आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीए, नियती आणि भविष्यविज्ञान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील लेखात नरेंद्र मोदींच्या अंगाने काही चर्चा केली. या निवडणुकीत मीडियामध्ये अत्यंत व्यापक प्रमाणावर भविष्यविज्ञानाच्या एका शाखेची चर्चा झाली, ती म्हणजे निवडणूक भाकीतशास्त्र. ती शाखा भविष्यविज्ञानातील निकालशास्त्राची एक उपशाखा आहे. गेली काही वर्षे निवडणुकांचे अचूक भविष्य सांगण्यामुळे तिला हळूहळू प्रतिष्ठाही प्राप्त झाली आहे.

भविष्यविज्ञानाची अशीच दुसरी शाखा म्हणजे, हवामान भाकीतशास्त्र. भारतामध्ये इसवि सन 2005पर्यंत ही शाखा म्हणजे चेष्टेचा विषय होता. भारतात भविष्यविज्ञानाची जी काही प्रतिष्ठा आहे, ती या दोन शाखांमुळे आहे.

इतर शाखांत भारतात अजून पुरेसे काम झालेले नाही. वास्तविक भारतामध्ये टोळीय समाजापासूनच भविष्याचे निदान करण्याचा छंद भारतीयांना लागला होता. टोळीय समाजात ज्याला आज आपण शकुनशास्त्र म्हणतो, ते विकसित व्हायला सुरुवात झाली. अर्थातच हे शास्त्र अंधश्रद्धेवर आधारित असल्याने, त्याला आज प्रतिष्ठा नाही. परंतु भविष्यविज्ञानाचा पाया भारतात ज्या काही गोष्टींनी घातला, त्यात शकुनशास्त्राचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.

या शकुनशास्त्राचा सर्वाधिक प्रभावी वापर हा जी. ए. कुलकर्णी यांच्या साहित्यात दिसतो. त्यांच्या एका कथासंग्रहाचे नावच ‘सांजशकुन’ असे आहे. विदूषक या त्यांच्या गाजलेल्या कथेत विदूषक हा अनेक शकुनांचा आणि संकेतांचा उलगडा करत सत्य शोधायला लागतो. पण सरतेशेवटी हे सगळे संकेत आणि शकुन त्याला मिसलीड करत आहेत, असे स्पष्ट होते. या कथेत एका अर्थाने जीए शकुनशास्त्रावर हल्लाच करतात. अनेकांचा गैरसमज असा की, जीए हे अंधश्रद्धात्मक गोष्टींना पाठिंबा देतात. पण प्रत्यक्षात प्रत्येक वेळी असे घडलेच आहे, असे नाही. अनेकदा जी. ए. कुलकर्णी हे शकुनशास्त्राची अनिश्चितता आणि बेभरवशीपणा अधोरेखित करतात. भारताइतकीच प्रगल्भ टोळीय समाजाची परंपरा आपणाला ग्रीक समाजात आढळते. या ग्रीक समाजाने भविष्यविज्ञानाबाबत एक अत्यंत ठाम भूमिका घेतली होती. ग्रीकांच्या मते, सर्व भविष्य हे नियतीने बद्ध केलेले आहे आणि जगातल्या कुठल्याच माणसाला आपली नियती बदलता येत नाही. त्यामुळे शकुनशास्त्राचा आणि संकेतशास्त्राचा उपयोग हा फक्त नियती काय आहे, हे सांगण्यापुरताच होऊ शकतो. ग्रीक लोकांच्या भविष्याबाबतीतील या नियतीवादी दृष्टिकोनामुळे त्यांचे संपूर्ण साहित्य हे नियतीने भारावले गेलेले होते. ग्रीक साहित्यातील सर्वश्रेष्ठ नाटक हे सोफोक्लिसचे ‘इडिपस’ हे नाटक होय. या नाटकाचे मराठीत पु. ल. देशपांडे यांनी भाषांतर केले आहे. तर इडिपस नाटक भारतात अनेक कलावंत सादर करत असतात. या नाटकात राजा इडिपसचे भविष्य आधीच सांगितले जाते. त्याची नियती टाळण्यासाठी राजा आणि राणी त्याला ठार मारण्याचे आदेश देतात. पण तरीही राजा इडिपस वाचतो. नियती ज्याप्रमाणे ठरली होती त्याचप्रमाणे घटना घडत जातात.
इडिपस नाटकाचा प्रभाव जगातल्या अनेक साहित्यिकांवर पडलेला आहे. पाश्चात्त्य देशांत ‘मॅट्रिक्स’सारख्या अत्याधुनिक चित्रपटांतही राजा इडिपसप्रमाणेच नायकाची नियती ठरलेली आहे. 2000मध्ये जर ही अवस्था असेल तर त्या आधीच्या साहित्यात नियती प्रबळपणाने आली, यात आश्चर्य ते काय... जी. ए. कुलकर्णी यांच्यावर ग्रीकांच्या या नियतीविचाराचा प्रचंड प्रभाव पडल्याने, त्यांच्या साहित्यात नियतीचा विचार मात्र अत्यंत प्रबळ रूपात दिसतो. त्यामुळे त्यांची लोकप्रियताही अबाधित राहिलेली दिसते. कारण मराठी वाचकांचा नियतीवर प्रचंड विश्वास आहे. टोळीय समाजातून आलेला हा नियतीचा विचार भारतात कोशालक या दार्शनिकाने अत्यंत शास्त्रीय स्वरूपात मांडल्याने आणि मोक्ष मिळविल्यानंतर नियती चुकते, असा पॉझिटिव्ह विचार केल्याने ग्रीकांचा कट्टर नीतिवाद भारतात मात्र ढिला झाल्याचे दिसते. योग्य कर्म केल्याने नियती टाळता येते, असा भारतीयांचा विश्वास असल्याने भारतात नियतीपेक्षा कर्मफलसिद्धांत अधिक प्रभाव टाकून राहिला. त्यामुळेच भारतीय साहित्यात नियती प्रभावी असली, तरी तिचे स्वरूप हे नियतीपेक्षा वेगळे होते. अर्थातच सर्वांना हे मान्य नव्हते.

जी. ए. कुलकर्णी यांच्या साहित्याला दलित साहित्यिकांनी सर्वाधिक विरोध केला. दलित साहित्यिकांचा नियती या संकल्पनेला आक्षेप असल्याने आणि माणसांचे भविष्य मनुष्यच घडवितो, हा विश्वास असल्याने त्यांनी जी. ए. कुलकर्णी यांचे साहित्य पारंपरिक म्हणून मोडीत काढले. त्यांच्या मते, जी. ए. हे ब्राह्मण्यवादाचे छुपे रुस्तम पुरस्कर्ते आहेत. जी. ए. यांच्या चाहत्यांना दलित साहित्यसमीक्षेची टीका मानवणे शक्यच नव्हते. साहित्यिकांना त्यांचे अनुभवविश्व त्यांच्या दृष्टिकोनानुसार साकार करण्याचे स्वातंत्र्य आहे. जी. एं.च्या कथेतील नियतीविचार हा दुय्यम असून जीएंचे जे अनुभवविश्व आहे, ते प्रभावी असल्याने त्यांच्या साहित्याचे मूल्यमापन हे या अनुभवविश्वाच्या मूल्यमापनानुसार झाले पाहिजे. ही उघडउघड कलावादी भूमिका आहे. मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात तिला आता मान्यता मिळणे कठीण आहे. त्यामुळेच जीएंच्या नियतीवादी ज्या कथा आहेत, त्यांना ग्रामीण साहित्यिक, देशी साहित्यिक आणि दलित साहित्यिक यांपैकी कोणाचाच पाठिंबा राहिलेला नाही. मात्र जिथे जी. ए. कुलकर्णी आपला नियतीवादी विचार टाळून कथा लिहितात, तेव्हा त्या कथा अप्रतिम उतरतात, अशीही मान्यता आहे. उदाहरणार्थ, जीए यांची ‘कैरी’ ही कथा दलित वाचकांनाही आवडते. कारण त्यात बालपणाशी कुणाचीही नाळ जुळू शकते. शिवाय जी. ए. कुलकर्णी यांच्या काही कथा अंधुकशा नियतीवादी आहेत. हा अंधुकसा नियतीवाद आपल्यापैकी प्रत्येकाला काही अंशी स्वीकारत असल्याने या द्विपदरी कथाही मान्यता पावतात. कारण हा अंधुकसा नियतीवाद प्रचंड हताशतेतून निर्माण होतो. ही हताशता (फ्रस्ट्रेशन) प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी भेटतेच. उदाहरणार्थ, जी. ए. कुलकर्णी यांची ‘प्रदक्षिणा’ ही कथा. या अंधुकशा नियतीवादामुळे प्रेरित असली, तरी हा नियतीवाद प्रामुख्याने प्रचंड हताशतेतून निर्माण झाला आहे.

विसाव्या शतकात नियतीवादाच्या विरोधात प्रचंड उठाव झाले. तरी नियती या संकल्पनेचा प्रभाव कधीच ओसरला नाही. मात्र, भारताच्या कर्मावरचा विश्वास अधिक वाढीस लागला. नियती आणि नियतीचा उलगडा करू पाहणारे संकेतशास्त्र आणि शकुनशास्त्र हे आजही साहित्यात प्रभाव टिकवून आहेत. नियती या संकल्पनेला आव्हान मिळणे अटळ होते. ते कसे मिळाले, याचा विचार आपण पुढील लेखात करू.
(shridhar.tilve1@gmail.com)