आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shrikant Pohankar Article About The Value Of An Autograph

सही रे सही !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजांपेक्षाही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज म्हणजे क्रिकेट मॅच. आणि ती कूलर किंवा एसीच्या झकास गारव्यात टीव्हीवर एन्जॉय करायचं सोडून विदर्भातील भाजून काढणार्‍या उन्हाळ्यात भरदुपारी एका शाळेच्या एकही पंखा नसलेल्या वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना बघून मी अवाक् झालो. अखिल भारतीय पातळीवर काम करणार्‍या एका संस्थेने आयोजित केलेल्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मला आमंत्रित केलं होतं. आजचा कार्यक्रम आटोपल्यानंतर कोणालाही सही द्यायची नाही असा निश्चय करूनच आज घराबाहेर पडलो होतो. ‘संवेदनशीलता’ हा विषय जरी दैनंदिन जीवनाशी संबंधित असला तरी त्याचा अर्थ आजच्या सायबरयुगातील मुलामुलींना कळेल की नाही याबद्दल मला बर्‍यापैकी शंका होती. स्वागत, प्रास्ताविक, वक्त्याची ओळख इ. ठरावीक उपचार पार पडल्यानंतर मला देण्यात आलेला एक तास सत्कारणी लावण्याच्या प्रयत्नांना मी लागलो. नुकत्याच घडलेल्या काही धक्कादायक घटनांशी आजचा विषय खूप जवळून संबंधित असल्यामुळे चर्चेत सर्वांनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला, पण वेळेचं बंधन असल्यामुळे अनिच्छेनेच चर्चा आटोपती घेतली.
कार्यक्रम संपला आणि आज मला जे अत्यंत निग्रहाने टाळायचं होतं तेच नेमकं पुढ्यात येऊन ठाकलं. ‘सर, ऑटोग्राफ प्लीज!’ विद्यार्थ्यांच्या हातातील वह्यांनी माझी वाट रोखून धरली. ‘आज कोणालाही तू सही देणार नाहीस,’ माझ्या मनाने माझ्यावर डोळे वटारले. सही देणे यशस्वीरीत्या टाळण्यासाठी नकार देण्याच्या कलेचा वापर करण्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे माझ्यासमोर दाटीवाटीने उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांवर मी प्रश्नाचा पहिला बॉल टाकला. ‘काय होत असतं कोणाची सही घेऊन?’ माझा प्रश्न त्या सर्वांवर अचानक कोसळल्यामुळे सगळे माझ्या तोंडाकडे बघू लागले. ‘सर, ऑटोग्राफ कलेक्ट करणे इज माय फेवरिट हॉबी.’ एका इंग्रजाच्या बाळाने तोंड उघडलं. ग्रेट, पण असे ऑटोग्राफ्स गोळा करून नक्की काय होतं? मी दुसरा बॉल टाकला. ‘तुमची सही बघून आम्हाला आजच्या चर्चेचा विषय आठवेल,’ एका विद्यार्थिनीने माझा प्रश्न टोलवायचा लंगडा प्रयत्न केला. चर्चेचा केवळ विषय आठवून काय उपयोग? सही न देण्याचा निर्धार करूनच आज मी घराबाहेर पडलो होतो! आता मात्र विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि त्यांनी सही घेण्याच्या प्रयोजनांचा माझ्यावर अक्षरश: मारा केला.
सर, ही सही बघून जर माझी संवेदनशीलता जागृत झाली तर केवळ टाइमपास करण्यासाठी काही दिवस एखाद्या मुलीबरोबर फिरून व तिला खेळवत ठेवून त्यानंतर विवाहासाठी नकार दिल्यास त्याचे तिच्या आयुष्यावर अत्यंत घातक परिणाम होऊ शकतात याची मला जाणीव होईल.
आयुष्यात भावनाप्रधान होऊन स्वत:चं नुकसान करून घेण्याऐवजी संवेदनशील होणं किती महत्त्वाचं आहे याची मला सतत जाणीव होत राहील.
एकतर्फी प्रेमातून मुलींचे खून पाडणं हे संवेदना पूर्णपणे हरवल्याचं लक्षण आहे हे मी कधीच विसरू शकणार नाही.
रस्त्यावरून कॉलेजात जात असताना रस्ता अडवून गप्पा मारत जाणे म्हणजे अपघातांना निमंत्रण देणे ही जाणीव आमच्यात निर्माण होणे ही संवेदनशील होण्याची सुरुवातच!
माझे वडील दारू पिऊन माझ्या आईला रोज मारझोड करतात. आजच्या कार्यक्रमात ऐकलेली काही उदाहरणं वापरून मी त्यांची संवेदनशीलता जागृत करण्याचा प्रयत्न करीन व त्यांना त्यांच्या वर्तनाची जाणीव करून देईन.
एका विद्यार्थिनीच्या पाणावलेल्या डोळ्यांनी मला अंतर्मुख होण्यास भाग पाडलं. खोट्या सह्या करून अनेकांना टोप्या घालणार्‍या लोकांच्या आजच्या जगात जर एखादी खरी सही काही विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवण्यास कारणीभूत ठरणार असेल तर त्यांना सही न देऊन मी काय मिळवणार? सही न देण्याचा माझा निर्धार अखेर निकालात निघाला आणि कोणतेही आढेवेढे न घेता सर्वांना सह्या देऊन मी मोकळा झालो!
shrikantpohankar@gmail.com