते मी माेठी ताई, लहानग्याला सांभाळलं पाहिजे नं?’ मॅडम काही न बाेलता तिच्या डाेक्यावर हात ठेवत हाेकारार्थी मान हलवून पुढे गेल्या अन् कसल्यातरी विचारात पुटपुटल्या, या निरागस जिवाला काय कळणार; अन त्या अशिक्षित रखमानंं पाेटासाठी पडेल ते काम करायचं अन् मिळेल ते खायचं. त्यात अाणखी एक ताेंड खायला वाढणार. पाेरीचं शिक्षण? या विचाराच्या तंद्रीत त्या वर्गाकडे चालू लागल्या.

दिवसांमागून दिवस लाेटत गेले तशी काशी अाता चार भावंडाची माेठी बहीण झाली. तिच्या अाईचा अाधारही. मात्र शाळा पूर्णच बंद झाली. मधेच कधी तरी तिला शाळेची अाठवण यायची. एक दिवस मनाला अावर घालत ती रखमाला म्हणाली, ‘अाई, मी शाळेत जाऊ का? बन्सी, रामा अान् शाली, नंदी माेठी झालीत नं अाता. इथंच अाहे वस्तीवर शाळा. गावाकडच्या शाळेसारखं जाऊ का मी? हे एेकून रखमाच्या काळजात चर्रऽ झालं. ती खेकसलीच, ‘व्हय, शाळंत जायचं. मंग कामं कुणी करायची गं? पाेरं कुणी बघायची‌? दिस उगवता मी अन् तुझा बाप कामाला जाताे. तवा रातच्याला भाकर भेटतीया.’ काशी गप्पगार झाली. 

रखमाची वटवट सुरूच हाेती. ‘दाेघं कमावणार अान् चार जण खाणार. गावाला म्हणता म्हातारीचंबी बगा अान् वर अाली हिची शाळा. बाई शाळंनं काय पाेट भरतं व्हय? भाकरच खाया लागती नंं. मलाबी वाटत व्हतंं की, शिकावं, लई माेठ्ठं व्हावं. पण न्हाय, नशीबच न्हाय. माझं अान् अाता तुझंबी.’ अाईचा उद्वेग चुकीचा नव्हता हे काशीला पटलं. तिची घुसमट एेकता एेकता काशी मुसमुसून रडायला लागली तसं रखमानं तिला उराशी कवटाळलं. टच्च भरलेल्या पापण्यांनी चारी लेकरं जवळ घेत ती म्हणाली, ‘पाेरी, नाव नकाे काढू शाळेचं. हिथं बाबा समाेर न्हाई, न्हाई तर लगीन लावलं असतं तुझं. जसं माजं झालं. उसाच्या फडावर जगायचं अान् मरायचं.’ काशी चिडीचूप बसली. पण रखमाच्या बालपणीच्या जखमेवरील खपल्या उसवल्या. डाेळे पुसतच ती खाेली बाहेर पडली. 

बाबा, माय शेतावर गेले की, कधी-कधी काशी सारं काम उरकून भावंडासह वस्तीवरच्या शाळेत जायची, वर्गात बसायची, खिचडी-वरणभात खायची, खेळायची. तिच्या मैत्रिणीही जमल्या अन् शाळा सुटली की, भावंडांसह घरी म्हणजे झाेपड्यात परत यायची. हळूहळू हे राेजचंच झालं. रखमाच्याही लक्षात अालं; पण ती बाेलली काहीच नाही. 

एक दिवस रखमा कामावरून अाली तशी पाटीतल्या भाकऱ्या बघितल्या अन् कडाडली, ‘काशी, अागं पाेरांनी भाकरी खाल्ली न्हाय न्हवं अाज?’ तशी काशी चपापली, काय सांगू. शाळेत वरणभात खाल्ला.’ कानाखाली झापड बसली तरी पण चाचरत काशी म्हणाली, ‘काय तरीच काय माय मी बरं उपाशी ठेवंल.’ तेवढ्यात नंदी म्हणाली, ‘अाम्ही शाळेतली खिचडी खाल्ली. मस्त व्हती नं रे रामा, शाली बाेल की, अापण खाल्ली म्हणून.’ एव्हाना काशी घामाघूम झाली अापण अाईचं एेकलं नाही म्हणून. पण रखमानं काशीला पाेेटाशी धरलं अन् घळाघळा रडायला लागली. ‘पाेरांनाे, मला कळतं रं की तुम्हाले शाळंत घालावं पण कसं त्याला कापड लागतेत. पुस्तक, दफ्तर, माेप पैका लागताे. मी कुठून अाणू,’ रखमाच्या डाेळ्यातलं पाणी खंडत नव्हतं. पाेरांच्या शिक्षणासाठी अाईचा जीव कासावीस हाेताेय हे काशीला उमगलं तसं ती बाेलली, ‘माय तू रडू नगं. अागं गावाकडं मी शाळेत गेलेच की, काय बी नसतं तिथं, तू नगाे रडू. तवा शाळेत जायची तर तू नव्हतीस अाता मला तू पाहिजे तर शाळा न्हाई अासं कसं. शाळेत तसं काय बी नसतं,’ असं समजावत काशीनं अाईचे डाेळे पुसले.

दिवस उजाडला, घरकाम अावरून काशी भावंडांसह शाळेत गेली पण अाता ती निर्धास्त हाेती. नकळत तिनं शाळेत जाण्यासाठी परवानगी घेतली हाेती. पाेरांची तक्रारही नव्हती. शिकायचे, खेळायचे, पाेरांसाेबत जेवायचे हा दिनक्रम ठरून गेला. इकडे रखमाही सुखावली. पण सुखाला गालबाेट लागलं.
पावसाळा सुरू झाला तसं रानात गवत माजलं हाेतं. बाबा गावाकडं गेलेला. एक दिवस रखमा पहाटेस उठली अन अावरासावर करून काशीला उठवलं. म्हणाली, ‘पाेरी मी रानात जातीय्. गवत लई माजलंय बघ. तू च्या घे, घरचं अावर मंग शाळंला जा हाे. मी दुपाराेक येईल.’ चहाचा फुरका अाेढत रखमा बाहेर पडली तशी काशी पाठमाेऱ्या रखमाकडे बराच वेळ बघत राहिली. 

कितीतरी वेळापासून रखमा कामात गुंतली हाेती. दिवस केव्हा वर अाला ते तिला कळलंदेखील नाही. साेबतच्या बायांनीच अावाज दिला, ‘ए रखमा, चल बाई लवकर भाकर खायला. पुरे की अाता.’ रखमानंही हाेकाराची अाराेळी दिली अन् हातपाय धुण्यासाठी शेतातली माेटार सुरू केली. जसा पंप सुरू झाला तशी रानभर किंकाळी पसरली. शिवार चिडीचूप झालं. माेटारीच्या दिशेनं सगळ्यांची धावाधाव सुरू झाली. हिरवीगार-काळीभाेर रखमा पंपाजवळच निपचीत पडली हाेती. अायाबायांचा एकच गलका सुरू झाला, ‘बयाे, उठं नं? बयाे, उठं नं.’ पाेरं वेड्यासारखं पाहत राहिली. काय झालंं त्याचा अदमास त्यांना नव्हता. मात्र काशीचं काळीज हादरलं. जमीन धरल्यागत ती मटकन खाली बसली. ‘माऽऽय’ म्हणत तिनं हंबरडा फाेडला, असं वाटलं जणू सारं शिवार थरारलं. जिच्या प्रेमासाठी क्षण क्षण उधळला, बालपण विस्कटलं, ती माय तिच्यासमाेर निपचित पडली हाेती. दिवस पुढे रेटत गेले अन् काशीच रखमाची माय झाली. घर, भावंडं, रान सारं सांभाळायला लागली. पडल्या जागी रखमा डाेळ्यावाटे पाणी गाळत राहायची. कधी काैतुकाचे तर कधी अांतरिक वेदनेचे. 

पाेरीनं शाळा साेडली हे रखमानं बाबाला सांगितलं अन् एक दिवस अचानक बाबा म्हणाला, ‘पाेरांनाे, उद्या अापण सारे गावाकडं जाऊ. तिथंच ऱ्हाऊ. म्हणजे अाता रखमाला रानात काम हाेणार न्हाय तवा म्हातारीला तिची साेबत व्हईल, व्हय नव्हं?’ हे एेकून पाेरं हुर्याे करत नाचतच सुटली.
सकाळचे ९:३० वाजले. शाळेची प्रार्थनेची घंटा वाजली. अन टपाेरे डाेळे, कुरळे केस, गुटगुटीत बांधा, हसरा चेहरा असलेली काशी शाळेत अाली. अाजीसाेबत. मॅडम भारावल्या. पाेरं पुन्हा प्रवाहात अाल्याचा अानंद त्यांच्या डाेेळ्यांतून अाेेसंडत हाेता. पण अाता काशीत ताे निरागस, बालीशपणा, भाेळेपणा नव्हता. ती अाता मॅडमलाच शिकवू-समजावू लागली. या माेकळ्या जगानं तिला खूप काही शिकवलं हाेतं. जे या शाळेच्या पुस्तकात कुठे नव्हतंच! तरीही नव्या जाेमानं, जिद्दीनं सारं सारं सांभाळत शिक्षणाच्या प्रवाहात ती भावंडांसह अाली अाणि पुन्हा शाळेत रमली.

- सुमिता पाठक, सेलू, परभणी
बातम्या आणखी आहेत...