आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅडीची गोष्‍ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
“पॅडी, तुझ्या हातून न सांगण्याचा गुन्हा घडलाय पण तो चांगल्या गोष्टीसाठी म्हणून तुला माफ करते. काय? आता रविवारी तू बबनला वाढदिवसाला बोलवायचं बरं का. मला पाहायचाय हा तुझा मित्र कोणेय तो!” आईचं हे बोलणं ऐकून तो तिच्या कुशीत शिरला आणि म्हणाला, “थँक यू, मम्मी.”

शाळा सुटताच पॅडी वर्गातल्या बबनला सोबत घेऊनच बाहेर आला. सारी मुलं जाताच तो त्याला म्हणाला, “बबन, चल बरं दुकानात.”
“दुकानात? कशाला?” बबननं गोंधळून विचारलं. 
“आता माझा वाढदिवस आहे ना रविवारी. मला गणवेष घ्यायचाय तुला त्या निमित्तानं.” पॅडी त्याच्याकडं पाहत हसतच म्हणाला. पण बबन मात्र अधिकच गोंधळला. घाबरून त्यानं विचारलं, “इतके पैसे आहेत का तुझ्याकडं? तीनचारशे तरी लागतील नक्कीच.”

“हे बघ ना साडेतीनशे आहेत,” त्याला पैसे दाखवत पॅडी बोलला. ते पैसे बघून बबनचे डोळेच विस्फारले. क्षणभर काय बोलावं तेच त्याला समजलं नाही. पण थोडं थांबून तो म्हणाला, “पण पॅडी, तू घरी सांगितलंस ना हे. नाहीतर तुझ्या घरचे मग...”

त्याला मधेच थांबवत पॅडी म्हणाला, “बेट्या, तू कशाला फिकीर करतोयस उगीच. हे माझे खाऊचे पैसे आहेत आणि माझी मम्मीही काही म्हणणार नाही. नक्कीच.”
पॅडीचा आत्मविश्वास बघून बबन सुखावला आणि त्याची भीती नाहीशी झाली. एवढ्यात पॅडी म्हणाला, “सायकल राहू दे शाळेतच. पुन्हा नेता येईल गणवेष आणल्यावर. काय?”
बबननं फक्त मान हलवली आणि दोघं शाळेसमोरच्या क्लाॅथ सेंटरकडं निघाले.

* *****
पॅडी आणि बबन शाळामित्र. या वर्षी मानेसरांनी त्या दोघांना एका डेस्कवर बसवल्यापासून दोघांचं अधिकच जमत होतं. बबनला वडील नव्हते, त्याची आई गावातल्या एका चौकात भाजीपाला विकून घर चालवत असे. आणि शाळा सुटल्यानंतर दुपारी स्वतः बबनही दुकानावर बसत असे. त्याला कसलीही ट्यूशन नव्हती पण तरीही तो वर्गातील एक हुशार विद्यार्थी होता. सारे शिक्षक त्याचं कौतुक करत असत. या गोष्टीचं पॅडीला खूपच आश्चर्य वाटत असे. आपल्याला तीन विषयाच्या ट्यूशन असूनही तो नेहमी आपल्यापुढं असतो, यामुळं तो बबनला खूप मानत असे. शिवाय बबनची त्याला नेहमी मदतही होत असे. अवघड गणितं तो पॅडीला समजावून सांगत असे. शिवाय इतर गृहपाठ वगैरेही सांगत असे. काल माने सरांनी रंजल्यागंजल्यांना, गरिबांना आपण मदत करावी, असं सांगितल्यापासून पॅडीच्या मनात वाढदिवसाची भेट म्हणून त्याला गणवेष घेऊन द्यायची इच्छा निर्माण झाली होती. त्यासाठी त्यानं आज खाऊचे जमा झालेले पैसेही आणले होते.

** ** 
दोघं अवघ्या पाच मिनिटातच एका क्लाॅथ सेंटरसमोर आले. दुकानाबाहेर शालेय गणवेष टांगलेले दिसताच आकर्षित होऊन पाहतच राहिले. एवढ्यात काउंटरवरच्या जाडेल्या दुकानदारानं विचारलं, “काय रे पोरांनो, काय पायजे बोला.”
“गणवेष घ्यायचा आहे,” पॅडी म्हणाला. 

“आत या मग,” तो दुकानदार बोलला. दोघंही काऊंटरला आले. तो माणूस बोलला, 
“कोणाला पायजे? तुला का याला?”
“या माझ्या मित्राला, बबनला,” पॅडी म्हणाला. तो दुकानदार आतमधे गेला व गणवेषांचं बंडल घेऊन आला. त्यानं बबनकडं पाहून एक गणवेष काढला. बबनकडं देत म्हणाला, “बघ बरं हा येतो का?”

बबननं लगेच सदरा व विजार घातली. गणवेष छान आल्याचं बघून पॅडी म्हणाला, “आला ना मस्त.”
बबननं फक्त खूश होऊन मान हलवली. त्यानं लगेच गणवेष काढला. एवढ्यात पॅडीनं विचारलं, “केवढ्याचा आहे हा?”
“तीनशेवीसचा. चल तीनशे दे,” गणवेषाची घडी घालत दुकानदार म्हणाला. पॅडीनं पटकन खिशातून तीनशे रुपये काढून दिले आणि गणवेषाची थैली घेऊन ते दुकानाबाहेर पडले. ते लगबगीनं शाळेत आले. पॅडी शिक्षक कक्षाकडं जात असलेला बघून बबननं विचारलं, “सरांकडं जायचं का?”
“हो. माने सरांच्या हस्ते देऊत.”

बबन गप्प झाला. ते दोघंही कक्षाजवळ आले व आत बघू लागले. आतमध्ये बरीचशी शिक्षक मंडळी गप्पा मारत होती. एवढ्यात माने सरांनीच या दोघांना पाहिलं व ते बाहेर आले. त्यांनी विचारलं, “का रे आलात परत पुन्हा?”
“सर, हा गणवेष घेतलाय मी बबनला माझ्या वाढदिवसाची भेट म्हणून. काल तुम्हीच म्हणालात ना, आपण रंजल्यागांजल्यांना मदत करायची म्हणून. मग बबन तर माझा मित्र आहे. सर, मी चांगलं केलं ना?” पॅडीनं विचारलं. सर अगदी चकितच झाले व त्यांनी पॅडीची पाठ थोपटली. मग म्हणाले, “पॅडी, बेटा अभिमान वाटतो मला तुझा. शाब्बास.”

सरांचं बोलणं ऐकून पॅडीला मूठभर मांस वाढल्याचं जाणवलं. तो म्हणाला, “सर, बबनला गणवेष तुमच्या हातानं द्या.” माने सरांनी त्याच्या हातामधून गणवेष घेतला. बबनच्या हातात दिला. मग सर म्हणाले, “बबन, धर.” बबननं गणवेष घेताच सरांनी दोघांचीही पाठ थोपटली. मग त्या आनंदातच ते दोघंही शाळेबाहेर पडले. चौकापर्यंत चालत आल्यावर पॅडी बबनचा निरोप घेऊन सायकलवर बसला आणि घरी निघाला. 
तो घरी आला तेव्हा मम्मी काही त्याला दिसली नाही. मग त्याला उशिराबद्दल चौकशी होणार नाही म्हणून छानच वाटलं. त्यानं त्या खुषीतच हातपाय धुतले. आणि आजीनं वाढताच तो जेवला. तो स्वतःवर इतका खूश होता की, आजीला मम्मी कुठं गेली आहे हेदेखील त्यानं विचारलं नाही. ट्यूशनला थोडा वेळ आहे म्हणून तो काॅटवर लोळण्यासाठी आडवा झाला. मग अचानकच त्याच्या मनात विचार आला, आपण मम्मीला हे सांगितलं नाही. तिची परवानगीही घेतली नाही. आपण हे करायला नको होतं. तिला सांगितलं असतं तर ती नको म्हणाली नसती. हा विचार मनात येताच पॅडीला कसंसंच झालं. आणि त्याच्या मनाला हुरहूर लागली.

* *** ** ***
दुसऱ्या दिवशी मानेसरांनी पॅडीनं एका गरीब विद्यार्थ्याला नवा गणवेष घेऊन दिल्याचं वर्गात सांगितलं तेव्हा मुलांनी टाळ्यांच्या कडकडाटातच त्याचं अभिनंदन केलं. सरांनी मग त्याला स्वतःचा पेन बक्षिस दिला तेव्हा मुलांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या. आणि सारी मुलं त्याच्याकडं अभिमानानं पाहू लागली. 

** **
पण पॅडीनं घरी मम्मीला काही सांगितलं नव्हतं. आणि म्हणूनच तो मम्मीपासून काहीसा दूर दूरच राहत होता. आधीसारखी त्याची घरातील बडबड बंद झाली होती. एक-दोन वेळेस मम्मीनं त्याला तसं विचारलंही होतं. पण त्यानं काही सांगितलं नव्हतं. तो घरात सतत अभ्यासात मग्न असल्याचं दर्शवत होता. पण त्याच्या जिवाला लागलेली हुरहूर काही कमी होत नव्हती. आपल्या हातून गुन्हा घडला असल्याचं त्याला वाटत होतं. म्हणून त्याची मम्मीला सांगण्याची हिम्मत होत नव्हती.

** ****
आज शाळा लवकरच सुटली. बबन आणि पॅडी नेहमीसारखं एकत्रच वर्गाबाहेर आले. सारी मुलं जाईपर्यंत ते मैदानावर रेंगाळले. दोघांनी मिळूनच डब्बा खाल्ला. पाणी प्यायलं. मग ते निवांत मनानं व्हरांड्यात शांत बसून राहिले. शेवटी बबननं विचारलं, “पॅडी, घरी मम्मीला सांगितलं नाहीस ना तू?”
“तुला कसं कळलं?” पॅडीनं विचारलं. 
“गेल्या तीनचार दिवसांपासून बोलत नाहीस तू नीट. तुझं लक्षच नाही कशात. मी लगेच ओळखलं,” बबन म्हणाला.
“मम्मीची भीती वाटतेय रे. तिला न विचारता मी हे केलं ना. ती काय म्हणेल सांगितल्यावर, असं वाटतंय,” रडवेलं होऊन पॅडी म्हणाला.

“हो ना, चुकलंच तुझं बघ खरं.”
यावर पॅडी काहीच बोलला नाही. गप्प राहिला. नुसतं खाली मान घालून बसून राहिला. थोड्या वेळानं निश्चयी स्वरात बबनला म्हणाला, “पण आता घरी गेल्यावर सांगणार. हो. नक्कीच.”
“हो ना. सांगून टाक सारं. तुझी मम्मी काही बोलणार नाही,” बबननं धीर दिला. लगेच पॅडी म्हणाला, “निघू या आता घरी.”
तो लगबगीनं उठताच बबनही उठला. सायकल घेऊन दोघं चौकापर्यंत पायीच आले. तेथून बबन त्याच्या वाटेनं गेला आणि पॅडी सायकलवर निघाला. 

दहा-पंधरा मिनिटांत तो घरी आला. सायकल लावून घरात आला तर त्याला मम्मी हाॅलमधेच पेपर वाचत असलेली दिसली. त्यानं स्कूलबॅग सोफ्यावरच टाकली व मम्मी म्हणून हाक मारली. मम्मीनं चकित होऊनच त्याच्याकडं पाहिलं. तो एखाद्या अपराध्यासारखा तिच्यासमोर उभा राहिला व अचानक त्याचा बांध फुटला. तो अस्फुटसं स्फुंदत रडू लागला व काहीतरी अस्पष्टसं पुटपुटत राहिला. मम्मी तर गडबडूनच गेली. तिनं त्याला जवळ घेतलं आणि थोपटत राहिली. जराशानं तो शांत झाल्यावर मम्मी म्हणाली, “पॅडी, काय झालं सांग बरं.”
तो धीर एकवटून म्हणाला, “माझ्या हातून एक गुन्हा घडलाय मम्मी. मी...”
“नीट सांग ना काय झालं ते.”

“मम्मी, मी किनई तुला न सांगता...” आणि पॅडीनं सारं काही सांगून टाकलं व तो शांत झाला. आता मम्मी काय म्हणते ते ऐकण्यासाठी त्याचे कान आतूर झाले होते. त्याच्या मम्मीनं आनंदानं त्याची पप्पी घेतली व म्हणाली, “पॅडी, तुझ्या हातून न सांगण्याचा गुन्हा घडलाय पण तो चांगल्या गोष्टीसाठी म्हणून तुला माफ करते. काय? आता रविवारी तू बबनला वाढदिवसाला बोलवायचं बरं का. मला पाहायचाय हा तुझा मित्र कोणेय तो!” तिचं हे बोलणं ऐकून तो तिच्या कुशीत शिरला आणि म्हणाला, “थँक यू, मम्मी.”
 
- उमेश मोहिते, माजलगाव, बीड, uthatkar94@gmail.com
बातम्या आणखी आहेत...