आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्ताचे नातेवाईक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रवीण विमनस्क अवस्थेत माझ्यासमोर बसला होता. त्याच्या सख्ख्या भावाने त्याला पैशाच्या व्यवहारात दगा दिल्यामुळे तो हादरून गेला होता. माझा सख्खा भाऊ असा कसा वागू शकतो, हा प्रश्न त्याने गेल्या काही दिवसांत स्वत:ला काही हजार वेळा विचारला होता. यामुळे त्याला डिप्रेशनचा म्हणजेच औदासीन्याचा झटका आला असावा असं समजून त्याच्या पत्नीने त्याला ‘दिलासा’मध्ये आणलं होतं. त्याच्या प्रत्येक वाक्यात सख्खे, चुलत, जवळचे, दूरचे, रक्ताचे, बिनरक्ताचे इ. शब्दांचा पाऊस पडत होता. ज्यांना रक्ताचे नातेवाईक म्हणतात ते आपल्याशी दगाबाजी करूच शकत नाहीत किंवा वाईट वागूच शकत नाहीत, असा त्याचा समज होता. तो शक्य तितक्या लवकर त्याच्या मनातून काढून टाकावा म्हणून मी त्वरित चर्चेकडे वळलो.
‘रक्ताचे नातेवाईक म्हणजे काय?’
‘अहो, रक्ताचे म्हणजे अगदी सख्खे.’ त्याने जरासं चिडूनच
उत्तर दिलं.
‘सख्खे म्हणजे काय?’
‘तुम्हाला कुणी सख्खे भाऊबहीण इ. नातेवाईक नाहीत का?’ त्याने मला उलट प्रश्न विचारून त्याची सहनशक्ती संपल्याचे जाहीर केले.
‘आहेत की, पण त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे.’
‘तो कसा काय?’ त्याची उत्सुकता ताणली गेली आणि तो माझं बोलणं ऐकण्याच्या मन:स्थितीत आला. प्रश्नोत्तरांमुळे आमच्या चर्चेची गाडी वेग पकडू लागली, प्रवीण विचारमग्न झाला आणि नातेवाईक नावाच्या प्राण्यांबद्दल त्याच्या मनात असलेला गोंधळ दूर होऊ लागला.
रक्ताचे आणि बिनरक्ताचे अशा नातेवाईक मंडळींच्या दोन जमाती या जगात अस्तित्वात आहेत, असा समज उराशी बाळगणं हा वैचारिक गोंधळाचा मूर्तिमंत नमुना आहे. ज्यांना नातेवाईक म्हणतात त्या व्यक्ती आपल्या सगळ्यांसारखीच हाडामांसाची माणसं असतात याचा आम्हाला सतत का आणि कसा विसर पडतो? त्यांनी आपल्याशी चांगलं वागलंच पाहिजे हे कुणी ठरवलं? आज घराघरात जर सगळ्यात जास्त कटकटी कोणत्या विषयावरून होत असतील तर तो विषय आहे रक्ताचे नातेवाईक! आई, वडील, भाऊ, बहीण ही सर्व नातीगोती आपल्यासारखीच काम, क्रोध, मोह, लोभ, मद व मत्सर या षड््रिपुंनी पिडलेली असतात हे आम्ही केव्हा लक्षात घेणार आहोत? नातेवाइकांकडून अफाट अपेक्षा बाळगायच्या आणि अपेक्षाभंग झाला की डिप्रेशनला कवटाळून आपलं अमूल्य आयुष्य वाया घालवायचं, हा कार्यक्रम तातडीने थांबणे आवश्यक आहे.
सगळ्या दु:खांचं मूळ वैचारिक गोंधळात लपलेलं असतं, याचा जेव्हा आम्हाला साक्षात्कार होईल तेव्हा या जगाचं नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही!

shrikantpohankar@gmail.com