आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फील गुड !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत सतत चालणा-या असंख्य परीक्षांपैकी कोणत्या तरी परीक्षेचा एक पेपर सोडवून कुलदीपक घरी आले. ‘काय म्हणतो आजचा पेपर?’ माझ्या तोंडून अचानक शिक्षणविषयक प्रश्न ऐकून त्याला आश्चर्याचा धक्का बसला; पण स्वत:ला त्या धक्क्यातून त्वरित सावरत त्याने उत्तर दिले, ‘काही खास गेला नाही, पण डोंट वरी, प्लीज फील गुड!’ माझ्या काळजी करण्याने त्याचे पेपर चांगले जाणार नाहीत, याची मला यथार्थ जाणीव असली तरी ही ‘फील गुड’ काय नवीन भानगड आहे हे काही माझ्या टाळक्यात शिरेना.


डोकं जास्त न शिणवता मी घराबाहेर पडलो व वॉर्डातील काही तक्रारी घेऊन आमच्या भागातील कर्तव्यदक्ष समजल्या जाणा-या नगरसेवकाकडे गेलो. महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली नसतानाही त्यांनी माझे तोंडभरून स्वागत केल्यामुळे मला उगीचच ओशाळल्यासारखे झाले. ‘या लेखक या. माझ्यासकट आमच्या घरातले सर्व सदस्य तुमचे लेख आवडीने वाचतात बरं का!’ माझ्यावरून स्तुतिसुमनांची आरती ओवाळण्याचा कार्यक्रम पार पडला. कोणत्याही नगरसेवकाकडे कोणीही नागरिक गाण्याच्या भेंड्या खेळण्यासाठी नव्हे, तर आपल्या तक्रारी सोडवण्यासाठी जात असतो हे माहीत असल्यामुळे त्या तक्रारींची धार कमी करण्यासाठी स्वागत व स्तुतीचा आधार घेतला गेला असावा. माझ्या तक्रारींची यादी शांतपणे ऐकून घेतल्यानंतर नगरसेवक महाशयांनी तोंड उघडले. ‘मला तुमच्या अडचणींची पूर्ण कल्पना आहे. गटारं तुंबली आहेत, जागोजागी कच-याचे ढीग साचले आहेत, रस्त्यावरील खड्ड्यांचे आकार लवकरच लोणार सरोवराच्या आकाराशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहेत, वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्यांवरून चालणं मुश्कील झालं आहे, नव्या को-या रस्त्यांचे प्रेमभंग झालेल्या लैलामजनूच्या दिलासारखे तुकडे पडताहेत हे सगळं सगळं मला मान्य आहे; पण आपल्या पामरांच्या हातात काय आहे? करता करविता तो आहे, त्यामुळे तुम्ही विनाकारण काळजी करू नका, प्लीज फील गुड!’


आता मात्र मी जाम तडकलो. कितीही त्रास झाला तरी फील गुड म्हणजे चांगलं वाटून घ्या ही काय भंकस आहे? आता सहचारिणी उर्फ धर्मपत्नी उर्फ बायकोशी चर्चा केल्याशिवाय पर्याय नाही हे माझ्या लक्षात आलं.
‘का गं, तुला चांगलं वाटतं का?’
‘कशाबद्दल?’ बायकोचा प्रतिप्रश्न.
‘म्हणजे आपल्या आसपास जे काही घडतं आहे त्याबद्दल?’
‘काय घडतं आहे?’ तिने मख्खपणे विचारलं. मला तिच्या स्थितप्रज्ञतेचा हेवा वाटला.
‘अगं, असं काय करतेस? ही परदेशी बाई सोडून कोणीही चालेल, असं म्हणणारा नेता खुर्ची मिळवण्यासाठी पुन्हा तिचाच पदर पकडतो, अनेक घोटाळेबहाद्दर तरुण पिढीचे हीरो ठरतात, कायद्याच्या रक्षकांनाच गजाआड व्हावं लागतं, शिक्षक विद्यार्थिनीवर बलात्कार करतात, दिवसाढवळ्या भर रस्त्यात खून पडतात, नवेकोरे रस्ते पहिल्याच पावसात आपल्या डोळ्यादेखत चक्क विरघळून जातात, स्वत:ला कौतुकाने निधर्मी म्हणवणा-या राष्‍ट्रात एखाद्या क्षुल्लक कारणावरून एका धर्माचे लोक दुस-या धर्माच्या लोकांना जिवंत जाळतात. असं काय काय घडत असतं आपल्या या महान देशात. तुला हे सगळं बघून चांगलं वाटतं?’
बायकोने एक दीर्घ सुस्कारा सोडला व ती म्हणाली, ‘माझ्या हातात काय आहे? मी ज्या पक्षाच्या उमेदवाराला मत दिलं तो पक्ष सत्तेवर आला तर हे प्रकार थांबतील, असं वाटतं तुम्हाला? आणि जर थांबणार नसतील तर माझ्या चांगलं किंवा वाईट वाटण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो? या देशाची हतबुद्ध झालेली जनता ज्या गोष्टी बदलू शकणार नाही तिला दिलासा देण्यासाठी आता एकच संदेश शिल्लक राहिला आहे या देशात काहीही घडो, वाईट वाटून घेऊ नका. एकच काम करा आणि ते म्हणजे फील गुड!’


shrikantpohankar@gmail.com