आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाडा चिरेबंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्साहाने सळसळणा-या ऐन तारुण्यात भविष्याची सुंदर स्वप्नं रंगवत फिरण्याच्या नितांतसुंदर वयात जी घरं आणि त्या घरांना ख-या अर्थाने घरपण प्राप्त करून देणारी माणसं भेटतात त्यांना आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. काही दिवसांपूर्वी जुन्या शहरातल्या ‘वाडा संस्कृती’ला तब्बल पंचवीस वर्षांनंतर मी कडकडून भेटलो. व्यवसाय व समाजकार्याच्या निमित्ताने पाचवीला पुजलेल्या भटकंतीमुळे इच्छा असूनही व्यग्रतेतून वेळ काढता आला नव्हता. एकदा तरी वाड्यात राहणा-या सर्वांना भेटायला पाहिजे, असं म्हणता म्हणता अनेक वर्षं निघून गेलीत आणि ‘देखावे बघण्याचे वय निघून गेले’ या ओळी ओठाबाहेर पडण्याचं वय गाठण्याच्या आत तो वाडा ज्या गल्लीत होता तिच्यात अखेर मी प्रवेश केला.
अनेक जुन्या वाड्यांनी आपली कात टाकून धारण केलेल्या त्यांच्या नव्या रूपाकडे मी एखाद्या छोट्याशा गावातून आलेल्या मुलागत बावचळून बघू लागलो. हे वाडे जर एवढे बदललेत तर त्यांच्यात वास्तव्य करणारी माणसं किती बदलली असतील या विचाराने मी उगीचच काळजीत पडलो. वाडा पूर्णत: नामशेष होऊन त्याच्या जागी एक टुमदार इमारत दिमाखात उभी होती. कौलारू घर, सारवलेलं अंगण, त्या अंगणातलं तुळशी वृंदावन यापैकी कशाचाही आता तिथे मागमूस उरला नव्हता. सारवलेल्या अंगणात फिरण्याची सवय असलेली माझी पावलं इमारतीच्या पार्किंगमध्ये काही क्षण रेंगाळली. तुळशी वृंदावनच्या कोनाड्यात ठेवलेली पणती पूर्ण अंगणात मंद प्रकाश पसरवायची. आज त्याच जागेत अनेक निर्जीव वाहनं स्वत:चा तोरा सांभाळत उभी होती.
वाड्यातील जुन्या मित्रांनी त्यांचे नवीन ब्लॉक्स उत्साहाने दाखवायला सुरुवात केली. एकेकाळी अंधारलेल्या खोल्यांची जागा आता गुळगुळीत टाइल्स व फॉल्स सीलिंगने सजलेल्या प्रशस्त रूम्सने घेतली होती. त्या दुमजली इमारतीतील ब्लॉक्सवर इंटेरिअर डेकोरेटरचा हात फिरला होता. पूर्वी ‘आजी’ नावाच्या संस्थेच्या अखत्यारित असलेल्या स्वयंपाकघरातील मातीची चूल, घडवंची, माठ, ओगराळं इत्यादी बहुपयोगी वस्तूंनी सक्तीची रिटायरमेंट घेतल्यामुळे त्यांची जागा आता मॉड्यूलर किचनमधील स्टेनलेस स्टीलच्या चकचकीत भांड्यांनी घेतली होती. आधुनिकतेचे सगळे अलंकार अंगाखांद्यावर कौतुकाने मिरवणा-या त्या घरांमधील मंडळींना आधुनिकतेचा स्पर्श नक्कीच झाला असणार, असा विचार करत असतानाच मोबाइल पिढीच्या प्रतिनिधींनी मला वाकून नमस्कार करण्यास सुरुवात केली आणि मी उडालोच! ‘हॅलो अंकल’च्या ऐवजी चक्क वाकून नमस्कार? या मुलांना झालंय तरी काय? मी चांगलाच चक्रावलो. ज्यामध्ये अनैतिक संबंधांशिवाय दुसरं काहीही दाखवलं जात नाही अशा सीरियल्स सतत बघूनही ही मुलं बिघडायला तयार नाहीत म्हणजे काय? मी अवाक् झालो असतानाच एका मित्राच्या बायकोने माझ्यावर आणखी एक बॉम्ब टाकला. ‘दर रविवारी तीनपैकी एका घरी एकत्र जमून आम्ही जेवणाचा उत्सव मनवतो!’ आता मात्र हद्द झाली. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वत:ला फ्लॅट नावाच्या चौकोनी डब्यात बंदिस्त करून घेतलेली व शेजा-याचा खून पडला तरी त्याबद्दल अनेक दिवस अनभिज्ञ असलेली माणसं ज्या कलियुगात राहतात तिथे सर्वांनी एकत्र जमून जेवणाचा आनंद लुटणं हे एक आक्रितच होतं.
वाडा अस्तित्वात नसला तरी त्याचा आत्मा मात्र प्रत्येकाच्या शरीरात वास्तव्य करत होता हे बघून मी विलक्षण सुखावलो आणि पुन्हा सर्वांना आवर्जून भेटण्याचं आश्वासन देऊन अत्यंत समाधानाने मित्रांचा निरोप घेतला.