आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहित्याचेही ब्रॅँडिंग?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे भारतातील सर्वच क्षेत्रांत कमी-अधिक परिणाम होणे अटळ असल्याने साहित्यावरही याचे काही चांगले परिणाम, दुष्परिणाम होणे अटळ आहे. राजकीय तज्ज्ञांनी या विजयाचे अनेक पद्धतीने सध्या विश्लेषण चालवले आहे. त्यातील डाव्या गटाला तर हा विजय धक्कादायकच वाटलेला दिसतो. यात निखिल वागळे यांच्यापासून कम्युनिस्ट पक्षापर्यंत सर्वच येतात. गेली काही वर्षे मराठी साहित्यात एक जोरदार वाद चालू आहे तो म्हणजे, विचारप्रणालीचा अंत झाला आहे का?

नरेंद्र मोदी यांचा विजय हा कुठल्या विचारप्रणालीचा विजय म्हणावा की विचारप्रणालीला रिप्लेस करणार्‍या मॅनेजमेंटचा विजय म्हणावा, हा एक मूलभूत प्रश्न आहे. मराठी साहित्य हे विचारप्रणालीने ग्रासलेले आहे. जोपर्यंत कुठल्या ना कुठल्या विचारप्रणालीचा झेंडा तुमच्या साहित्याच्या खांद्यावर दिसत नाही, तोपर्यंत तुम्हाला समीक्षकांचा आणि वाचकांचा प्रतिसाद मिळत नाही. नरेंद्र मोदी सत्तेवर आता आले असले तरी त्यांच्या विचारधारेला पूरक अशा मृत्युंजय, राधेय, श्रीमानयोगी अशा कादंबर्‍या मराठीत पूर्वीपासूनच विजयी होताना दिसतात. या साहित्यिक विजयाचे रूपांतर राजकीय विजयात या निमित्ताने झाले की काय, असा प्रश्न येथे उपस्थित करता येईल. जर नरेंद्र मोदी यांचा विजय हा मॅनेजमेंटचा विजय असेल तर मॅनेजमेंटने राजकीय विचारप्रणालींवर मिळवलेला हा शेवटचा विजय असेल आणि जर का राजकारणात या निवडणुकीच्या निमित्ताने विचारप्रणालीचे युग संपून मॅनेजमेंटचे युग सुरू झाले असेल, तर मग साहित्यातसुद्धा राजकीय प्रणालींचा खर्‍या अर्थाने अंत झाला, असे समजावे काय? मराठीतील बहुतांश साहित्यिकांना हा प्रश्न विचारायचा नसेल, तर विचारमंथन थांबणे अटळ. विशेषत: आंबेडकरवादी साहित्य हे विचारप्रणालीबाबत अत्यंत आवेशी असल्याने त्यांना हा विचारप्रणालीचा अंत पेलेल का?

राहुल गांधी यांची मॅनेजमेंट की नरेंद्र मोदी यांची मॅनेजमेंट, या प्रश्नाला दिलेले उत्तर म्हणजे, या निवडणुकीतील मतदान. अगदी तरुण पिढीनेही नरेंद्र मोदी यांना मतदान केले. याचा अर्थ असा की, राहुल गांधी यांनी त्यांच्या मॅनेजमेंटचे जे चित्र उभे केले ते तरुण पिढीला विश्वासार्ह वाटले नसावे. गांधी फॅमिली ही विचारप्रणालीच्या आधारे विजयी होत होती की भावनिक राजकारणाच्या जिवावर? हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण गांधी कुटुंबीयांचा इतिहास पाहिला तर जवाहरलाल नेहरू यांच्या विजयामागे भारतीय जनतेच्या स्वातंत्र्याविषयीच्या भावना दिसतात, तर इंदिरा गांधी यांना नेहरूंची कन्या याच क्वालिफिकेशनने विजयी केलेले दिसते. आणीबाणीमुळे त्यांच्याविषयीच्या भावना नष्ट झाल्या आणि त्या दणकून आपटल्या. मग पुढे जनता पक्षाविषयीच्या तीव्र विरोधी भावनेपोटी इंदिरा गांधी पुन्हा निवडून आल्या. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूमुळे जी सहानुभूतीची भावना उसळली, तिच्यामुळे राजीव गांधी यांचे कसलेही क्वालिफिकेशन न तपासता त्यांना भारतीय जनतेने निवडून दिले आणि पुढे त्यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या भावनेमुळे काँग्रेस विजयी झाली. राहुल गांधी हे गांधी घराण्याचे कदाचित पहिले असे वारसदार होते, ज्यांना कसल्याही भावनिक लाटेचा आधार मिळालेला नाही. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचंड तोंडसुख घेणार्‍या या विचारप्रणालीनिष्ठ साहित्यिकांना मोदींच्या विजयामुळे चांगलीच थप्पड पडली. यातून एक वेगळाच मुद्दा निर्माण होतो की, मराठी साहित्यातसुद्धा मार्केटिंग आणि ब्रॅँडिंग या दोन गोष्टी केंद्रस्थानी येणे अटळ आहे का आणि उद्या जर असे झाले तर साहित्याची गुणवत्ता न तपासताच केवळ तो कुठल्या ब्रँडमधून आला आहे, हे महत्त्वाचे ठरणार तर नाही ना?

याचा अर्थ, मराठीत पूर्वी ब्रँडिंग नव्हते असे नाही. मराठीतला सध्याचा सर्वात मोठा ब्रॅँड हे नेमाडे आहेत आणि या ब्रॅँडच्या छत्रछायेखाली अनेक सामान्य साहित्यिकांनी आपले साहित्यिक उखळ पांढरे करून घेतले आहे. पूर्वी ‘मौजे’च्या ब्रॅँडखाली असेच घडलेले होते. आता अशा प्रकारच्या ब्रॅँडिंगची व्याप्ती जर वाढतच गेली तर मग साहित्याच्या दर्जाचे काय? अनेकदा ब्रॅँड हे जाहिरातीच्या आधारे गाजावाजा करतात. मराठीत जाहिरातींचे प्रमाण वाढलेले दिसतेच.

अगदी मराठी पारितोषिकेदेखील ब्रॅँड बघूनच दिली जातात. ग्रामीण आणि दलित हे मराठीतील कदाचित सर्वाधिक लोकप्रिय ब्रॅँड असावेत. विचारप्रणालीच्या कांबळाखाली आतापर्यंत मराठी साहित्यिक आपले ब्रॅँडिंग झाकत आले होते. पण विचारप्रणालीचे कांबळच जर काढून घेतले गेले तर अनेक तथाकथित थोर साहित्यिक अत्यंत सामान्य दिसणार नाहीत, याची काय खात्री? मराठी साहित्यात काही लोकांच्या मते, मोदी यांच्या विजयामुळे प्रतिगामीपणा वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, मोदी यांचा विजय रा. स्व. संघाचा विजय आहे. त्यामुळे मागील दाराने श्रुतीस्मृती, पुराणोक्त, धर्म पुन्हा परतेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. अशा वेळी मराठी साहित्यिकाने करायचे काय? मला स्वत:ला ही भीती फारशी सतावत नाही. कारण माझ्या मते, जनसंघ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचारप्रणालीनिष्ठ पक्ष होता, तर भारतीय जनता पक्ष ही रा. स्व. संघाची मॅनेजमेंट आहे. या मॅनेजमेंटला क्षेत्र राजकारणाचे असो वा साहित्याचे, प्रतिगामी धोरण आणून सत्तेवर टिकणे शक्यच नाही. म्हणून तर या निवडणुकीच्या निमित्ताने मोदी हे तेली समाजाचे असल्याने त्यांचा अपमान कॉँग्रेसने केला, अशी ओरड या मॅनेजमेंटने केली होती. एक ओबीसी समूहातला नेता पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करणे, हा राजकीय मॅनेजमेंटचा प्रतिगामीपणा नसून बदललेल्या काळाची पावले ओळखण्याची ही संघाची नवी टेक्निक आहे, हे आपण इथे लक्षात घेतले पाहिजे.

खुद्द नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्या आल्या या संदर्भातले इशारे स्पष्टपणे दिलेले आहेत. मात्र, वैदिक धर्माचा आतापर्यंतचा इतिहास बघता, भारतीय समाजाच्या डोळ्यात राजकीय धूळ फेकण्याचा संघाचा प्रयत्न असू शकतो, ही शक्यता दहा टक्केच गृहीत धरावी हे उत्तम. त्यामुळे यापुढे या संदर्भात साहित्यिकांना डोळे उघडे ठेवून काम करण्याची गरज आहे. मागील दाराने प्रतिगामीपणा आणण्याचा कोणताही प्रयत्न साहित्यिकांनी हाणूनच पाडला पाहिजे. राजकारणाकडे पाठ फिरवणार्‍या साहित्यिकांकडून या बाबतीत फारशी अपेक्षा नाही; पण साहित्यिकांची जी नवी पिढी साहित्याची मॅनेजमेंट घेऊन पुढे येईल, तिने कुठलीही मॅनेजमेंट प्रतिगामीपणाने पुढे जाऊ शकत नाही, हे निश्चित ओळखून स्वत:ची साहित्यिक वाटचाल करावी, हे उत्तम. धर्माला जोपर्यंत अध्यात्माचा आधार असतो तोपर्यंतच धर्म हा धर्म राहतो, अन्यथा त्याचा आसारामबापू बनतो. नरेंद्र मोदी यांचा राजकीय आसारामबापू बनणार नाही, अशी आशा धरून मी थांबतो.