आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतजालकीचे संचित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील लेखात वर्तुळी काळाचा व सरळरेषीय काळाचा विचार केला. चौथ्या नवतेत भूतकाळाची चिकित्सा करणा-या मीमांसेला भूतजालकी म्हणतात. माणसाच्या मीय आणि विश्वाच्या मितीय काळातून समाजाचा समाजमितीय काळ जन्मतो. टोळीय समाजात हा समाजमितीय काळ ‘परंपरा’ म्हणून, विश्वीय समाजात ‘पुराण’ म्हणून, सृष्टीय समाजात ‘इतिहास’ म्हणून, प्रतिसृष्टीय समाजात ‘भूततांत्रिकी’ म्हणून, तर चिन्हसृष्टीय समाजात तो ‘भूतजालकी’ म्हणून स्टोअर केला जातो. परंपरा ही टोळीने जतन केलेली स्टोरेज सिस्टीम असते. विश्वीय समाज मात्र भूतकाळाला अद्भुत रूप देऊन त्याचे पुराण रचतो. या पौराणिक भूतकाळाला विज्ञानाने आव्हान दिले. भूतकाळ ऑब्जेक्टिवली पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून इतिहास जन्मला. पोस्टमॉडर्न प्रतिसृष्टीयतेने पुन्हा एकदा या इतिहासाला आव्हान दिले आणि भूतकाळ हे फक्त ‘रचित’ असते, अशी मांडणी केली. उदा. मार्क्सवादी इतिहासकार हा त्याच्या आयडियॉलॉजीप्रमाणे भूतकाळ रचतो आणि त्याने सादर केलेला भूतकाळ वा इतिहास हे एक मार्क्सवादी रचित असते, असे पोस्टमॉडर्निझम मानतो.
मला स्वत:ला ही पोस्टमॉडर्न भूततांत्रिकी अमान्य आहे. भूतकाळ हा तंतूंनी बनलेला जाल असून त्यातील काही तंतू पारंपरिक, काही पौराणिक, काही ऐतिहासिक, काही रचना, काही रचित, तर काही चिन्हना, तर काही केवळ चिन्हीज असतात, असे मी मानतो.
उदा. शिवाजींना भवानी मातेने तलवार दिली, हा पौराणिक तंतू; शिवाजी हे हिंदू व मराठी होते, हा ऐतिहासिक; शिवाजी हे मुस्लिमविरोधी होते हा पोस्टमॉडर्न रचित; शिवाजी हे शिवसेनेचा मुख्य आधार, हा चिन्हित तंतू आहे. असे सर्व तंतू शिवाजीविषयीचे भूतजाल निर्माण करतात. शिवाजीविषयीचे हे भूतजाल हे एक सेमिओटिक स्टोरेज असते. एक डाटा असते आणि या डाटात अनेक तंतू असतात. शिवाजी हे एका अर्थाने फक्त इन्फर्मेशन असतात. परंपरा, पुराण, इतिहास आणि भूततांत्रिकी (खरे तर तांत्रिकी हा शब्द अधिक योग्य आहे) हे सर्वच इन्फर्मेशन आहे आणि त्यातून प्रत्येकाला स्वत:चे आकलन निर्माण करावे लागते. यातून एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे, आपले भूताकलन हे डाटावर अवलंबून असते का? तर या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. मेंदूचा डाटा आणि जालडाटा यांच्या संयोगातून भूताकलन जन्मते. उदाहरणार्थ, कुसुमाग्रजांची ‘कोलंबसचे गर्वगीत’ ही कविता. यातील
अनंत आमुची ध्येयासक्ति अनंत आमुची आशा
किनारा तुला पामराला
या ओळी अनेकांना पाठ आहेत. ही कविता तात्यांनी (वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज) लिहिली, तेव्हा ते युरोपियनांनी स्पॉन्सर केलेल्या कलोनियल इतिहासाच्या प्रभावाखाली होते आणि कोलंबस हा त्यांनी नायक म्हणून सादर केला. प्रत्यक्षात कॉलनी(त्यात भारतही आला)च्या दृष्टिकोनातून कोलंबस हा खलनायक होता. केवळ सुपेरियर गंडाने पछाडलेल्या या गर्विष्ठ युरोपियनाला (स्पॅनिश) स्थानिक लोक हे जनावर वाटत होते. ती युरोपियन आक्रमणाची सुरुवात होती. तात्यांना हे उमगले नाही. (अलीकडे तर कोलंबसच्या आधीच 11व्या शतकातच लीफ एरिक्सनने अमेरिकेत प्रवेश केला होता, असे सत्य पुढे आले आहे.) पण आता ज्यांना कोलंबसचा नवा डाटा अवगत आहे, त्यांना ही कविता कुसुमाग्रजांची कलोनियल गुलामी दर्शवते, असे वाटणे अटळ आहे. डाटासंदर्भातले असे दुसरे उदाहरण म्हणजे, पहिल्या बाजीरावाचे सेनानी म्हणून असलेले महत्त्व. हा जगातला एकमेव सेनापती, जो 41 लढाया लढला आणि एकही लढाई हरला नाही. त्याची निजामाविरुद्धची पालखेडची लढाई ही आज युद्धशास्त्रातील एक मिसाल बनली आहे. पण हा डाटा नीट उपलब्ध झाला, तो बर्नार्ड माँटेगमेरी या ब्रिटिश अधिका-याच्या विसाव्या शतकातील लिखाणाने. सर्व जाती-जमातींच्या लोकांना सैन्यात प्रवेश देण्याची शिवाजीची परंपरा बाजीरावाने पुढे नेली (मराठे जर शिवाजी-बाजीरावाच्या मार्गाने गेले असते, तर भारताचा इतिहास बदलला असता) आणि तिला महत्त्वाकांक्षी बनवले. 21व्या शतकात बाजीरावाचे महत्त्व वाढणे अटळ. हे नव्या डाटाने घडवले. भूतकाळ जर असा चिन्हबाधित, डाटाबाधित असेल तर काय करायचे? तर आपलाच डाटा खरा आणि आपलेच आकलन खरे, हा अट्टहास सोडून द्यायचा. भूतजालकी ही त्यामुळेच सतत बदलणारी आणि बदलाला सतत तयार असणारी असते. मात्र ती केवळ पोस्टमॉडर्न रचित असते, असे मात्र मानायचे नाही. जर वैज्ञानिक कसोटीच्या आधारे काही ऐतिहासिक तथ्ये निश्चित होत असतील तर त्या निश्चिततेलाही जागा द्यायची. कुणीतरी परंपरा थोर मानते म्हणून ती थोर न मानता तिचे विश्लेषण करायचे; मात्र परंपरा ही आठवणीवर जगणारी परपोषित व्हायरससारखी असते, याचे भान बाळगायचे. भूतकाळाचे पुराण खोडून काढायचे आणि हे करताना वैज्ञानिक कसोट्या लावून ते तपासून पाहायचे किंवा लोकांना ते कल्पित आहे हे पटवून द्यायचे, हे आजच्या भूतजालकाचे काम आहे. उदा. मराठी वाङ्मयाचे भूतजाल निर्माण करताना ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, हे पुराण नाकारायचे. मराठी वाङ्मयाचा यापूर्वी लिहिला गेलेला भूतकाळ हा इतिहास आहे, आधुनिक रचना आहे, की उत्तरआधुनिक रचित आहे, हे संशयाचे सातत्य टिकवत पडताळत राहायचे, हे कार्य चौथ्या नवतेला सतत पार पाडावे लागणार आहे.