आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालातीत ढसाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील लेखात परंपरा, पुराण, इतिहास, रचित, रचना, जालित, जालना या अंगाने भूतकाळाचा व भूतजालकीचा विचार केला. आता आपण थोडा वर्तमानकाळाचा विचार करू. साहित्याचे कथा, कविता, कादंबरी असे वाङ्मय प्रकार प्रत्यक्षात अस्तित्वात असतात की नाही, हा एक वादाचा विषय असला तरी प्रत्यक्ष साहित्य व्यवहार मात्र वाङ्मय प्रकारांना गृहीत धरूनच चाललेला असतो. साहित्याच्या काळमीमांसेत या वाङ्मय प्रकारांचा काळाच्या अंगाने विचार करणारी पहिली तत्त्वज्ञ म्हणून सुझान लँगर या अमेरिकन समीक्षाकर्तीचे नाव घेतले जाते. तिच्या मते, साहित्यातला काळ हा वाङ्मय प्रकार निश्चित करतो. ‘‘काव्यात’’ कालातीत आभासात्मक वर्तमानगर्भ भविष्यकाळ, ‘‘नाट्यात’’ वर्तमानगर्भ भविष्यकाळ आणि आभासात्मक भूतकाळ हा कथा, कादंबरी, चरित्र यांसारख्या कथात्मक साहित्यात आढळतो, अशी ती मांडणी करते. तिची ही मांडणी तिच्या समकालीन साहित्यावरून तिला सुचली आहे, हे उघड आहे. तिच्या वेळी आधुनिकतावादी प्रतिसृष्टीय विशीय दुस-या नवतेचे साहित्य आणि इझरा पाऊंड, टी. एस. इलियट, बॉदलेअर वगैरे आधुनिकतावादी कवी ऐन बहरात होते. त्यांनी परंपरेविरुद्ध बंड करून आताचे वर्तमानातले जीवन आपण कवितेत सादर केले पाहिजे, असा आग्रह धरला होता. त्यांच्या कवितेतील आभासात्मक वर्तमानकाळ हा समीक्षा व साहित्यावर प्रभाव टाकून होता. आपल्याकडेही मर्ढेकर, दिलीप पु. चित्रे, अरुण कोलटकर आणि नामदेव ढसाळ यांच्या कवितांतूनही हा आभासात्मक वर्तमानकाळ वारंवार साकारला गेला आहे. इथे आपणास नामदेव ढसाळ यांच्या एका कवितेतील आभासात्मक वर्तमानकाळ पाहायचा आहे. ही कविता पुढीलप्रमाणे-
माण्सं
हळूहळू माणसं शरीराच्या बाहेर पडू लागतात
पूर्ण घा-या डोळ्याचं सुतक पाठलाग करू लागतं
कालपर्यंत रात्र होती वैरी, आता दिवसही झाला आहे
किती बदलून घेऊ मेलेल्या त्वचेचा रंग
हे अनात्म सावलीचं झिंगूर : ते बांधून गेलेयत माझ्या कलेवरावर पिरॅमिड
या घनघोर भयकंपित भिंतीवर कोरून ठेवलीयत अपरिहार्यतेची प्रतीके
माझी निर्जिव कुडी अडकून पडलीये कोळ्याच्या जाळ्यात निवांत
उभेआडवे दाही दिशांचे विलोभनीय फास
हे कोण विणतो आहे, माझ्या भोवतालच्या निवांतपणाला
पिढ्या-दरपिढ्या रांगत आलेलं शुद्रत्व
हे असं हरवून गेलं स्वप्नातलं गाव
हिरवी मैना, हिरवं झाड
माझं अस्तित्व गेलं आहे दुभंगून
पाहता पाहता मीही होऊन गेलो आहे प्रवाहप्रतीत
वाटलं, नरकाची दलदल ओलांडून मी बाहेर येईन
जसं कमळ येतं चिखलातून
एक एक किडा, एक एक जीवजंतू
किती क्षुद्र वाहते आहे, हे सांडपाणी झ-यातून
फुललो, गळून पडलो
स्वत:साठी मातम करायलाही वेळ मिळाला नाही
आता नुसताच जांभळ्या रंगात निष्प्राण पडून आहे
शरीराबाहेर निघून गेलेली माण्सं पुन्हा शरीराकडे परतू लागली आहेत
आणि मी कासावीस झालो आहे.
ढसाळांच्या या कवितेचा अन्वयार्थ असा - शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माणसं बाहेर पडू लागली. त्याचं सुतकही माझा पाठलाग करू लागलं. वर्णव्यवस्थेची रात्र कालपर्यंत वैरी होती. आता आंबेडकरवादाचा सूर्य उगवून दिवस झालाय खरा; पण तो आता वैरी झालाय, कारण आपलीच माणसं सोडून चाललीत. त्वचेचा (जी मेलेली होती) रंग ती किती बदलणार? जिवंत असती तर रंग बदललाही असता; पण मेलेल्या त्वचेचा रंग कसा बदलणार? जे उरलंय ते अनात्म आहे, कारण (ढसाळ) बौद्ध आहेत, त्यामुळे सावलीचं झिंगुरही अनात्म आहे. अशा वेळी जे कलेवर उरलंय, त्यावर पिरॅमिड बांधून जाणारे निघून गेलेत. मग ज्या पिरॅमिडमध्ये, अनात्म झिंगुर कलेवर कैद झाले आहे, त्या पिरॅमिडच्या भिंतीवर (जी घनघोर आणि भयकंपित आहे) अपरिहार्यतेची प्रतीके आहेत. दाही दिशांच्या उभ्या-आडव्या विलोभनीय फासांनी एक कोळ्याचं जाळ विणलंय आणि त्यात मेल्यानंतरची माझी कुडी- माझे कलेवर निवांत अडकून पडलंय. पण मेल्यानंतरही सनातनी कर्मठ लोक पिढ्या दर पिढ्या रांगत आलेलं शुद्रत्व विणत आहेत. ते सनातनी कर्मठ कोण? हिरवी मैना, हिरवी झाडे यांनी बहरलेलं स्वप्नातलं गाव हरवलं. हे स्वप्नातलं गाव परिवर्तनाचं, क्रांतीचं, आंबेडकरवादाच्या विजयाचं, हरवलंय आणि मी इथे पिरॅमिडच्या आत कलेवर झालेलो! या स्थितीमुळे अस्तित्व दुभंगून गेलंय. या दुभंगपणामुळेच मी प्रवाहपतित झालोय. हे प्रवाहपतित होणं ही नरकाची दलदल होती, हे मला माहीत होतं. मला वाटलं होतं की, कमळ जसं चिखलातून बाहेर येतं तसा मीही ही दलदल ओलांडून बाहेर येईन; पण तसे झाले नाही. आता माझ्या भोवताली सांडपाणी जे झ-यातून वाहात आहे; या सांडपाण्यातून एक एक किडा, एक एक जंतू माझ्या अस्तित्वाच्या मूळ झ-याला क्षुद्र करतो आहे. कधीकाळी मी फुललो, आणि मग गळून पडलो. माझ्या या गळून पडण्याचा, मरण्याचा मातम करायलाही मला वेळ मिळाला नाही. बस्स मी माझ्यातच मेलो.
आता उरलंय ते जांभळ्या रंगातलं निष्प्राण शरीर आणि माणसे जी शरीराबाहेर निघून गेली होती, ती बहुधा खांदा द्यायला पुन्हा माझ्या शरीराकडे परतायला लागलीत...मी कासावीस आहे कदाचित ती परतलीत म्हणून किंवा कदाचित खूप काही सांगायचे-करायचे राहून गेले म्हणून...ढसाळांची ही संपूर्ण कविता मरणप्राय अस्तित्वाने वाचकाला दिलेले स्वगत आहे. हे स्वगत वर्तमानकाळात चालू आहे. हा वर्तमानकाळ आभासात्मक आहे. कारण माणसांचे सोडून जाणे हा भूतकाळ होता; पण कवी तो मृतप्राय अवस्थेत, आता या क्षणी सांगतो आहे, म्हणून हा भूतकाळ आभासात्मक वर्तमानकाळ झाला आहे. तो हे सांगत असतानाच एक चमत्कार झालाय; तो म्हणजे, जी माणसे सोडून गेली होती ती आता तो निष्प्राण झाल्यावर मात्र त्याच्या शरीराकडे परत येत आहेत. हा त्या कलेवराचा वर्तमान क्षण आहे. आता आपण 2014मध्ये या कवितेकडे पाहिले तर काय दिसते? ही कविता तितकीच ताजी आहे, आणि ढसाळांचा नुकताच झालेला मृत्यू, त्यांचे ते निष्प्राण शरीर आणि मेल्यानंतर मीडियाचे, त्यांच्या जुन्या मित्रांचे त्यांच्या या मृत शरीराकडे परतणे यामुळे जणू काय ढसाळ आपल्या या कवितेतून नव्हे प्रत्यक्ष बोलताहेत की काय, असे वाटते. त्या अर्थाने ही कविता कालातीत आहे. म्हणूनच सुझान लाँगर म्हणते, तशी ढसाळांच्या ‘माण्सं’ या कवितेचा काळ वर्तमानही आहे, आभासात्मकही आहे, कालातीतही आहे. कवीने ही कविता लिहिली, तेव्हा हा मृत्यू प्रतीकात्मक होता; आता तो प्रत्यक्ष झाला आहे, आणि काही वर्षांनी तो पुन्हा सिम्बॉलिक- प्रतीकात्मक होईल. कारण नामदेव ढसाळ हा जितका स्वत:च्या वर्तमान काळाचा कवी होता, तितकाच तो कालातीतही आहे.
shridhartilvepublic@gmail.com