आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता वर्तमान आणि वर्तमानपत्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील लेखात कवी, पत्रकार आणि अध्यात्मकार हे तिघेही कसे वर्तमानकालिक असतात ते आपण पाहिले. या लेखात ही चर्चा आणखी पुढे नेता येते का ते पाहायचे आहे.

जर कवी व पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू असतील तर 2014पर्यंत यांच्यात एवढे अंतर का पडले? आचार्य अत्रे, प्रभाकर पाध्ये यांच्यासारखे लोक जोवर मराठीत संपादक होते, तोवर मराठी वर्तमानपत्रात कवी लोकांचा दबदबा होता. पण पुढे काव्याचे मर्मज्ञ, विशेषत: समकालीन कवितेचे मर्मज्ञ संपादक गहाळ होत गेले आणि कवींचा दबदबा संपला.

बरेच मराठी संपादक आधुनिक कवितेच्या आगमनानंतर आधुनिक कवींशी जुळवून घेऊ शकले नाहीत. संपादक म्हणून त्यांचा पिंड प्रबोधनवादी किंवा रोमँटिकच राहिला. त्यामुळे आजही मराठीचे संपादक शेरोशायरीत रमतात; पण पुढील आधुनिक नवता, देशी नवता आणि चौथ्या नवतेशी अनेकांचे जमत नाही. म. फुलेंनी आखून दिलेल्या प्रबोधन करणार्‍या प्रबोधनवादी कवितेची चौकट आजही अनेकांना ओलांडता येत नाही. त्यामुळेच प्रबोधनवादी नवता आणि रोमँटिक नवता यांचे 19व्या व विसाव्या शतकातील पूर्वार्धाशी जुळलेले वर्तमानपत्रांचे नाते तुटता तुटत नाही. त्यामुळे समकालीन कवितेला काही सन्माननीय संपादक वगळता फारसे संपादक आकलनासाठी तयार झालेले नाहीत.

1980 पर्यंत मराठीत रविवार पुरवणीत हमखास कविता दिसत, पण पुढे कविता नाहीशा झाल्या. आधुनिक कविता कौतुकाऐवजी टिंगलटवाळीचा विषय बनवण्यातच अनेकांना रस होता. त्यामुळे 1980 नंतर जिथे कविता येत, तिथे आधुनिक समकालीन कवितांना जागाच नसे. अनेकदा तर रविवार पुरवणीचे संपादक स्वत:च्या ओळखीच्या कवींच्या कविता- मग त्या चांगल्या असोत वा नसोत- प्रकाशित करत. याचा एक दुष्परिणाम असा झाला, की अव्वल दर्जाच्या कवींनी स्वत:च्या कविता या पुरवण्यांना देणे कमी केले. पण त्यामुळे दर्जा सुधारण्याऐवजी अधिकच ढासळला. याच काळात मराठीच्या शिक्षक, प्राध्यापकांचा दर्जा अधिकच ढासळला आणि ज्यांना कविता शिकवणे डोक्याला ताप वाटतो, असे लोक प्राध्यापक झाले. त्यांनी कविता कशी वाचू नये, हे शिकवले व विद्यार्थीवयात कविता आणि जीवन यांचा विद्यार्थ्यांच्या मनात जो जैविक संबंध तयार व्हायला हवा तो होऊ न देता कविता म्हणजे मार्क्स देणारा किंवा ऑप्शनला टाकता येणारा विषय बनवला. त्यामुळे वर्तमानपत्रातील कवितांना प्रतिसाद देणारा वाचकवर्ग तयारच होईना आणि कविता ही रविवार पुरवणीतील फार कमी वाचली जाणारी गोष्ट बनली.

अशा वेळी नेमके काय घडते, ते समजून घेणारा प्रतिभावंतांचा वर्ग असावा लागतो. पण झाले असे की नेमके याच वेळी मराठी साहित्याचे नेतृत्व दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे, चंद्रकांत पाटील आदींच्या हातात गेले. यांनी वर्तमानपत्रातील कवितेच्या अध:पतनाची नेमकी मीमांसा करण्याऐवजी सरळसोट वर्तमानपत्र या गोष्टीलाच विरोध केला. नेमाडेंनी तर वर्तमानपत्रावर बहिष्कार टाकला.

या प्रतिभावंत टीकोजीरावांमुळे कविता आणि वर्तमानपत्रे यांचा उरलासुरला संबंध संपला. हे लोक नंतर शहाणे झाले खरे; पण हा अशोकांचा ‘शहाणे’पणा होता आणि यांचे कॉलम येईतोवर कवितेचे ‘कलिंग’ झाले होते. वर्तमानपत्रे आणि समकालीन साहित्य यांचा काही सन्माननीय वर्तमानपत्रे वगळता संबंध संपला होता आणि कवितेचे न्यूज म्हणून असलेले मूल्य आतील पानावरच्या कुठल्यातरी दुर्लक्षणीय कॉलम- चौकटीत गेले होते.

आमच्या पिढीने कविता लिहायला सुरुवात केली ती या बिघडलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर! आमच्या पिढीतील अनेकांची वर्तमानपत्रांना कविता पाठवण्याच्या संदर्भातील आस्था जवळजवळ संपुष्टात आली होती. वास्तविक वर्तमानपत्र हे कवितेसाठी सर्वात उत्कृष्ट माध्यम आहे. पण हे दोन्ही बाजूंना स्पष्ट दिसेनासे झाले, त्यामुळे बातम्यांतून येणार्‍या स्वत:च्या कवितेतील ओळी पाहून आनंदणार्‍या काव्यसंमेलनीय कवींची संख्या वाढतच गेली. हे सर्व कमी होते म्हणून की काय, रामदास फुटाण्यांसारख्या लोकांच्या वात्रटिका प्रसिद्ध होऊ लागल्या आणि मराठीतील जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रांनी पुढे वात्रटिका प्रसिद्ध करायला सुरुवात केली. या वात्रटिकांनी कवी म्हणजे विदूषक, ही प्रतिमा घट्ट करायला सुरुवात केली आणि पुढे यातही दर्जा टिकवणारे अशोक नायगावकरांसारखे कवी पुढे हास्यसम्राट आणि कालांतराने टीव्हीवरील हास्यसम्राट या कार्यक्रमाचे परीक्षक झाले.

अशा वेळी आमच्या पिढीतील अनेकांना वर्तमानपत्रात वाव मिळाला नाही, यात आश्चर्यजनक काहीच नव्हते. आमची ऐंशोत्तरी कवींची संपूर्ण पिढी गारद झाली आणि विवेक मोहन राजापुरे, दिलीप धोंडो कुलकर्णी, अरुण काळे, भुजंग मेश्राम या माझ्या समकालीन पिढीतील प्रतिभावंत कवींना वर्तमानपत्रांत मानाचे मुजरे मिळाले, ते थेट मृत्यूनंतर! मराठी वाङ्मयाच्या इतिहासात कदाचित प्रतिभावंत कवी लोकांची हीच एक पिढी असावी, जिला मराठी वर्तमानाचे प्रतिनिधित्व करणार्‍या वर्तमानपत्रांनी भाव दिला नाही. आणि आता वेळ अशी आली आहे, की भाव देऊनही काही फायदा नाही. कारण बहुतेक प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड नाहीसे झाले आहेत आणि या पिढीतील जे प्रतिभावंत जिवंत आहेत, त्यांना आता कसलीच अपेक्षा उरलेली नाहीये. नारळही न देता जिला मराठी संस्कृतीने सुखरूप रिटायरमेंट दिलीये, अशी ही प्रतिभावंत कवींची एकमेव पिढी! ही त्यांच्या वर्तमानाने घडवलेली शोकांतिका होती की वर्तमानपत्रांनी, हे मात्र येणारा काळच ठरवेल.