आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shridhar Tilve Article About Literature & Facebbok, Divya Marathi

वर्तमान आणि साहित्याचे फेसबुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील लेखात ऐंशोत्तरी पिढी आणि वर्तमानकाळातील वर्तमानपत्रे यांचा संबंध संपल्याने त्याचा परिणाम कसा उपेक्षेत झाला, हे आपण पाहिले. मात्र सुदैवाने ही उपेक्षा नव्वदोत्तरी कवितेच्या वाट्याला आली नाही. रोमँटिक नवतेचा सौमित्र हा अभिनेता असल्याने, देशी नवतेचा मंगेश काळे हा स्वत:च पत्रकार व प्रिटिंग प्रेसचा मालक असल्याने, तर चौथ्या नवतेचा हेमंत दिवटे हा स्वत:च माध्यमात मॅनेजमेंट सांभाळत असल्याने या लोकांनी आपली कविता मीडियापर्यंत कशी पोहोचवता येईल, त्याची नीट काळजी घेतली. पण वर्तमान आणि कविता यांचा थेट संबंध जुळून आला, तो सोशल नेटवर्किंग साइट्समुळे! फेसबुकने या संदर्भात केलेली कामगिरी लक्षणीय आहे. कवितेचे लेखन आणि प्रकाशन यांच्यातले सारे अंतराय फेसबुकने संपवले. या दोन क्रियांदरम्यानच्या काळाचा हा अंत ही एक क्रांती आहे. कवितेला ताबडतोब दाद देणारे रसिक असल्याने काही कवींनी फेसबुक हेच त्यांच्या कवितेचे माध्यम बनवले. काही कवींनी स्वत:च्या अनेक कविता फेसबुकवर आणायला सुरुवात केली. यातील फेसबुकमुळे ज्याचा प्रसार झाला, तो कवी म्हणजे ओंकार कुलकर्णी. ‘मॅड स्वप्नांचा प्रवाह’ हा त्याचा कवितासंग्रह दोनहजारोत्तरी संवेदनशीलतेचा व चौथ्या नवतेतील तिसर्‍या पिढीचा कवितासंग्रह मानायला हवा.

याशिवाय योजना यादवसारख्यांच्या लक्षणीय कविता फेसबुकवर आल्या. तसेच ज्यांचा पुन्हा नव्याने शोध लागला, असे रवी लाखेसारखे रोमँटिक अस्तित्ववादी फेसबुकवर सळसळले (आणि माझ्यासाठी माझे सर्व मित्र!) . फेसबुकवरील सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजे चव्हाटा, उठाठेव, अस्सल कोल्हापुरी, द्या टाळी, भूमिया यासारखे ग्रुप! संजय सोनावणी, सुनील तांबे, चं. प्र. देशपांडे, सतीश तांबे, उदय रोटे, महेश पवार, हरिश्चंद्र थोरात यांसारख्या अनेकांनी चालवलेल्या चर्चा या मराठी संस्कृतीत काय चालले आहे, त्याच्या चालत्या- दिसत्या- बोलत्या वार्ता असतात. पण गमतीचा भाग असा की, ज्या लोकांना फेसबुकशी फारसे देणेघेणे नाही, अशा भालचंद्र नेमाडेंसारख्या आऊटडेटेड विचारवंतावर इथे जास्त चर्चा रंगलेल्या असतात. उदय रोटेसारख्या आकस बाळगून लिहिणार्‍या लोकांचीही इथे चलती! मात्र हिंदुत्ववादाची व वाद्यांची टवाळी हाही इथल्या अनेक विचारवंतांचा टाइमपास. स्वत:च्या लेखनाच्या लिंक्स देणे, वा रोज काही ना काही कॉमेंट टाकणे, असाही रोग काहींना जडलेला. फेसबुक म्हणजे पारंपरिक विचार करणार्‍या विचारवंतांची जत्रा! मध्येच महेश पवारसारखे अवलिये! चं. प्र. देशपांडेंसारखे काही सीरियस, गजू तावडेसारखे सडेतोड तिरकस, अविनाश गायकवाडसारखे तब्येतीत चालणारे, अविनाश धर्माधिकारी, विश्वंभर चौधरीसारखे नेते, विजय तरवडेसारखे विनोदीवीर, श्रीराम पचिंद्रे, महेश म्हात्रेंसारखे संपादक, समीर परांजपेसारखे पत्रकार, सतीश वाघमारे, संजय जोशी यांसारखे लेखक! 2012पर्यंत फेसबुक हे मराठी साहित्यातले हॅपनिंग होते; पण 2012-13मध्ये या नवलाईचा भर ओसरायला लागला. हळूहळू सगळ्यांच्याच भूमिका प्रेडिक्टेबल होऊ लागल्या. काही लेखकांनी तर केवळ स्वत:च्या प्रमोशनसाठी फेसबुक वापरायला सुरुवात केली. काहींचा तर संतापही प्रेडिक्टेबल झाला. जे माध्यम दोनहजारोत्तरी संवेदनशीलतेची महाजत्रा होईल असे वाटले होते, ते चक्क मराठी साहित्य संमेलनाची ई-आवृत्ती झाले.

एकमेकाला प्रमोट करणार्‍या लोकांचे ग्रुप वाढू लागले आणि 100 पैकी 90 पोस्ट फालतू वाटायला लागल्या. फेसबुकवर आलेल्या कवितांपैकी 99 टक्के कविता या रोमँटिक संवेदनशीलतेच्या असू लागल्या. काही चांगल्या गजलाही फेसबुकवर आल्या, पण त्यांचे प्रमाण अल्प होते. हळूहळू फेसबुक ही फक्त गप्पा मारण्याची, टाइमपास करण्याची जागा झाली. फेसबुकचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे, बाथरूम पोएटचा झालेला प्रचंड विस्तार! प्रत्येक कलेत बाथरूम कलाकार असतात; पण त्यांना प्रतिभावंतांचा धाक असतो. उदाहरणार्थ, बाथरूम सिंगर्सना नेहमीच उत्तम सिंगर्सचा धाक असतो. पण मराठीच्या दुर्दैवाने कधीही बाथरूम पोएट्सना उत्तम पोएट्सचा धाक वाटला नव्हता. फेसबुकवर तर यांच्या बाथरूम कवितांना प्रचंडच आयता फुकटचा अवकाश मिळाला.

त्यामुळे पूर्वी फक्त डायर्‍यांत फुदफुदणारे कवी इथे मोकाटच सुटले आणि या बाथरूम पोएट्सना आवर घालण्याऐवजी त्यांना गोंजारणारे अनेक मध्यम दर्जाचे प्रतिभावंत दादा, ताई झाले. या दादा-तार्इंनी वीस-चाळीस वर्षांची बालके आपल्या खांद्यावर घ्यायला सुरुवात केल्याने बालसंगोपनाची साहित्यिक व्याख्या वेगळी असल्याचा संशय यायला लागला. फेक आयडेंटिटीने तर उरलीसुरली रया घालवून टाकली. प्रवीण बांदेकरांसारखा गंभीर साहित्यिक आरोपीच्या पिंजर्‍यात उभा केला गेला. सत्य काय हे कळले नाही आणि फेसबुक हा साहित्यिक घोटाळ्याचा अड्डा बनतो की काय, असे वाटू लागले.

आताच्या वर्तमानाचे अक्राळविक्राळ असे हे साहित्यिक रूप होते. याचा अर्थ सर्वच वाईट, असा नाही. काही लोकांचे अभूतपूर्व व्यक्तिगत अनुभव, सुनील तांबेसारख्याच्या चर्चा, आशुतोष आपटे, स्वीटी जोशीसारख्या चित्रकारांची हिस्सेदारी, काही कोपर्‍यातल्या वाचकांनी दाखवलेली साहित्याची अभूतपूर्व समज यामुळे फेसबुक वाचले; अन्यथा फेसबुकवरच्या फेसचे नाकच कापले गेले असते!