आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमविवाह : काळाची गरज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्ली आपण ऐकतो की, अनेक जण प्रेमविवाह करतात. लव्ह मॅरेज आता कॉमन झालंय. पण आजही खूप पालक प्रेमविवाह मान्य करत नाहीत. प्रेमविवाहामध्ये धोका जास्त असतो, ते टिकत नाहीत, नवराबायकोचं लवकर पटेनासं होतं, वगैरे बरंच काही ऐकतो. पण खरंच असं होतं का? लग्न करण्यासाठी फक्त एक मुलगा आणि मुलगीच पाहिजे ना, मग काय प्राॅब्लेम आहे हेच कळेनासं झालंय. दुसऱ्या जातीचा असेल तर तो किवा ती, तर तुच्छ का मानलं जातात?

आजच्या काळात आपण पालक म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतोच. पण मुलांना त्यांच्या पसंतीने लग्न करायचं असेल तर ही जबाबदारी घ्यायची तयारी नसते. सगळीच मुलं आपल्या पालकांना आपल्या प्रेमाबद्दल सांगतात असं नाही कारण त्यांना विश्वास आहे तुम्ही नाहीच म्हणणार. म्हणून भीतीने ती पळून जाऊन लग्न करतात आणि दोन्ही घरांची बदनामी होते. आपल्याला असं वाटत असेल की, आपल्या मुलांनी असं पाऊल उचलू नये तर आपण त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. लग्न कधीच जबरदस्तीने करू नये, यामध्ये आपण दुसऱ्यांच्या आयुष्याशी खेळतो हे समजायला पाहिजे. प्रत्येक वेळेस आपणच बरोबर असतो, ही भावना सोडली तरच आपण बदलू शकतो.

सैराट हा चित्रपट बघून मुलांना ऊतच आलं होतं, पळून जाऊन लग्न करायचं. जेव्हा एक मुलगा एका मुलीवर प्रेम करतो तेव्हा तो सैराटचा परश्या असतो आणि त्याच मुलाची बहीण जेव्हा प्रेम करते तेव्हा तोच परश्या आपल्याला प्रिन्स झालेला दिसतो. जेव्हा परश्या प्रेम करतो तेव्हा काही वाटत नाही का? अजूनही मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक देत नाहीत. प्रेमविवाह केल्याने आपल्या समाजातील आपलं खानदान, मान, सन्मान मातीत मिळून जाईल, अशी भीती पालकांना असते. दुसऱ्यांना काय वाटतं त्यापेक्षा आपल्या मुलांना काय वाटतं हे बघा. आणि फक्त आपल्या नावामुळे त्यांचा गळा कापू नका. जगा आणि जगू द्या, मगच आपण काळासोबत बदल करतोय असं समजा. मला पालकांना विचारावंसं वाटतं, तुम्हाला तुमच्या मुलांसाठी किवा मुलीसाठी अशी सून किवा जावई चालेल का की, त्यांचं आधीपासूनच प्रेम होतं आणि लग्न फक्त घरच्यांच्या जबरदस्तीने झालंय? तुम्ही सहन करू शकता का? नाही ना, मग तुम्हाला माहीत असून तुम्ही त्यांना का मजबूर करता? सत्य पचवा, कारण आपली एक चूक त्यांचं संपूर्ण आयुष्य बरबाद करून टाकते आणि अशी नाती टिकणंही तितकंच अवघड असतं. तुम्ही कुणाला फसवू नका आणि फसूही नका. जेव्हा मुलीचं प्रेम असूनही तिचं लग्न लावून देतात दुसऱ्या मुलाशी, तेव्हा ती मुलगी बायको ह्या नात्याने सगळी कर्तव्यं पार पाडत असते पण तिच्यासाठी ते एक समाजमान्य ‘बलात्कार’ असतो हे फक्त तिलाच माहीत असतं. आपण मुलीचं किवा मुलांचं सगळं ऐकून त्यांच्या मनासारखं करावं, असं नाहीये फक्त त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. आजची मुलं आपल्या खूप पुढं निघून गेली आहेत, हे जाणून घ्या. त्यांच्याशी मैत्री करा. आपल्या नात्याला नवा आकार द्या पण अगदीच त्यांच्या मनासारखं न वागून त्यांचा अपमान करू नका. हे प्रेमविवाह आपण सांभाळून घेऊ शकतो पण ते नाही समजू शकत. प्रेम आंधळं असतं म्हणतात हे खोटं नाहीये. 

- श्रीप्रिया पसनूर, सोलापूर
shripad4991@gmail.com
बातम्या आणखी आहेत...