आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shridhar Tilve About Super Star Rajanikant, Rasik Article

देवमाणूस!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरत्या ऑगस्ट महिन्याच्या १८ तारखेला कारकीर्दीची ४० वर्षे पूर्ण केलेला रजनीकांत हा आजच्या घडीचा भारतातला सर्वात लोकप्रिय कलावंत आहे, हे खरे तर अंडरस्टेटमेंट ठरावे. कारण, इंटरनेटवर वाढलेल्या पिढीने त्याला ‘सुपरह्यूमन’चा दर्जा कधीच देऊन टाकला आहे. प्रत्यक्षात मात्र पडद्यावरचा सुपरस्टार आणि नेटवरच्या अतिमानवापेक्षा समाजाच्या सुखदु:खांशी एकरूप झालेला, माणुसकीची काठोकाठ जाण असलेला, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, मुखवटा धारण न करता वास्तवाला सामोरे जाण्याचे धैर्य अंगी बाणवलेला त्याच्यातला ‘देवमाणूस’ चाहत्यांसाठी अधिक जिव्हाळ्याचा ठरला आहे.
१९४० च्या आसपास पुण्याकडून बंगळुरूच्या दिशेने मायग्रेट झालेल्या गायकवाड कुटुंबीयांना स्वप्नातही वाटले नसेल की, आपल्या घरात जन्मलेला शिवाजी गायकवाड (जन्म - १२ डिसेंबर १९५०) हा मुलगा तामिळ भाषेचा सुपरस्टार होईल. स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठातील गुरुजनांना तेव्हा स्वप्नातही वाटले नसेल की, मठात वाढलेला आणि वैदिक गणित व अध्यात्म शिकलेला एक मुलगा चक्क फिल्म इंडस्ट्रीत जाऊन भारताचा सर्वात मोठा सुपरस्टार बनेल. आपल्याकडे दाखल झालेले दोन शिष्य पाहून खुद्द दिग्दर्शक के. बालचंदर यांनाही वाटले नसेल की, त्यातला एक शिष्य हा भारताचा सर्वोत्तम अभिनेता बनणार आहे आणि दुसरा स्टायलिश अॅक्टिंगचा बादशहा बनून सर्वाधिक मानधन घेणारा सुपरस्टार होणार आहे...

चेन्नईच्या रस्त्यांवरून एकेकाळी एकाच बाइकवरून फिरणारे हे दोन शिष्य एकमेकांचे मित्र होऊन स्ट्रगल करत होते, तेव्हा या दोन मित्रांनाही वाटले नसेल की, भविष्यात त्यातील एक ‘कमल हासन’ आणि दुसरा ‘रजनीकांत’ होणार आहेत. पण हा चमत्कार प्रत्यक्षात घडला. त्यात या दोघांचेही मराठी कनेक्शन कायम राहिले. एक स्वत:च मराठी होता, तर दुसऱ्याची बायको मराठी होती. पण हा शिवाजीराव गायकवाड नावाचा माणूस अशा सर्वोच्च स्थानी पोहोचलाच कसा? मॅनेजमेंट स्टडीजमध्ये रजनीकांतचे यश हे एक विशेष अभ्यासाचे क्षेत्र बनले आहे. रजनीकांत हा असा पहिला अॅक्टर आहे की ज्याचे जीवनचरित्र चक्क पाठ्यपुस्तकात दाखल झाले आहे. त्याच्यावरील धड्याचे नाव आहे, ‘बस कंडक्टर ते सुपरस्टार’. रजनीकांतच्या घरामध्ये मराठी बोलली जाते, हे सर्वश्रुत आहे आणि मराठीच्या बरोबरीने कन्नडही. अनेकांना कदाचित आश्चर्य वाटेल, पण ज्या तामिळ फिल्म इंडस्ट्रीचा रजनीकांत बादशहा आहे, त्या फिल्म इंडस्ट्रीची तामिळ ही भाषा सुरुवातीला रजनीकांतला येत नव्हती. पण कन्नड नाटकातील त्याची अॅक्टिंग बघून बेंद्रे आणि के. बालचंदर या दोघांनी त्याला तामिळ भाषा शिकण्याचा आदेश दिला होता. पण एकूणच, रजनीकांतच्या यशाचा पाया हा आध्यात्मिक आहे. हा पाया रामकृष्ण मठाने घातला आहे. रजनीकांत हा केवळ रामकृष्ण परमहंसांच्या विचारांचे मनन-चिंतन करून थांबला नाही तर त्याची बौद्धिक व आध्यात्मिक वाटचाल ही रमण महर्षी आणि जे. कृष्णमूर्ती या दोन तत्त्वचिंतकांपर्यंत येऊन पोहोचली. याचा एक ठळक परिणाम म्हणून वास्तव आयुष्यात रजनीकांतने कधीच मुखवटा धारण केला नाही. त्याने आपले टक्कल कधी लपवले नाही किंवा स्वत:चा सावळा रंग झाकला नाही. तो जसा आहे तसाच सार्वजनिक जीवनात वावरत राहिला. मुळातच संपूर्ण दाक्षिणात्य फिल्म संस्कृतीतच स्टार लोकांचे स्टारडम हे भपकेबाजपणातून व्यक्त होत नाही. हे लोक सार्वजनिक जीवनात अत्यंत साधेपणाने वावरतात. रजनीकांतही कायम साधा राहिला. त्याच्या या साधेपणाने अाध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातील लोकांची मने तो कायमच जिंकत राहिला.

रजनीकांतच्या आईचा मृत्यू त्याच्या लहानपणीच झाला, आणि तो जेव्हा सात वर्षांचा होता तेव्हा त्याचे वडील सेवानिवृत्त झाले. त्यामुळे साहजिकच लहानपणापासूनच कष्टाची कामे करायची रजनीकांतला सवय लागली. रामकृष्ण मठातील संस्कारांमुळे सर्व प्रकारच्या श्रमाची आणि श्रमिकांची इज्जत करण्याची परंपरा त्याच्यात खोलवर रुजली. त्यामुळेच सुरुवातीला हमाल आणि सुतार अशी कामेही रजनीकांत करत होता. नंतर त्याला बंगळुरू ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये बस कंडक्टरची नोकरी मिळाली. यातूनच कुठल्याही कामाची तयारी आणि पुढे कुठलीही भूमिका जगण्याची तयारी रजनीकांत नेहमीच दाखवत राहिला. लहानपणी एकलव्याच्या मित्राची छोटी भूमिका करणारा रजनीकांत सुरुवातीला अत्यंत छोटे छोटे, निगेटिव्ह रोल करत होता.

‘गायत्री’सारख्या चित्रपटात तर त्याने चक्क पोर्नोग्राफरचा रोल केला होता, जो आपल्या बायकोलाच न्यूड शूट करून तिचे फोटो विकत असतो. परंतु पुढे अर्थातच असे रोल कमी होत गेले. पण या अनुभवातून गेल्यामु‌ळेच रजनीकांतने त्याच्या आसपास छोटे छोटे रोल करणाऱ्या सर्वांनाच मानसन्मान दिला. सन्मानपूर्वक मानधनही दिले.

रामकृष्ण मठाच्या संस्कारांमु‌ळे रजनीकांत हा कायमच सज्जन व सभ्य गृहस्थ राहिला. त्याच्याबाबत वादविवाद घडवण्याचे प्रयत्न मीडियाने केले. पण मूळचा सज्जनपणा इतका मोठा होता की अशा सगळ्या वादविवादांतून तो शुद्ध सोन्यासारखा बाहेर पडला. दक्षिणेत सर्वच कलाकार वेळेवर येतात. पण रजनीकांतचे वैशिष्ट्य म्हणजे तो पंक्चुअल होताच; पण त्याचबरोबर त्याचे कितीही टेक असले तरी तो ते हसत हसतच देत असे. हल्ली तब्येतीमुळे त्याला हे करता येत नाही.

पण याचा ‌विषाद त्याच्या बोलण्यात नेहमीच असतो. रजनीकांत मूळचा थिएटर आर्टिस्ट असल्याने रंगमंचावर काम करताना लागणाऱ्या सर्व चांगल्या सवयी त्याच्या अंगात भिनल्या आहेत. त्यामुळेच लेखक व दिग्दर्शकाचा सन्मान करणे, ते सांगतील ते नम्रपणे ऐकणे, हा रजनीकांतचा एक विशेषच आहे. चित्रपट हे टीमवर्क आहे, याची त्याला नीट कल्पना आहे. रजनीकांतच्या वरील स्वभावविशेषांमुळेच त्याची वाटचाल ही अनेक पातळ्यांवरून झाली. रंगमंचीय कलाकारापासून समांतर सिनेमा आणि नंतर स्टायलिश सिनेमा अशी ही वाटचाल आहे.
कमल हासन हा जर अभिनयातला वास्तववाद असेल, तर रजनीकांतचा अभिनय हा अतिवास्तववादी मानला पाहिजे. गमतीचा भाग असा की, रजनीकांतचा सुरुवातीचा अभिनय हा वास्तववादीच होता. पण कमल हासनकडे असणारे अभिनयाचे कौशल्य आपल्याकडे नाही, हे लक्षात येताच रजनीकांतने अत्यंत जाणीवपूर्वक वास्तववादी अभिनय सोडून स्वत:चा स्टायलिश अभिनय सुरू केला. पुढे पुढे त्याच्या स्टाइल्स या आयकॉनिक बनत गेल्या. जेव्हा रजनीकांतने सुरुवात केली, तेव्हा कमल हासनने लागोपाठ तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनयाची पारितोषिके पटकावली होती. पण रजनीकांतला फक्त एकच फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाले होते. रजनीकांतला याचे कधीच वैषम्य वाटले नाही. उलट माझ्यापेक्षा कमल हासन हा अधिक मोठा अभिनेता आहे, हे त्याने अनेकदा उघडपणे मान्य केले आहे. साहजिकच आपले सामर्थ्य ‘क्लास’मध्ये नसून ‘मास’मध्ये आहे, हे उमगलेल्या रजनीकांतने सर्वसामान्य प्रेक्षकांना आवडतील अशा भूमिका स्वीकारायला सुरुवात केली. अनेकदा अनुकरणाचीही तयारी दाखविली. अनुकरण करताना अभिनय वगैरे भानगडी त्याच्या करिअरमध्ये त्याने आणल्या नाहीत. हिंदीतले अनेक उत्तम चित्रपट तामिळमध्ये त्याने रिमेक म्हणून सादर केले. त्यात अमिताभ बच्चन, चंद्रा बारोट यांचा ‘डॉन’ असो किंवा फिरोज खानचा ‘कुर्बानी’.
(shridhar.tilve1@gmail.com)