विद्यार्थ्यांचा उत्साह अगदी उतू जात होता. शाळेतील रोजच्या रसायन, भौतिक, गणित, इंग्रजी, मराठीऐवजी अगदी वेगळ्या, पण त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयांवरील चर्चेत प्रत्येकाला आपली मते हिरिरीने मांडण्याची इच्छा होती. आई, वडील, शिक्षक, मित्र, मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक या सर्वांबद्दल प्रत्येकाचं स्वत:चं असं खास मत होतं. मी त्यांच्या वयाचा असताना स्वत:चं मत कशाला म्हणतात याची मला कल्पनाही नव्हती. पण आज थोडीही भीड न बाळगता प्रत्येक विषयावर स्वत:ची ठाम मतं व्यक्त करणार्या या पिढीचं कौतुक करण्यासाठी मला शब्द सापडत नव्हते. मात्र या रंगलेल्या चर्चेत कुणालचं गप्प बसणं मला खटकलं. त्याला चर्चेत ओढण्याचा प्रयत्न मी करू लागलो, पण तो मौन सोडण्यास तयार नव्हता. अगदी अबोल असलेल्या मुलामुलींनीसुद्धा उत्साहाने बोलावं, अशा वातावरणात त्याच्या अबोल्यामुळे माझी उत्सुकता चाळवली गेली व त्याच्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करू लागलो. थोड्या वेळाने त्याने भीतभीत तोंड उघडले. पाणावलेल्या डोळ्यांनी मला विचारले, ‘मला जे काही वाटतं ते बोलून दाखवलं तर तुम्ही रागावणार नाही ना?’ त्याच्या तणावग्रस्त चेहर्याने त्याच्या पालकांना चर्चेसाठी आमंत्रण देण्याचे मी ठरवले.
आठवडा-पंधरा दिवसांत आटोपणार्या एखाद्या उन्हाळी शिबिरात मुलांना पाठवलं, की त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची जबाबदारी संपली असं समजणार्या कुणालच्या पालकांची नाखुशी ते चर्चेसाठी आल्यानंतर त्यांच्या चेहर्यावर स्पष्टपणे झळकत होती. कुणालच्या अबोल्याचा त्याच्या पालकांच्या वागणुकीशी काही संबंध आहे का, हे चर्चेच्या ओघात पडताळून बघण्याचा मी प्रयत्न करत होतो. थोडा वेळ काही हलक्याफुलक्या विषयांवर गप्पा झाल्यानंतर त्याचे पिताश्री जरा मोकळेपणाने बोलू लागले. मुलांना जर आपल्या वडिलांचा धाक नसेल तर ती बिघडतात असे त्यांचे अगदी ठाम मत होते. मुलं सतत आपल्या धाकाखाली राहिली पाहिजेत यासाठी त्यांना सतत रागावणं, मारणं, ती कधीही मोकळेपणाने त्यांच्यासमोर वावरणार नाहीत याची काळजी घेणं हे वडिलांचे आद्यकर्तव्य आहे असा त्यांचा समज होता. मुलांशी सुसंवाद साधणे म्हणजे नक्की काय हे त्यांच्या गावीही नव्हतं. वडिलांशी केव्हाही बोलायची वेळ आली, की कुणाल प्रचंड तणावाखाली वावरत असल्यामुळे काहीही बोलण्याऐवजी गप्प राहणेच पसंत करू लागला. ‘वडील’ नावाच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या त्या प्रतिनिधीने केवळ स्वत:च्या मुलांनाच नव्हे तर पत्नीलाही प्रचंड धाकात ठेवले होते व त्याबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटत असे. कुणालच्या अबोल्याचा उगम सापडल्यामुळे आता त्यावर इलाज करण्याचं काम माझ्यासाठी सोपं झालं.
असे आम्ही कसे? आपल्यामुळे या जगात अस्तित्वात आलेल्या आपल्या मुलांशी सुसंवाद साधून त्यांचे आपण सर्वात जवळचे मित्र का होऊ शकत नाही? मुलांना त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेताना सख्ख्या जन्मदात्यांपेक्षा मित्र जवळचे का वाटतात? ज्या दिवशी आईवडिलांची आपल्या मुलांशी मैत्री होईल तो दिवस खर्या अर्थाने ‘फ्रेंडशिप डे’ असेल!
shrikantpohankar@gmail.com