आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shridhar Tilve Article About Literature, Divya Marathi

साहित्यातील मीय काळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या सदराच्या पहिल्याच लेखात आपण 1) रेषीय काळ 2) वर्तुळी काळ यांचा विचार केला. कारण टोळीय समाजातील आपल्या आदिवासी पूर्वजांनी आपल्याला दिलेली ती अभूतपूर्व देणगी आहे. या देशातील आदिवासी व भटके ज्यांना मी आदराने ‘जमाती’ म्हणतो; ज्या आजही भारतात आहेत; त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा त्यामागील हेतू होता. टायमालॉजीची सुरुवात यांच्यामुळे झाली, एवढे आपण लक्षात ठेवले तर बरे! असो...

काळाचा विचार करताना मी ‘मी’य काळ अशी संकल्पना मांडली. साहित्याचा विचार जेआत्मविष्कार म्हणून करतात, त्यांच्या दृष्टिने हा मीय काळच महत्त्वाचा आहे. मग प्रश्न असा आहे, की ‘मीय’अशी नवी संकल्पना वा नवीन शब्द आवश्यक आहे का? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. आजही आपणा सर्वांचा ‘मीय’ काळ हा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असा सरळ रेषीयच (लिनीअर) प्रवास करतो.

माणसाच्या आयुष्यात टोळीय समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान हे केवळ रेषीय काळ (भूत, वर्तमान, भविष्यकाळ) आणि वर्तुळी काळ यापुरते मर्यादित नाही. टोळीय समाजाने माणसाला शरीराच्या पेक्षाही अधिक काही समजले. आणि त्यातून ‘मन’ नावाची संकल्पना जन्मली. आज आपण ‘मन’ ही संकल्पना सर्रास वापरतो. हे मन प्रामुख्याने जनेटीक मटेरियलपासून बनलेले असते. त्यात जिन्सचे योगदान सर्वात अधिक असते. हे मन चंचल असल्याने त्याला नियंत्रित करण्याची गरज भासू लागली आणि ‘नियंत्रक’ किंवा ‘मनाचा नियंत्रक’ म्हणून माणसाने आत्म्याचा शोध लावला. हा आत्मा काळाच्या ओघात अजर, अमर आणि अक्षर झाला. अध्यात्माने दिलेले हे योगदान धर्माने दृढ केले. आणि माणूस म्हणजे, केवळ ‘मन’ नसून त्याचा आत्मा हाच खरा माणूसपणाचा कणा आहे, ही धारणा पक्की झाली.

पुढे गौतम बुद्धाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून आत्म्याची चिकित्सा केली, त्याच्याही आधी लोकायतांनी आत्मा मानण्यास नकार दिला होता. पण ते आध्यात्मिक नव्हते. गौतम बुद्ध हा आध्यात्मिक होता आणि तरीही त्याने अजर, अमर आणि अक्षर आत्मा नाकारण्यास सुरुवात केली. त्यातूनच ज्याला आज आपण वैज्ञानिक भाषेत ‘सब्जेक्ट’ म्हणतो, त्याचा पूर्वावतार तयार झाला. पुढे सृष्टीय समाजात सब्जेक्ट विकसित झाला आणि व्यक्ती म्हणजे ‘इंडिविज्युअल’ ही संकल्पना जन्मली.

प्रतिसृष्टीयतेत मात्र ‘व्यक्ती’ ‘सब्जेक्ट’ याविषयी शंका निर्माण झाली. त्यातून अस्तित्व ही संकल्पना उदयाला आली. विसाव्या शतकात या अस्तित्वाच्या प्रश्नांना भिडताना अनेक विचारवंतांना सब्जेक्ट अडचणीचा वाटू लागला. त्यांनी ‘सब्जेक्ट इज डेड’अशी घोषणा दिली. 1980 नंतर इंटरनेटचा प्रसार आणि प्रचार झाला. चिन्हवस्तू आणि चिन्हसृष्टी यांनी पुन्हा एकदा परिवर्तन (बदल) घोषणेला त्यामुळे नकार दिला. मी ‘मेनी आयज (मी) आर बॉर्नड्’, अशी घोषणा दिली. माझ्या ‘अ डॉ हॉ का बा ना सु ना’ या साहित्यकृतीची सुरुवात ‘मी’च्या बाराखडीने मी केली होती. त्याचे कारण अनेक ‘मी’ जन्मले आहेत, हे व्यक्त करण्याचा तो कलात्मक मार्ग होता. पुढे श्याम मनोहरांनी ‘शंभर मी’ या नावाची साहित्यकृती लिहिली. त्यात त्यांना अनेक ‘मी’ची कथा सांगायची होती.

थोडक्यात काय, ‘मी’ची आणि ‘मी’विषयीची संकल्पना ही स्थिर नसून, ती काळाप्रमाणे बदलत गेली आहे. आज अशी अवस्था कीजेव्हा आपण मी हा शब्द वापरत असतो, तेव्हा त्यात ‘मन’, ‘आत्मा’, ‘निरीक्षक’, ‘अस्तित्व’ या सर्वच संकल्पनांचा समावेश असतो. म्हणूनच या गोष्टींचे या सर्व ‘मी’पणाचे जाल म्हणजे, ‘मीय’ असे म्हणावे लागते. ‘मीय’ असा नवीन शब्द ‘मी’ या अर्थाने वापरला आहे. या ‘मी’ला अनुभवाला येणारा, जाणवणारा, त्याच्याकडून व्यक्त होणारा, वापरला जाणारा, क्रियाप्रकिया केला जाणारा काळ म्हणजे, ‘मीय’ काळ होय.

‘अ.डॉ.हॉ.का.बा.ना.सु.ना.’ या साहित्यकृतीत श्रीधर नाईक, श्रीधर तिळवे, दयेन्द्र नाईक, कवी हे एकाच माणसाचे मीय आहेत. पुढे श्रीधर नाईकपासून क्लोनिंग होऊन आणखी एक श्रीधर परग्रहावर तयार होतो. या पाच ‘मी’चे हे ‘मीय’ ही कलाकृती वागवते.

‘शंभर मी’ या श्याम मनोहरांच्या साहित्यकृतीत तब्बल शंभर ‘मी’ आहेत, असे सकृद्दर्शनी दिसते. पण प्रत्यक्षात जर आपण पाहिले, तर हे सर्व एका माणसाचे शंभर मी नसून शंभर माणसांचे शंभर मी आहेत, असे दिसते. म्हणजेच एका अर्थाने, प्रतिसृष्टीतील अस्तित्व हीच संकल्पना इथे प्रभावी ठरलेली आहे. शेवटी श्याम मनोहर अंतिमत: प्रत्येक माणसाची, प्रत्येक अस्तित्वाची कधी त्रोटक, कधी सूक्ष्म, कधी स्थूल अशी कथाच सांगतात. श्याम मनोहरांना आमचा अनेक ‘मीं’चा काळ कळला नसल्याचे हे लक्षण आहे.

सृष्टीय आधुनिक कादंबरीत ‘मी’चा शोध ‘व्यक्ती’ म्हणून घेतला जाई, त्यामुळेच सृष्टीय समीक्षेत ‘व्यक्तिरेखा’, ‘व्यक्तिरेखेचे चित्रण’ वगैरे गोष्टींना कमालीचे महत्त्व होते. प्रतिसृष्टीय आधुनिकतावादी- नवकादंबरीने ‘व्यक्तिरेखा’ या भानगडीलाच नकार दिला. उदाहरणार्थ, काफ्काच्या ‘ट्रायल’ या कादंबरीत नायकाला नावच नाही. तो फक्त ‘के’ या नावाने येतो, तो व्यक्तिरेखा म्हणून येत नाही तर अस्तित्व म्हणून येतो. भालचंद्र नेमाडे यांच्या तथाकथित नवकादंबरीत नायक अवतरतो, तोच मुळी ‘मी पांडुरंग सांगवीकर’ अशी व्यक्तिरेखात्मक ओळख देत! ही ओळख ‘उदाहरणार्थ मी पांडुरंग सांगवीकर’, अशी झाली असती, तर ती अस्तित्वाची ओळख झाली असती. सुदैवाने ‘शंभर मी’त व्यक्तिरेखा नाहीत. त्यामुळे यातील ‘मी’ना नावे असली, ते स्वत:च्या मीय काळाचा तुकडा मांडत असले तरी ते जुनाट न ठरता आधुनिकोत्तर ठरतात. ‘शंभर मी’ची ही जमेची बाजू आहे.