आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shridhar Tiwale Article About Namdeo Dhasal's Poem, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कवितेची कालमीमांसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील लेखात सुझान (सुसान) लँगरच्या ‘कविता ही कालातीत आभासात्मक वर्तमानकाळ असते’, या मताचा विचार नामदेव ढसाळ यांच्या कवितेच्या संदर्भात केला. आता हे मत सर्वच कवितांना आणि कविता या वाङ्मयप्रकाराला लागू पडते का, ते पाहू. ढसाळ यांचीच आणखी एक कविता घेऊ.
तेव्हा तू
नदीच्या प्रवाहातून वाहत गेली
ती फुलांची शेज होती ही करुणेची बिछायत
तुझ्या परमेश्वरासाठी नव्हती
भाषेचा कोष फुटून आला, शब्दांची फुलं झाली
तेव्हा तू बागेपासून खूप दूर होतीस...
ही कविता सरळ सरळ भूतकाळ सांगते. नदीच्या प्रवाहातून वाहात गेलेली, ती फुलांची शेज करुणेची जणू बिछायत होती, आणि ढसाळ तिला सांगताहेत की, ती तुझ्या परमेश्वराची नव्हती. भाषेचा कोष फुटला, शब्दांची फुलं झाली, आणि मग त्या फुलांची शेज झाली. म्हणजेच संभाषण झाले, त्या संभाषणातील शब्दांची फुलं झाली आणि पुढे आपण त्या संभाषणानंतर शेजेवर म्हणजेच बेडवर आलो, मग आपल्यात शरीरसंबंध आले, हे संबंध म्हणजे जणू नदीचा प्रवाह होता. हे घडले, त्याची जबाबदारी ते परमेश्वरावर टाकायला तयार नाहीत; म्हणूनच ते म्हणतात, की करुणेची बिछायत तुझ्या परमेशवरासाठी नव्हती. कारण, हे घडले तेव्हा ती बाग परमेश्वराने निर्माण केली होती. त्यामुळेच जे झाले, जी शब्दांची फुले उमलली, ती करुणेची (हा शब्द बुद्धाची करुणा या अर्थाने इथे आलाय) बिछायत निर्माण झाली, त्यांचे श्रेय मानवाचे आहे, असे ढसाळ सांगतात. बायबलच्या, कुराणाच्या पारंपरिक कथेला ते नकार देतात. परमेश्वराला नकार देतात. ‘माणसाने गाणे गावे माण्साचे’ या ओळीला सार्थ करत माणसाचे आदिम गाणे गातात. ही कविता भूतकाळ मांडते आणि भूतकाळाचा नवा अन्वयार्थही सांगते.
''आपण असे म्हणू शकतो की, कविता ही वर्तमानलक्ष्यी असू शकते; पण वाङ्मयप्रकार म्हणून ती निखळ वर्तमानकालिक असते, या म्हणण्याला काहीही अर्थ नाही.''
तुझ्यात बुडत नाहीसं होताना
तुझ्यात बुडत बुडत होईन जेव्हा मी कायमचा नाहीसा
तेव्हा कदाचित मला सोडून द्यावे लागेल कवितेचे बोट
ठेवावा लागेल काठावर माझ्या काळजाचा ससा
कदाचित मी माझ्या बापाला सांगेन स्पष्ट
त्याच्या आध्यात्मिक नसण्याचा मला त्रासच झाला
कदाचित अतोनात होताना कष्ट
मी माझ्या मित्रांनाही सांगेन की
मी तुमच्याशी बोललोय अनेकदा खोटं
मनोमन फक्त केलेत कैकदा
तुमच्या हत्यांच्या कटांची ताटं
मी माझ्या प्रेयसीला सांगेन की एकदा
एका ब्ल्यू फिल्मच्या वेळी मी तिला केलं होत इमॅजिन
चार जणांबरोबर
आणि त्या क्षणी निदान मला त्याची वाटली नव्हती लाज
किंवा माझ्या कल्पनेनं शोधला नव्हता खोडरबर
मी सांगेन सरकारला की
अनेक राजकीय पुढा-यांचे मी मनातल्या मनात साकारले खून
आणि अनेक अधिका-यांची लिंगे कापून
मी त्यांना ठार मारलंय बेडरूममध्ये उकळून
तुझ्यात बुडत बुडत मी होईन जेव्हा
अखेरचा आणि कायमचा तुझ्यात नाहीसा
तेव्हा मी असेन कदाचित
पाण्याहून पातळ
आईपेक्षा मायाळू
चंद्राहून शीतल
आणि अधिकाधिक होत जाईल सरळ
माझा तुझ्यावर आणि तुझ्या बुडवण्यावर असलेला विश्वास
मी जेव्हा घेईन शेवटचा श्वास आणि अदमास तेव्हा कदाचित
माझे फुप्फुस असेल तुझ्याइतकेच तरल
आणि माझ्या बुडण्याच्या आवाजात भरुन राहील
माझ्या गळ्यातील तुझ्याच तहानेचा आवाज
आणि तिचा शेवटचा आचका
ढसाळ आधुनिकतावादी जाणिवेने ईश्वर नाकारतात. पण ही कविता ईश्वरालाच धरून आहे. मात्र हा ईश्वर पौराणिक नाही; तर आधुनिक, निराकार आहे. तो पापपुण्याचा हिशेब करणारा किंवा कयामत घडवणारा किंवा स्वर्ग-नरक निर्माण करणारा ईश्वर नाही; तो फक्त ‘आहे’ किंबहुना जे शाश्वत ‘आहे’ किंवा ‘नाही’ आहे, त्याला निवेदक ईश्वर म्हणतोय. त्यामुळे कवितेत ‘ईश्वर’ हा शब्दही नाही. इतकेच कशाला, या कवितेत ईश्वर काहीही करत नाहीये. कारण तो फक्त ‘आहे’. वारकरी परंपरेत विठ्ठल हा पाण्याहून पातळ, आईपेक्षा मायाळू आणि चंद्राहून शीतल आहे. या कवितेत भक्तच सांगतोय की, मरताना म्हणजेच नाहीसा होताना, कदाचित मी पाण्याहून पातळ, आईपेक्षा मायाळू, चंद्राहून शीतल होईन. म्हणजे, असे होण्याची वा असण्याची जबाबदारी भक्त ईश्वरावर टाकत नाही. तर तो ती जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेतो.
सविस्‍तर वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...