आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shrikant Pohankar Article About An Evergreen Person

चिरतरुण मामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उतारवयातही उत्साही राहणारी मंडळी आसपासच्या लोकांसाठी प्रेरणादायी असतात. आपल्या प्रफुल्लित वागण्याने वातावरणात चैतन्य भरणाऱ्या एका माणसाची ही गोष्ट...
वैकुंठ स्मशानभूमीच्या विद्युतदाहिनीचा दरवाजा वेगाने बंद झाला आणि तप्त भट्टीतील अग्नीने क्षणार्धात पार्थिवाला आपल्या कवेत घेतले. धुराने काळवंडलेल्या त्या बंद दरवाज्यासमोर हात जोडून पाणावलेल्या डोळ्यांनी आयुष्यातील एका मोठ्या अध्यायाला अखेरचा निरोप देत असताना माझ्या मनाचं पाखरू तब्बल तीस वर्षं मागे जाऊन एका मंगल कार्यालयात स्थिरावलं.
ज्याचं वर्णन ‘फाटका’ या शब्दापलीकडे करता येणं केवळ अशक्य आहे अशा शरीरयष्टीच्या अत्यंत साधे कपडे घातलेल्या त्या माणसाकडे आवर्जून लक्ष जावे असे त्याच्यात काहीही नव्हते. तो माणूस मांडवातील बहुसंख्य पाव्हण्यांशी नॉनस्टॉप बोलत होता. आम्ही दोघं शुभेच्छांचा स्वीकार करत असताना थोड्या वेळाने तो आमच्याजवळ आला आणि माझे दोन्ही हात हातात घेत मला म्हणाला, ‘श्रीकांतराव, मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!’ मी म्हणालो, ‘शुभेच्छा ठीक आहे, पण अभिनंदन कशाबद्दल? लग्न तर सगळेच करतात.’ तुमचं खास अभिनंदन यासाठी की, रजिस्टर्ड मॅरेज करण्याचा निर्णय तुम्ही प्रत्यक्षात आणून दाखवला! एवढं बोलून काही क्षणातच तो गर्दीत अदृश्य झाला. त्याने दिलेल्या शुभेच्छा तोंडदेखल्या नक्कीच नव्हत्या आणि म्हणूनच त्यांच्यामागील प्रामाणिक भावना माझ्या हृदयाला भिडल्या. शुभेच्छुकांची गर्दी ओसरल्यानंतर मी बायकोला विचारलं, ‘तो माणूस कोण होता? तुझ्या ओळखीचा आहे का?’ ‘अहो, त्याचं नाव अरुण आणि तो माझा आतेभाऊ आहे. तो इंजिनिअर आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे.’ हा ‘नारायण’ चक्क एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर? त्याचा एका वाक्यातला बायोडाटा ऐकून मी उडालोच.

नोकरीच्या निमित्ताने सुरुवातीला नाशिक व पुण्याची भटकंती केल्यानंतर माझी नागपूरला बदली झाली आणि विविध प्रसंगात माझी अरुणरावांशी भेट होऊ लागली. माझी बायको त्यांचा उल्लेख अरुणमामा असा करत असल्यामुळे मीही त्यांना मामा म्हणू लागलो. आम्ही अनेक बाबतीत समानधर्मी आहोत याची आमच्या सुरुवातीच्या काही भेटींमध्येच मला जाणीव झाली. असंख्य गोष्टींबद्दल उत्सुकता, गप्पा मारण्याचं व्यसन, अनेक वस्तूंची मोडतोड करून त्यातून नवीन वस्तू तयार करण्याची आवड, मिळेल त्या वाहनाने भटकंती करण्याचं वेड, सतत कशात न कशात व्यग्र राहण्याची वृत्ती या व अशा अनेक गोष्टींच्या बाबतीत आम्हा दोघांमध्ये बऱ्यापैकी साम्य होतं. आम्हा दोघांच्या वयात बरंच अंतर आहे हे माहीत असूनही मी त्यांच्या वयाची कधीही चौकशी केली नाही. पण एकदा गप्पा मारण्याच्या ओघात, ‘मामा, तुमचं वय काय असावं?’ असा प्रश्न माझ्या तोंडातून नकळत घरंगळून जाताच ते मला म्हणाले, ‘ज्यांना मनासारखं आयुष्य जगायला मिळतं ना, त्यांच्या मनात स्वत:च्या वयाचा विचार कधीही डोकावत नाही. पण जे सतत मनाविरुद्ध जगतात त्यांना मात्र त्यांचं आयुष्य शेवटच्या दिवसापर्यंत अक्षरश: ढकलावं लागतं. अरे, एकच छोटंसं आयुष्य मिळालं असताना वयाची चिंता बाळगण्याऐवजी आपण प्रत्येक दिवस एखाद्या महोत्सवासारखा का मनवू नये?’

दैनंदिन जीवनात अनेक क्षुल्लक गोष्टींवरून सतत कटकटी करणाऱ्या आणि रात्रंदिवस अहमहमिकेने एकमेकांचे पाय ओढण्यात व्यग्र असणाऱ्या माणसांनी मामांच्या जीवनाचं हे तत्त्वज्ञान आत्मसात केलं असतं तर या जगाचं नंदनवन होण्यास किती वेळ लागला असता?
मामा इंजिनिअरिंग कॉलेजमधून निवृत्त झाले आणि त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून घेण्यासाठी दुसऱ्याच दिवसापासून त्यांच्यावर विविध संस्था व इंजिनिअरिंग कॉलेजेसकडून ऑफर्सचा वर्षाव होऊ लागला. त्यातील एका ऑफरचा स्वीकार करून एकही मिनिट वाया न घालवता ते पुन्हा व्यग्र झाले. अशा माणसांना निवृत्त झालेल्या समवयस्क मित्रांच्या कोंडाळ्यात चकाट्या पिटत बसायची गरज भासत नाही. अशा व्यक्तींवर वृद्धाश्रमाची पायरी चढण्याची कधीही वेळ येत नाही. व्यग्रता हा त्यांचा प्राणवायू असतो आणि माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यंत प्रेरक ठरतो.

हृदयविकाराचे निमित्त होऊन या उत्साहाच्या कारंज्याने अचानक जगाचा निरोप घेतला यावर विश्वास बसत नव्हता. त्यांच्या पार्थिवासमोर नतमस्तक होताना मला कळलं की हे चिरतरुण अरुणमामा फक्त एकाहत्तर वर्ष वयाचे होते!

(shrikantpohankar@gmail.com)