आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवि, पत्रकार आणि अध्यात्मकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील तीन लेखांत आपण वर्तमानकाळ आणि मीय काळ यांचा विचार केला. आता या लेखात या दोघांचा संबंध पाहायचा आहे.

सध्याच्या समाजात वर्तमानाला सातत्याने सामोरा जाणारा मी म्हणजे पत्रकार. वर्तमानकाळात काय काय, कुठे कुठे, कसे कसे, का का, केव्हा केव्हा चालले आहे; ते ताबडतोब वर्तमानात पोहोचवणे, हे पत्रकारांचे काम असल्याने साहजिकच वर्तमानाचे प्रश्न आणि ताण जेवढे पत्रकारांना झेलावे लागतात, तेवढे कोणालाच झेलावे लागत नाहीत. आपण सर्वच पत्रकारांइतके व्यावसायिक पत्रकार नसलो तरी आपल्या आयुष्यात छोटे आणि सूक्ष्म पत्रकार असतोच. आपण आपल्या भोवतालचा वर्तमान पाहत असतो आणि आपल्या मित्रांना, नातेवाइकांना, परिचितांना तो आपल्या अर्थनिर्णयनासकट पोहोचवत असतो. किंबहुना नवे काय, असे आपण जेव्हा एकमेकांना विचारत असतो; तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण काय नवी बातमी, हेच विचारत असतो आणि आपण जेव्हा नवे काय, या प्रश्नाचे उत्तर देत असतो; तेव्हा आपण एकमेकांस एकमेकांची बातमी देत असतो. ‘न्यूज’ या शब्दातच ‘न्यू’ हा शब्द आहे, तो या अर्थानेच.

पण सर्वच बातम्या न्यूज बनत नाहीत, म्हणजे सार्वजनिक बातम्या बनत नाहीत. सर्वच बातम्यांचे बौद्धिक विश्लेषण होत नाही. मग आपण कलेचा आश्रय घेतो; विशेषत: कवितेचा! कवी आणि पत्रकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण कवितेतील वैयक्तिक न्यूज ही अनुभवकेंद्री भावशीलता पकडून कल्पनाशक्तीला साधन बनवत अत्यंत खाजगीपणाने व्यक्त होत राहते, तर न्यूजमधील बातमी ही अधिकाधिक बौद्धिक, विश्लेषण केंद्रीयता पकडून वास्तविकतेला साधन बनवत अत्यंत सार्वजनिकरीत्या व्यक्त होत राहते. दोघांनाही हा वर्तमान आपणाला कुठे घेऊन जाणार आहे, याची कल्पना नसते. कविता वर्तमानातील शाश्वतता शोधते, तर बातमी वर्तमानातील तात्कालिकता! त्यामुळेच...
बातम्या खबर देताहेत
जगात काय घडतंय त्याची
त्यांनाही माहीत नाही
हे जग कुठं चाललंय
आणि त्या शेवटी
कुठं पोहोचणार आहेत
अशी ही अवस्था असते.
प्रत्येक पत्रकार ही अवस्था काळजात वागवतच वावरत असतो.
जे दुबळे होते
त्यांनी कविता लिहिली
जे दुबळे होते
त्यांनी कविता वाचली
जे सबळ होते
त्यांनी कवितेकडे लक्ष दिले नाही
त्यांना कंटाळून कविता पुढे निघून गेली
कवितेने
कुठेच
काही फरक पडला नाही
कशातच...
असे कधी कधी टोकाचे फ्रस्ट्रेशनही कवींना येऊ शकते. पण हे फ्रस्टेÑशन फक्त कवीपुरते मर्यादित नसते, ते पत्रकारांनाही येऊ शकते. फक्त वरच्या कवितेत कवितेऐवजी बातमी हा शब्द घाला. त्यामुळेच जेव्हा आपल्या बातमीमुळे फरक पडतो, तेव्हा पत्रकारांना प्रचंड आनंद होतो. जे सबळ निगरगट्ट असतात (विशेषत: गेंड्याच्या कातडीचे काही राजकारणी, व्यावसायिक वगैरे) ते अनेकदा कविता आणि बातमी दोन्हीकडे दुर्लक्ष करतात. त्या वेळी कवी आणि पत्रकार यांना वैषम्य वाटते; पण पुढच्या बातमीकडे किंवा कवितेकडे वळण्याखेरीज पर्याय नसतो. कारण वर्तमान नेहमीच बातमी आणि कविता यांच्या बरोबरीने किंवा पुढे धावत असतो. अशा या बिकट परिस्थितीला वारंवार तोंड दिले की, काही मूलभूत प्रश्न निर्माण होतात, त्यांचा गुंता बनतो. या जीवघेण्या वर्तमानात स्वत:चे मन, स्वत:चा आत्मा, स्वत:चे व्यक्तित्व, स्वत:चे अस्तित्व ताजे कसे राखायचे, हा आध्यात्मिक प्रश्न निर्माण होतो आणि मग ‘आध्यात्मिक’ जन्मतो. तो क्षण जगण्याची, क्षणांच्या त्रासापासून स्वत:ला वाचवण्याची युक्ती शोधायला लागतो. वर्तमानाच्या असह्य उकाड्यात स्वत:चे डोके कसे थंड राखता येईल, ते तो पाहायला लागतो. इथेच माणसाचे तिसरे वर्तमानकालीन अंग जन्मते.

थोडक्यात, पत्रकार, कवी आणि अध्यात्मकार हे जगणार्‍या प्रत्येक माणसाचे ‘वर्तमान अविभाज्य’ असते. त्यामुळेच वर्तमानजालक हा एकाच वेळी पत्रकार, कवी आणि अध्यात्मकार असतो. यातील कवी माणूस म्हणून स्वत:चा वर्तमानकाळ; स्वत:चे वर्तमान जगतो. पत्रकार ते इतरांना सांगतो आणि अध्यात्मकार या दोन्ही गोष्टी घडत असताना या वर्तमानकाळाच्या बाहेर राहून पण वर्तमानजालात उभे राहून या दोघांना पाहत राहतो. हे एक झाड दोन पक्षी नसतात, तर एक वर्तमानजाल आणि तीन पक्षी असतात. त्यामुळे कवींनी समकालीन पत्रकारिता, पत्रकारांनी समकालीन कविता आणि अध्यात्मकारांनी या दोन्ही गोष्टी अनुभवणे, वाचणे आणि पाहणे आवश्यक असते. हे जेव्हा घडत नाही, तेव्हा पत्रकार माणुसकीवर काट मारून अत्यंत कोरडेपणाने बातम्या द्यायला लागतात. कवी आपल्या कवितेतून शिळ्या बातम्यांचा रतीब घालत असंवेदनशील बनत बनत शेवटी माठ आणि नॉस्टॉल्जिक बनत जातात आणि अध्यात्मकार अध्यात्माच्या नावाखाली वर्तमानाचा, वर्तमानामधील टेन्शनचा फक्त धंदा करायला लागतात. पण जेव्हा या तिन्ही गोष्टी एकाच माणसात अतिशय चांगल्या रीतीने एकवटतात, तेव्हा कवी ‘चांगले कवी’, पत्रकार ‘चांगले पत्रकार’ आणि अध्यात्मकार ‘चांगले आध्यात्मिक साधक’ बनतात.
(shridhar.tilve1@gmail.com)