आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shrikant Pohankar Article About A Soldier’s Attitude

इमान मातीशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईहून दिल्लीकडे जाणा-या विमानाने आकाशात झेप घेतली आणि खिडकीकडे नजर टाकताच अरबी समुद्राच्या किना-याकडे झेपावणा-या फेसाळ लाटांमुळे निळ्याशार पाण्यावर तयार झालेल्या पांढ-या रेषा व त्यांना खेटून उभं असलेलं बहुमजली इमारतींचं काँक्रीट जंगल हे अनेकदा बघितलेलं दृश्य नजरेस पडलं. जरा मान वाकडी केली तर शेजारच्या तरुणाने कोणत्या तरी चकचकीत इंग्रजी मासिकात डोकं खुपसलं होतं. त्याला बघून मला भारतीय रेल्वेच्या एसी श्रेणीची आठवण झाली. एकेकाळी रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून प्रवास करणारे महाभाग विमानात बसले असल्याच्या थाटात सहप्रवाशांकडे ढुंकूनही बघत नसत आणि त्यांनी चुकून तोंड उघडलंच तर अमकी अमकी फ्लाइट मिस झाल्यामुळे आपल्यावर ट्रेनने प्रवास करण्याचं दुर्दैव कसं ओढवलं हे अत्यंत लांब चेहरा करून सांगण्यास विसरत नसत. आजकाल एसी कम्पार्टमेंटमध्ये एसटीपेक्षाही जास्त गर्दी होत असल्यामुळे त्यांना मच्छी मार्केटची अवकळा प्राप्त झाली आहे! स्वत:च्या पैशाने क्वचितच विमान प्रवास करणारे नमुने स्वत:ला अत्यंत महान समजत असल्यामुळे एअर होस्टेसव्यतिरिक्त इतर कोणाशीही बोलणे अत्यंत असभ्यपणाचे लक्षण आहे असे समजून शक्य तितके मख्ख चेहरे ठेवून प्रवास करण्यात धन्यता मानतात.
विमानप्रवासात शेजा-याशी न बोलण्याचा अलिखित नियम मी अनेक वर्षांपूर्वी मोडकळीत काढल्यामुळे शेजारी बसलेल्या तरुणाशी आपण होऊन ओळख करून घेताच एखादं आक्रीत घडल्यासारखं तो माझ्याकडे आश्चर्याने बघू लागला. तो भारतीय वायुदलात लढाऊ विमानांचा वैमानिक होता आणि कारगिलच्या युद्धात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्याच्या क्षेत्रातील अनेक गोष्टींबद्दल मला अफाट उत्सुकता असल्यामुळे त्याला मी असंख्य प्रश्न विचारले आणि त्याने तितक्याच उत्साहाने त्यांची उत्तरं दिल्यामुळे आमच्या गप्पा खूप रंगल्या. दिल्ली एअरपोर्टवर विमान लँड होण्यास फक्त दहा मिनिटे उरली होती. गेल्या काही वर्षांपासून मला सतत छळणा-या एका प्रश्नाचं उत्तर त्या अवधीत मी त्याच्याकडून कदाचित मिळवू शकलो असतो. त्यामुळे एकही क्षण वाया न घालविता तो प्रश्न त्याला मी विचारूनच टाकला. ‘आवाजाच्या वेगाला मागे टाकणा-या सुपरसॉनिक विमानातून हजारो फूट उंचीवरून उड्डाण करत शत्रूवर बॉम्बचा वर्षाव करत असताना व स्वत:चा जीव धोक्यात टाकत देशाचं रक्षण करत असताना आपल्या देशातील असंख्य घोटाळे, पराकोटीचे भ्रष्टाचार, खुर्च्या बळकावण्यासाठी चाललेलं अत्यंत किळसवाणं राजकारण, देशाच्या कानाकोप-यात अबोध बालिका व तरुणींवर सतत केले जाणारे लैंगिक अत्याचार, हुंड्यासाठी चुलीतल्या लाकडासारख्या पेटवल्या जाणा-या नवविवाहिता आणि एकतर्फी प्रेमातून कोवळ्या तरुणींच्या केल्या जाणा-या होळ्यांचे विचार तुमच्या मनात कधी डोकावतात? आणि हे सगळे धंदे अत्यंत निर्लज्जपणे करणा-या नराधमांचं प्राणाची बाजी लावून आपण रक्षण करतो आहोत असं कधी तुम्हाला वाटतं?’
त्याने एक क्षण माझ्याकडे रोखून बघितलं आणि उत्तर देण्यासाठी तोंड उघडलं. ‘ज्यांच्या जिवाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही आमच्या प्राणाची बाजी लावून लढतो ते आपल्या देशात काय करतात आणि कसे वागतात हा विचार चुकून जरी आमच्या मनात डोकावला तर एक मिनिटही आम्ही आमचं कर्तव्य बजावू शकणार नाही. प्रशिक्षण देताना दोन अत्यंत महत्त्वाचे शब्द आमच्या मनावर कोरले जातात - ‘अवर लँड’ म्हणजेच आमचा देश, आमची माती. आम्ही या देशातील नागरिकांचं शत्रूपासून रक्षण करण्याची शपथ घेतलेली असल्यामुळे ते कसे वागतात याच्याशी आम्हाला काहीही देणंघेणं नसतं.
आमचं इमान असतं आमच्या देशाशी, अर्थात आमच्या मातीशी!’ मी अचंबित होऊन त्याच्याकडे बघू लागलो आणि करोडो रुपयांचे घोटाळे करून अत्यंत निर्लज्जपणे आणि उजळ माथ्याने आपल्या देशात वावरणा-यांच्या जिवाचं शत्रूपासून रक्षण करून आपल्या मातीशी इमान राखणा-या त्या योद्ध्याला अंत:करणापासून सलाम केला.
सीमेवर लढणा-या शूरांप्रमाणे अवर लँड - आमचा देश ही विचारधारा जर आम्ही आमच्या रक्तात भिनवून घेतली असती तर घोटाळासम्राटांच्या आशीर्वादाने संसदेत नित्यनेमाने चालणारा तमाशा महोत्सव बघण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर आली नसती!