आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसनी व्हा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘व्यसन’ हा शब्द उच्चारताच फक्त वाईट गोष्टींची यादीच आपल्या डोळ्यासमोर नाचू लागते. दारू ढोसून गटारात लोळणारी व बायको-पोरांना मारझोड करणारी माणसं, ज्यांचं वर्णन धुरांडं किंवा चिमणी असं करता येईल असे सतत सिगारेटी फुंकून धूर ओकणारे नमुने, जुगारात रममाण होऊन जगाचा विसर पडलेली माणसं, शेंगदाणे खावेत इतक्या सहजतेने गुटख्याच्या पुड्या तोंडात रिकामी करणारी पोरं आणि भांग, गांजा, चरस व ड्रग्जची आपल्याला आठवण येते. वाईट सवयींच्या अतिरेकाला व्यसन हा पर्यायी शब्द बनला आहे. वाईट गोष्टींची सवय अगदी सहजतेने लागत असल्यामुळे तितक्याच सहजतेने ‘वाईट म्हणजे व्यसन’ व ‘व्यसन म्हणजे वाईट’ ही समीकरणं आपण स्वीकारली आहेत.
खरं तर केवळ व्यसन हा शब्द न वापरता ‘वाईट गोष्टींचं व्यसन’ असा वस्तुस्थितिदर्शक शब्दप्रयोग करणे आवश्यक आहे; जेणेकरून व्यसन नावाच्या आयुष्यातील एका नितांतसुंदर अनुभवाची बदनामी कायमची थांबेल.
कोण म्हणतं व्यसनी असणं ही वाईट गोष्ट आहे? खरं तर व्यसनांशिवाय जगण्याला काहीही अर्थ नसतो. व्यसन असल्याशिवाय अत्यंत अनमोल व एकमेव अशा आयुष्याचा ख-या अर्थाने उपभोग घेता येणं केवळ अशक्य आहे. कुणालाही व्यसन असावं जगण्याचं. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावं. ज्यांना जगण्याचं व्यसन जडलं, त्यांना मरणाच्या दारात घेऊन जाणा-या गोष्टींचं व्यसन जडणं शक्यच नाही. ज्याला जगण्यातली नशा कळली त्याला दारूची नशा कधीच मोह पाडू शकत नाही. आयुष्यात व्यसन असावं साहसाचं, चांगले विचार पसरवण्याचं, काव्य-शास्त्र-विनोदाचं, दु:खितांचे अश्रू पुसण्याचं. माणसाने नशापाणी भरपूर करावं, पण स्वर्गीय सुरांचं. प्रत्येकाला व्यसन असावं ध्येयप्राप्तीचं. तहानभूक हरपून काम करणारी माणसं अत्यंत व्यसनी असतात. कारण हातात घेतलेलं काम यशस्वीरीत्या पार पाडण्याचं व्यसनच त्यांना जडलेलं असतं.
प्रेमात पडण्याचा व व्यसनी बनण्याचा खूप जवळचा संबंध आहे. कोणत्याही गोष्टीच्या पूर्णपणे प्रेमात पडल्याशिवाय व्यसन जडू शकत नाही. जोपर्यंत एखादी गोष्ट खूप आवडत नाही व तिच्यापासून विलक्षण समाधान प्राप्त होत नाही, तोपर्यंत माणूस तिच्या प्रेमात पडू शकत नाही. एकदा प्रेमात पडलं की माणसाला त्या प्रेमाचं व्यसन जडतं. व्यसनात गुरफटण्याला सर्वात जास्त जर कोणती गोष्ट कारणीभूत ठरत असेल, तर ती आहे नशा. तंबाखू असो की दारू, गुटखा असो की ड्रग्ज. नशेमुळे प्राप्त होणारी शरीर व मनाची विलक्षण अवस्थाच कुणालाही व्यसनी बनवते. एखाद्याला ध्येयप्राप्तीचं व्यसन जडलं तर त्याला ड्रग्जसारख्या अत्यंत घातक व अवघं आयुष्य उद्ध्वस्त करणा-या व्यसनापासून मुक्ती का मिळणार नाही? माणसाने जर व्यसनांचे विषय बदलवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतात. ज्या व्यक्तीला जगण्याचं प्रयोजन सापडलं ती व्यक्ती त्या प्रयोजनाच्या व्यसनात गुरफटते व तिला वाईट गोष्टींचा विचार करायलासुद्धा वेळ मिळत नाही.
मित्रांनो, जगण्यावर मनापासून प्रेम करा, अनमोल आयुष्याची नशा चढू द्या आणि जगाची पर्वा न करता ‘व्यसनी व्हा!’