आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघुपटांपासून सुरुवात तर केलीय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारंपरिक शिक्षण पद्धतीऐवजी वेगळ्या पण स्वत:च्या आवडीच्या वाटेवर चालायला सुरुवात करणाऱ्यांची गोष्ट सांगणाऱ्या ‘थ्री इडियट्स’ला सगळ्यांनी डोक्यावर घेतलं. अशीच स्वत:ची वेगळी वाट धुंडाळणाऱ्या वास्तवातल्या एका ‘इडियट’चा अनुभव...

मीबारावीनंतर मित्रांना फॉलो करत इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. प्रथम वर्षाला थोडंफार बरं वाटलं. पण, जसजसे दिवस जात होते, मला माझी चूक कळत होती. आपली आवड कशामध्ये आहे, आपल्याला काय जमतं याचा विचार न करता, मित्रांच्या मागे लागून, मित्रांचं ऐकून इंजीनिअरिंगला प्रवेश घेतला असं वाटू लागलं. जे मित्र स्वतः दोन–तीन वेळा इंजिनिअरिंगच्या प्रत्येक वर्षाला नापास झाले होते, ते म्हणायचे की, इंजिनिअरिंगला खूप स्कोप आहे. आर्ट््स, कॉमर्सच्या भानगडीत पडू नकोस. कॉलेजचे दिवस सुरू होते, पण हळूहळू इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम डोक्यावरून जाऊ लागला, विषय मागे राहू लागले. माझीही दोन वर्षं वाया गेली. पण, यात चूक माझ्या मित्रांची नाही, तर माझी होती. मला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्याच क्षेत्रात मी शिक्षण घेतलं असतं तर कदाचित मी आज खूप पुढे गेलो असतो.

मी इंजिनिअरिंगला तीन वर्षे दिली. पण आपली गाडी काय पुढे जाईना, म्हणून कंटाळून मी माझा कॉलेजमधील प्रवेश रद्द केला. माझी आवड कला क्षेत्रामध्ये आहे. मला दिग्दर्शन व अभिनय क्षेत्राची खूप आवड आहे. पण, ती आवड कशी जोपासायची, त्यासाठी पर्याय काय आहेत, याबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे मी मागे पडलो. तसंच मला या क्षेत्राची आवड आहे, मला यातच माझं करिअर करायचं आहे, असं माझ्या घरच्यांना ठणकावून सांगण्याची मुभा माझ्याकडे नव्हती. कारण, सोलापूरसारख्या शहरात कला क्षेत्राला पुरेसा वाव नाही, जसा पुणे, मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये आहे. घरची परिस्थितीही बेताचीच होती. म्हणून मी पुणं गाठलं आणि नंतर मुंबई. खूप फिरलो. प्रत्येक फिल्मसिटी, स्टुडिओ आणि नाट्यमंदिरे. घरून आणलेले पैसे पुरणार नाहीत म्हणून दिवसभर चालत चालतच ही महानगरं मी पालथी घातली, केवळ मला माझी आवड जोपासता यावी म्हणून. पण काही उपयोग झाला नाही. पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये राहायचं तर पैसा पाहिजे. जर काम करून जगावं म्हटलं तर घर पाहिजे. म्हणून, केवळ पदरी निराशा घेऊन मी आपल्या मायभूमीला परत आलो.

इकडे आल्यावरही माझी आवड मला गप्प बसू देत नव्हती. त्यातच एकदा एका पेपरमध्ये वाचलं होतं की, जर दिग्दर्शक व्हायचं असेल तर लघुपटापासून सुरुवात करा. अगदी कमी खर्चात व स्वलिखित कथांवर आधारित लघुपट तयार करता येतात. म्हणून, मी लघुपटांबाबत माहिती गोळा करायला सुरुवात केली, स्वतः कथा लिहिण्याची आवड निर्माण केली. हळूहळू दिग्दर्शन क्षेत्रातील माहिती होत गेली. कॅमेरा कोणता वापरायचा, पटकथा आणि संवाद कसे लिहायचे हे जमू लागले. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. घरच्यांचा विरोध, मित्रांची मस्करी, आर्थिक चणचण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि मनाला जरासुद्धा ध्येयापासून विचलित होऊ दिलं नाही. हे सर्व करत असताना मनाशी एक पक्की गाठ बांधली की, काहीही होऊ दे, या क्षेत्रामध्ये आपण नाव कमवायचंच. पुण्यामुंबईला जाऊन संधी शोधण्यापेक्षा आपल्या गावी सोलापुरातच राहून आपण आपली संधी निर्माण करायची. 

सुरुवातीला मी एकटा होतो, मोबाइल घेऊन शूट करायचो. मग हळूहळू माझ्यासारखी आवड असणारी चार मुलं आली आणि माझे मोठे बंधू देवा चिंचोळीकर यांच्या सहकार्याने मी ‘देव प्रॉडक्शन, सोलापूर’ या ग्रूपची निर्मिती केली. असं करत करत ग्रुप वाढत गेला. आकाश जाधव, कालिदास पोतदार, संतोष माने, ध्रुव गायकवाड, संघपाल काकडे यांसारखे मित्र मला भेटले आणि आज माझ्या टीममध्ये १५ जण आहेत. माझ्या टीमच्या जोरावर मी स्वयंलिखित कथांवर ‘ब्रीफकेस’, ‘गुलाम’ आणि ‘गिप्ट’सारख्या सामाजिक संदेश देणाऱ्या लघुपटांची निर्मिती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत मिशन २०१७वर आधारित असणाऱ्या माझ्या ‘गिप्ट’  या लघुपटास जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव आमच्यावर झाला. सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे राजेंद्र भारुड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
आता मी ठरवलंय, याच क्षेत्रात जगायचं आणि मरायचंसुद्धा याच क्षेत्रामधे. ही तर सुरुवात आहे. अजून दिल्ली खूप दूर आहे. आता माझ्या जीवनाचा फक्त एकच ध्यास आहे, एक यशस्वी दिग्दर्शक व्हायचं आणि ऑस्करसारख्या पुरस्काराला गवसणी घालून आपल्या सोलापूरचं आणि आपल्या भारत देशाचं नाव संपूर्ण जगात गाजवायचं.

- श्रीधर गायकवाड, सोलापूर
gaikwadshridhar09@gmail.com
बातम्या आणखी आहेत...